• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • EXCLUSIVE : 'पगारवाढ केली, आता संप मागे घेतला नाही तर..', अनिल परबांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

EXCLUSIVE : 'पगारवाढ केली, आता संप मागे घेतला नाही तर..', अनिल परबांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा

Anil Parab Exclusive interview : राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही त्यांनी संप मागे घेतला नाही तर त्यांच्या कारवाई करणार, अशी भूमिका परिवहन मंत्री अनिल परब यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत मांडली.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर : परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा (MSRTC employees strike) तिढा सुटावा यासाठी सर्व कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीची (ST workers salary hike) घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनुसार राज्यातील एक ते दहा वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात थेट 5 हजारांची वाढ होणार आहे. तसेच दहा ते वीस वर्ष सेवा देणाऱ्या कामगारांच्या बेसिक वेतनात 4 हजारांची वाढ केली आहे. तर इतर कामगारांच्या बेसिक वेतनाच अडीच हजारांची वाढ करण्याची घोषणा केली. पण या वेतनवाढीच्या घोषणेनंतरही राज्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. जोपर्यंत विलीनीकरण (Merged) होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या निर्णयानंतर संप मागे घेतला नाही तर नाईलाजाने कठोर कारवाईचा विचार करावा लागेल, अशी भूमिका मांडली.

  अनिल परब नेमकं काय म्हणाले?

  "कर्मचाऱ्यांची पगारवाढ वाढवूनही त्यांनी संप मागे घेतला नाही तर मग आम्ही कोर्टाला विनंती करु. कोर्टामध्ये हा विषय घेऊन जाऊ. पण त्याचबरोबर सरकार आणि प्रशासन म्हणून जे योग्य कायदेशीर पाऊल वाटेल ते पाऊल उचलून आम्ही एसटी चालू करु", असा इशारा अनिल परब यांनी दिला. हेही वाचा : पगारवाढीची घोषणा केली, पण तरीही कर्मचाऱ्यांचा एल्गार सरुच, विलीनीकरणाशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका

  'एसटी तोट्यात असताना सरकारकडून पगारवाढ'

  "आज आमचं किमान वेतन हे 305 कोटी रुपये इतकं आहे. आता हे जवळपास 360 ते 365 कोटींपर्यंत जाईल. अतिरिक्त 60 कोटींचं तरतूद आम्हाला करावा लागेल. वर्षाला जवळपास 650 कोटींपर्यंत भार आमच्यावर येईल. एसटी आज प्रचंड नुकसाणीत असताना आम्ही अशाप्रकारचा निर्णय केवळ कर्मचाऱ्यांसाठी घेत आहोत, याची जाणीव कर्मचाऱ्यांनी ठेवावी. एसटी पूर्ववत सुरु ठेवावी यासाठी प्रशासनाला मदत करावी, अशी मी विनंती करतो", असं अनिल परब म्हणाले. हेही वाचा : अनिल परब यांची मोठी घोषणा, एसटी कर्मचाऱ्यांच्या बेसिक वेतनात थेट 5 हजारांनी वाढ

  अनिल परब पगारवाढीबाबत नेमकं काय म्हणाले?

  दरम्यान, अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत पगारवाढीची घोषणा केली होती. "जे कर्मचारी सेवेत एक वर्ष ते दहा वर्ष या कॅटेगिरीत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट 5 हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं मुळ वेतन 12 हजार 80 रुपये होतं त्याचं आता 17 हजार 395 जालं आहे. त्याचं पूर्ण वेतन 17 हजार 395 होतं ते आता 24 हजार 694 झालं आहे. म्हणजे 7 हजार 200 रुपयांची वाढ पहिल्या कॅटेगिरीच्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांमध्ये पगाराबाबत नाराजी होती. त्यांचा आक्रोश गेल्या काही दिवसांमध्ये दिसला. त्यामुळे त्यांच्या पगारात फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या पगारवाढीपैकी ही एक मोठी वाढ आहे. जवळपास 41 टक्के ही पगारवाढ करण्यात आली आहे", अशी घोषणा अनिल परब यांनी केली होती. "10 ते 20 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात आम्ही 4 हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे ज्यांचं मुळ वेतन 16 हजार होतं. त्यांचा पगार मुळ वेतनाच्या 23 हजार 40 रुपये आहे. आता वाढ केल्यानंतर त्यांचा पगार 28 हजार 800 इतका झाला आहे", अशी माहिती त्यांनी दिली होती.
  "20 वर्ष आणि त्याहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात 2500 रुपयांनी वाढ केली आहे. ज्याचं स्थूल वेतन 37 हजार 440 होतं त्याचं वेतन आता 41 हजार 40 झालेलं आहे. ज्याचं स्थूलवेतन 53 हजार 280 होतं त्याचं वेतन 56 हजार 880 होईल", असंदेखील अनिल परबांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच सर्व कर्मचाऱ्यांचा प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेच्या आधी पगार होईल, याची त्यांनी हमी दिली.
  Published by:Chetan Patil
  First published: