नांदेड, 17 एप्रिल : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भूकंप होणार का? याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. अजित पवार राष्ट्रवादीमध्ये नाराज असून ते लवकरच भाजपसोबत जाणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भूकंप सांगून येत नाही, महाराष्ट्रातल्या संत महात्म्याची पुण्याई भरपूर आहे. त्यामळे महाराष्ट्रात भूकंप येण्याची सुतराम शक्यता नाही, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे.
महाविकासआघाडी भक्कम राहणार : अशोक चव्हाण भूकंप सांगून येत नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रातल्या संत महात्म्याची पुण्याई भरपूर आहे. त्यामळे महाराष्ट्रात भूकंप येण्याची सुतराम शक्यता नाही, असा दावा देखील अशोक चव्हाण यांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा महाविकास आघाडी भक्कम रहाणार असल्याचे सांगितले. आम्ही एकजूट असुन कोणतीही अडचण नाही. अजित पवारांनी देखील खुलासा केला आहे. त्यावर मी अधिक बोलण्याची गरज नसल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. वाचा - राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी, आमदार मुंबईकडे रवाना, अजितदादांनी मौन सोडलं! मी कुठलीही बैठक बोलावली नाही : अजित पवार महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर अजित पवार यांनी अखेर मौन सोडले आहे. खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजीत कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार 18 एप्रिल 2023 रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमीत कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्यापूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी, असं निवेदन अजित पवार यांनी आपल्या ट्विटरवरुन प्रसिद्ध केलं आहे.