अंबरनाथ, 24 नोव्हेंबर : अंबरनाथ (Ambernath) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शहराध्यक्षाने आपल्या सख्ख्या भावाच्याच डोक्याला बंदूक लावत जीवे मारण्याची धमकी (threat to brother) दिल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणी शहराध्यक्षाच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. पोलीस या अर्जाच्या अनुसंघाने तपास करत आहेत. या सर्व प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मात्र हे सर्व आरोप शहराध्यक्ष सदाशिव पाटील (Sadashiv Patil Ambernath NCP city president) यांनी फेटाळले आहेत. अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्यावर त्यांचा सख्खा लहान भाऊ जनार्दन पाटील याने बंदूक डोक्याला लावून जीवे ठार मारण्याची धमकी दिलाचा आरोप केला आहे. मात्र सदाशिव पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून भावानेचा मोबाइल टॉवर वर काम करणाऱ्या इंजिनियरला मारहाण केली आहे. त्यामुळे इंजिनिअरने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची माहिती दिली आहे. वाचा : अल्पवयीन बहीण-भावावर तरुण जोडप्याचा बलात्कार; महाराष्ट्राला हादरवणारी घटना सदाशिव पाटील यांचं अंबरनाथ एमआयडीसीत सचिन हॉटेल आहे. या हॉटेलच्या टेरेसवर मोबाइल कंपनीचा टॉवर बसवण्यात आला आहे. मात्र, टॉवर असूनही जनार्दन पाटील यांच्या मोबाइलला रेंज मिळत नसल्याने ते सचिन हॉटेल इथे लावलेल्या टॉवरच्या ठिकाणी गेले. तिथे काम सुरू असताना त्यांनी मोबाइल टॉवरवर काम करणाऱ्यांना जाब विचारला आणि ते घरी गेले. मात्र थोड्या वेळाने सदाशिव पाटील यांनी फोन करून त्यांच्या हॉटेलवर आपल्याला बोलवून घेतले आणि मारहाण करत बंदूक काढीत डोक्याला लावत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप जनार्दन पाटील यांनी केला आहे. तर आपण असे काही केले नसून उलट जनार्दन पाटील हे माझ्या हॉटेलवर लावलेल्या मोबाइल टॉवरच्या ठिकाणी आले आणि त्यांनी इंजिनिअरला मारहाण केली. तसंच माझ्या हॉटेलमध्ये आणि कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असून पोलिसांनी त्याचं फुटेज घेऊन मी बंदूक त्याच्या डोक्याला लावली का याबाबत खरं-खोटं करावं असं सदाशिव पाटील यांनी म्हटलं आहे. वाचा : भर दिवसा जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दरोडा, गोळीबाराचा थरार, व्यवस्थापकाचा मृत्यू सध्या मोबाइल टॉवरवर काम करणाऱ्या इंजिनिअरने अंबरनाथ शिवाजी नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्यानंतर जनार्दन विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती सदाशिव पाटील यांनी दिली आहे. तर मला मारहाण झाली असताना माझ्यावरच अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून मी सदाशिव पाटील विरोधात तक्रार अर्ज दिला आहे. पोलिसांनी न्याय दिला नाही तर मात्र आणखी पुढे या विरोधात न्यायासाठी झगडणार असल्याचे जनार्दन पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी मात्र या प्रकरणी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.