मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वाहन चालवताना मोबाईल वापरूच नका; औरंगाबादमध्ये 10 हजाराचा दंड होत असल्यानं अनेकांना फुटला घाम

वाहन चालवताना मोबाईल वापरूच नका; औरंगाबादमध्ये 10 हजाराचा दंड होत असल्यानं अनेकांना फुटला घाम

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

औरंगाबादमध्ये वाहन चालवताना फोनवर बोलताना दिसल्यास तब्बल 10 हजार रुपयाचा दंड ठोठावला जातोय. त्यामुळे हा दंड आहे की, वसुली असा प्रश्न काही नागरिक विचारत आहेत.

औरंगाबाद, 04 ऑगस्ट : कोणतेही वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीरच आहे. ज्यामुळे आपण स्वतःसोबत इतरांचेही जीव धोक्यात घालतो. पूर्वी या नियमासाठी जुजबी दंड आकारला जात होता. आता मात्र दंडाची रक्कम ऐकून लोकांना घाम फुटत आहे. औरंगाबादमध्ये वाहन चालवताना फोनवर बोलताना दिसल्यास तब्बल 10 हजार रुपयाचा दंड ठोठावला जातोय. त्यामुळे हा दंड आहे की, वसुली असा प्रश्न काही नागरिक विचारत आहेत.

औरंगाबाद वाहतूक पोलिसांनी आता दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. दुचाकी किंवा इतर वाहने चालवताना कुणी मोबाईलवर बोलताना दिसले तर थेट 10 हजारांचा दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे. कोणतेही वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे चुकीचे आहे. जर अत्यंत गरजेचा फोन असेल तर वाहन रस्त्याच्या बाजूला थांबवून बोलायला हवे. हा नियम मोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, 10 हजार कुठून भरणार? असा सवाल वाहनधारक करत आहेत.

महाराष्ट्र मोटार कायद्यात अशी तरतूद आहे की, दुचाकीवर पहिल्यांदा मोबाईलवर बोलताना दिसला तर हजार रुपये दंड. त्यानंतर दुसऱ्यांदा आढळला तर थेट 10 हजार दंड. वाहन धारक मोबाईलवर बोलत गाडी चालवण्याचे समर्थन करीत नाहीत. मात्र, जो दंड आकारला जातोय त्यामुळे लोक हैराण आहेत, असे बंडू ओक नावाच्या वाहन धारकाने सांगितले.

वाहतूक विभागाचा हा नियम राज्यभरात लागू आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात औरंगाबद अग्रेसर आहे. गेल्या सहा महिन्यात 3 हजार 208 वाहनांना असा दंड आकारण्यात आला आहे. या दंडात्मक कारवाईमधून पोलिसांनी 33 लाख 55 हजार वसूल केले आहेत. मोबाईलवर बोलतांना कुणी आढळले तर जरूर दंडात्मक कारवाई व्हावी, मात्र 10 हजारांचा दंड जुलमी असल्याचे काही वाहनधारकांना वाटते.

First published:

Tags: RTO, Vehicles