औरंगाबाद, 03 डिसेंबर : औरंगाबादमध्ये मोठा जीएसटी घोटाळा उघडकीस आला आहे. राज्य वस्तू व सेवा करच्या औरंगाबाद विभागाने याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. औरंगाबाद शहरातल्या एका भंगार व्यापाऱ्याची 18 कोटींच्या टॅक्स प्रकरणी चौकशी सुरू होती. त्याच्या व्यवहारांबाबत संशय आल्यानं सखोल चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. जेव्हा औरंगाबादच्या अधिकाऱ्यांनी भंगार कंपनीच्या पत्त्यावर छापा टाकला तेव्हा तिथं गोडाऊन नाही तर एका इमारतीत फ्लॅट असल्याचं उघडकीस आलं.
देशभरात करचोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश जीएसटीच्या औरंगाबाद विभागाने केला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती ही 500 ते 1 हजार कोटींच्या घरात असून बनावट कंपन्या तयार करून करचोरी केली जात होती अशी माहिती समोर आलीय. याबाबत मिळालेली माहिती अशी की, औरंगाबादच्या फ्लॅटचा भाडेकरार हा भंगार कंपनीच्या नावाने होता. तो पुरावा म्हणून वापरण्यात आला. फ्लॅट मालकाला जेव्हा बोलावण्यात आओलं तेव्हा त्याचा संबंध कंपनीशी नसल्याचं उघडकीस आलं.
हेही वाचा : पांढऱ्या सोन्याचा भाव पडला, खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत
अधिकाऱ्यांनी अखेर बँक खाते तापसले तेव्हा ती खातीही मुंबईतील वरळीची होती. त्यानंतर खाती उघडणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी जेव्हा अधिक चौकशी केली तेव्हा आरोपींची नावे समोर आली आणि ३० नोव्हेंबरला मुंबईतील डोंगरी, मस्जिद बंदर भागात गुप्त छापे टाकण्यात आले. यात जीएसटी घोटाळ्यातील २ सूत्रधारांना अटक करण्यात आली.
हेही वाचा : ‘पैगंबरांविषयी बोललेल्या नुपूर शर्मावर कारवाई मग’…, उदयराजेंची पाठराखण करत राऊतांचा भाजपला सवाल
फरहत एन्टरप्रायजेसच्या नावाने जीएसटी घोटाळा केला जात होता. आरोपी फैजल आणि अजिज अशी घोटाळ्यातील अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर ३० आधार कार्ड, पॅन कार्ड, ३० हून अधिक सीम कार्ड आढळून आली. तसंच त्यांच्या लॅपटॉपमध्येही जवळपास ५०० कोटींहून अधिक बीले राज्यभरात वितरीत केल्याची आणि त्यामध्ये बड्या कंपन्यांची नावे असल्याचंही उघडकीस आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, GST, Tax