पैठण, 12 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज औरंगाबाद आणि पैठणच्या दौऱ्यावर होते. मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघामध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळीकडे कॅमेरा घेऊन जातात, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. अजित पवारांच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही अशाच ठिकाणी जातो ज्या ठिकाणी कॅमेरा नेता येतो. इतर लोक कुठे जातात तिथे कॅमेरा नेता येत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. काही लोकांच्या आजूबाजूला लोक फिरकतही नाहीत, मी त्याला काय करू. कुणीही आलं तरी मी फोटो काढतो. आपल्या लोकांपासून दूर कसा जाऊ शकतो. काही लोकांचे रोड शो होतात, त्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाठवले जातात, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आधी दादा टीका करत होते, आता ताईसुद्धा सुरू झाल्या आहेत. ताई म्हणाल्या दादा 6 वाजता काम सुरू करतो. ताईला सांगा मी 6 वाजता लोकांची कामं उरकून टाकतो. आम्ही रिमोट काढून घेतल्याने अनेकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचं दिल्लीमध्ये राष्ट्रीय संमेलन झालं, त्या संमेलनात अजित पवार बोलले नाहीत, यावरूनही मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली. जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेता व्हायचं होतं, ते होता आलं नाही म्हणून अजित पवारांना बोलू दिलं नाही, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे.