रत्नागिरी, 13 नोव्हेंबर : एकनाथ शिंदे हे वारंवार उद्धव ठाकरे यांना धक्के देतच आहेत. शुक्रवारी खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला, यानंतर आता ठाकरे गटाच्या आणखी एका आमदाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी आणि उदय सामंत यांच्यात रत्नागिरीमध्ये तब्बल एक तास गुप्त बैठक झाली. उदय सामंत आणि राजन साळवी यांच्या बैठकीत काय राजकीय चर्चा झाली, यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा विकास, वादग्रस्त रिफायनरी संदर्भात चर्चा का शिंदे गटात प्रवेश? यापैकी कोणत्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. बैठकीत कशावर चर्चा झाली, हे विचारलं असता या दोन्ही नेत्यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवणंच पसंत केलं आहे, त्यामुळे कोकणात राजकीय भूकंप होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या शिवसेनेचे 56 पैकी 40 आमदार आणि 18 पैकी 13 खासदार आहेत, तर ठाकरेंकडे 16 आमदार आणि 5 खासदार आहेत. राजन साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील, असं बोललं जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांच्याविरोधात राजन साळवी यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा दबक्या आवजात काही दिवसांपासून सुरू आहेत. पण साळवी यांनी या चर्चा कायमच फेटाळून लावल्या आहेत. रिफायनरीसंदर्भात राजन साळवी यांनी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेचं नेतृत्व नाराज झालं होतं. राजन साळवी यांनी राजापूरच्या रिफायनरीच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवर बोलावलं आणि खडसावल्याचीही माहिती सूत्रांनी दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.