औरंगाबाद, 29 जानेवारी : साहेब माझ्या गाडीत बसा, असा हट्ट कार्यकर्ते नेहमी आपल्या लाडक्या नेत्याकडे धरत असतात. आता असाच प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद विमानतळावर आले होते. त्यावेळी मंत्री संदीपान भुमरे आणि आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या आलिशान गाड्या विमानतळात उभ्या केल्या. पण, मुख्यमंत्री शिंदे हे भुमरे यांच्या गाडीत बसून गेले. त्याचं झालं असं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी औरंगाबादमध्ये पोहोचले. यावेळी औरंगाबाद विमानतळावर दोन आलिशान गाड्या लावल्या होत्या. एक होती रोहियो मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे संदीपान भुमरे यांची.
तर दुसरी गाडी होती ज्यांना मंत्रिमंडळ विस्तारचे डोहाळे लागले आहे ते म्हणजे आमदार संजय शिरसाट यांची. विशेष म्हणजे, दोन्ही नेत्यांच्या गाड्या या लँड रोव्हर डिफेन्डर आहे. फक्त रंग आणि दोन्ही गाड्यांचे क्रमांक वेगळे होते. (mlc election : सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा? विखे पाटलांनी सांगितलं मतदानाचं गणित) मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गाडीत बसावे अशी दोघांची इच्छा होती. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संदीपान भुमरे यांच्याच गाडीत बसले आणि निघाले. त्यामुळे शिरसाट यांची गाडी माघारी परतली. ( पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं ) विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांच्या बंडात सुरवातीचे शिलेदार संदीपान भुमरे आणि संजय शिरसाट होते. दोघेही नेते आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले होते. पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात संदीपान भुमरे यांना संधी मिळाली. पण, शिरसाट अजूनही वेटिंगवर आहे. दरम्यान, दोन्ही नेत्यांच्या गाड्या एकाच कंपनीच्या आणि दोघांच्याही गाड्यांच्या नंबर प्लेट परिवहन नियमाचा भंग करणाऱ्या आहेत. त्यामुळे या गाड्यांवर कारवाईचा मुद्दा उपस्थितीत झाला तर कारवाई होईल का, हे पाहण्याचे ठरणार आहे.