प्रियांका बोबडे, प्रतिनिधी
अहमदनगर, 23 फेब्रुवारी: ग्रामीण भागात आजही मुलींना अनेक बंधनं असतात. तू मुलगी आहे म्हणून हे करू नको ते करू नको, असं सांगितलं जातं, मात्र याला अपवाद ठरली आहे ती अहमदनगर जिल्ह्यातील वंदना लिंबाजी शेळके ही विद्यार्थिनी. वंदना ही संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडीच्या सर्वसामान्य कुटुंबातली एक मुलगी आहे. घरात मुलगा नसल्याने वडिलांच्या 20 एकर शेतीची जबाबदारी दोन्ही मुलींनी स्वीकारली असून ट्रॅक्टरने मशागतीसह सर्व कामे वंदनाच करत आहे.
मुलगा-मुलगी भेद नाही
लिंबाजी शेळके यांना दोन मुलीच आहेत. त्यांनी मुलगा मुलगी भेद न करता मुलींना शिक्षण देत आहेत. मोठी वंदना ही बी फार्मसीचे शिक्षण घेत आहे. तर लहान ऋतुजा ही दहावीत शिकत आहे. ग्रामीण भागातील मुले शेतीच्या कामात आई-वडिलांना मदत करतात. तसेच दोघी बहिणी लहानपणापासूनच आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करत आहेत.
20 एकर बागायत शेती
घरात मुलगा असला की बापाच्या हातातील काम स्वतःच्या खांद्यावर घेऊन जबाबदारीच ओझं हलकं करतो. याच समजातून मुलगा झाला पाहिजे असा हट्ट धरला जातो. मात्र, वंदना याला अपवाद ठरली आहे. शिक्षणासोबतच तिने वडिलांची शेतीची जबाबदारी स्वत: घेतली आहे. शेळके यांना 30 एकर शेती आहे. त्यातील 20 एकर शेती बागायती आहे. या शेतीची सर्व कामे वंदनाच बघते. आज शेतात डाळिंब, कांदे, हरबरा, जनावरांसाठी चारा आदी पिके घेतली आहेत. मजुरांच्या मदतीने ती शेती करते.
भुजबळांच्या नातींचा इंग्लंडमध्ये डंका, देशाला मिळवून दिले 2 गोल्ड
वंदनाच चालवते ट्रॅक्टर
वंदनाच्या घरी ट्रॅक्टर आहे. त्यामुळे तिला ट्रॅक्टर चालविण्याची खूप जिद्द होती. मुलीने ट्रॅक्टर चालवायचा ही न पटणारी बाब होती. मात्र, आई-वडिलांनी प्रोत्साहन दिल्याने तिच्या इच्छेला बळ मिळाले. चालकाकडून ट्रॅक्टर चालविण्याचे धडे घेत ती सातवीत असतानाच ट्रॅक्टर शिकली. ग्रामीण भागात मुली घरकामात आईला मदत करतात. फार तर शेतात खुरपणी करताना दिसतात. मात्र, वंदना हिने स्वत: ट्रॅक्टरचे स्टेअरिंग हाती घेतले आणि नांगरणी, वखारणी, ब्लोअरद्वारे फळझाडांना फवारणी आदी कामे सुरू केली. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ती स्वतः ट्रॅक्टर चालवून घरची शेती करते.
राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत औरंगाबादच्या साक्षीची भरारी, दिग्गजांना मागं टाकत रचला इतिहास, Video
मुलींचा अभिमान
शेतीपुरक व्यवसाय म्हणून वंदनाच्या घरी गोपालनही केले जाते. पहाटे उठून गायींचे दूध काढणे, दूध काढल्यावर स्वतः ते दूध स्कूटीवरून डेअरीवर घालणे. घरी परतल्यावर गायींसाठी पेंड व गायींचे खाद्य घेऊन येणे. शेतातून चारा आणणे. ही सर्व कामे करून मिळालेल्या वेळेत अभ्यास करणे असा वंदनाचा दिनक्रम आहे. "आम्हाला मुलगा मुलगी भेद वाटत नाही. आमच्या दोन्ही मुलींनी सक्षम असून त्यांचा आम्हाला अभिमान आहे," असे वंदनाचे आई-वडिल सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Ahmednagar, Ahmednagar News, Local18