अहमदनगर, 29 जानेवारी : नाशिक पदवीधर निवडणूक सुरुवातीपासूनच राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र हातात एबी फॉर्म असूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही तर दुसरीकडे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखले केला. त्यानंतर महाविकास आघाडीने दुसऱ्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का? याबाबत उत्सुकता होती, मात्र भाजपने शेवटपर्यंत आपली भूमिका उघड केली नाही. परंतु आता उत्तर महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे.
नेमकं काय म्हणाले विखे पाटील?
याबाबबत भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्यजित तांबे तरुण आणि होतकरू आहेत. त्यांना संधी मिळाली पाहिजे, त्यामुळे आमच्या स्तरावरील कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरुणाईचं युग आहे, सत्यजित तांबे हे तरुण असून, ते आपली भूमिका समर्थपणे मांडू शकतात. कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांचं काम करण्यास सुरुवात केली आहे. सर्व जण स्थानिक भूमिपुत्राच्या पाठिमागे उभे आहेत, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : ...तर चर्चा शक्य; 'वंचित बहुज आघाडी'च्या युतीबाबत सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
सुजय विखे पाटलांचे कार्यकर्तेही लागले कामाला
दरम्यान दुसरीकडे सुजय विखे पाटील यांचे कार्यकर्ते देखील सत्यजित तांबे यांचा प्रचार करताना दिसत आहेत. विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबे यांचं स्टेटस ठेवलं आहे. विखे पाटलांच्या जनसेवा ऑफिसच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या स्टेटसवर विजयी भवं असं लिहिलं आहे. शेकडो कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर सत्यजीत तांबे यांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.