अविनाश कानडजे, प्रतिनिधी
औरंगाबाद, 23 फेब्रुवारी : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील धावडा येथे घडली. आधी पत्नीने आत्महत्या केली होती. त्यानंतर पतीनेही टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील धावडा ( मुर्डेश्वर) इथं ही घटना घडली आहे. सुरेखा संतोष दळवी आणि संतोष किसन दळवी अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावं आहे. दोन दिवसांपूर्वीच पत्नी सुरेखाने विषारी किटक औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. पत्नीच्या निधनामुळे संतोष दळवी एकटे पडले होते आणि मानसिक तणावात होते. त्यामुळे संतोष यांनी रात्री झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.
दळवी कुटुंबावर सततची नापिकता, विविध बॅंकेचे कर्ज,अशा आर्थिक विवंचनेतून शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मागील अनेक वर्षांपासून शेतीत काही पिक येत नव्हते. त्यामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या
दरम्यान, भंडाऱ्यातही अशीच एक घटना घडली. आर्थिक विवंचनेतून घरातील धाब्याच्या बासाला नायलॉन दोरीच्या साह्यायाने गळफास लावून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील दैतमांगली येथे घडली आहे.
(म्हारी छोरी छोरोंसे कम है क्या! शेतीतील सर्व जबाबादरी पेलणाऱ्या बहिणी!, Video)
मृतकाचे नाव रवींद्र नारायण मडावी वय 45 असे आहे. मृतक हा अल्पभूधारक शेतकरी असून आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. आत्महत्या केल्यानंतर मृतकाचे गळफास लावलेली दोरी तुटून प्रेत हे अक्षरशः बाजीवर पडलेल्या स्थितीत आढळून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनाकरिता शासकीय रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad