पुणे, 24 नोव्हेंबर : जुन्नरच्या अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत (Co-operative Credit Society) आज सशस्त्र दरोडा (Armed Robbery) पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोड्यांनी केलेल्या गोळीबारात (Firing) पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना ही आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर (Junnar) तालुक्यात खळबळ उडाली आहे. आरोपी एवढं मोठं धाडसं करुच कसं शकतात? त्यांना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का? असे अनेक प्रश्न आता स्थानिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
जुन्नरच्या 14 नंबर येथील अनंत पतसंस्था ही पुणे-नाशिक महामार्ग लगत आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्यवस्थापक राजेंद्र भोर आणि लिपिक अंकिता नेहरकर हे जेवण करत असताना दोन अज्ञात हेल्मेट घातलेल्या व्यक्तींनी पतसंस्थेत प्रवेश केला. त्यांनी व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्याकडे पैशाची मागणी करत गोळीबार केला. यामध्ये राजेंद्र भोर (वय 52) प्रचंड जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नारायणगाव याठिकाणी नेले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
हेही वाचा : मोठी बातमी ! 'आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार', काँग्रेसची घोषणा
दोघे जण मोटार सायकलने हेल्मेट घालून आले होते. ते पतसंस्थेत घुसले आणि बंदुकीच्या धाकाने पैसे मागू लागले. पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी नकार देताच त्यांनी गोळीबार सुरु केला. त्यानंतर ते पैसे घेऊन पळून गेले. हा सर्व घटनाक्रम काळजाचा ठोका चुकवेल असाच आहे.
घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांनी किती रक्कम लंपास केली याबाबतचा पोलीस तपास करत आहेत. पतसंस्थेच्या सीसीटीव्हीत 2 इसम हेल्मेट घालून आत आल्याचे फुटेज पोलिसांना मिळाले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा : एसटी कर्मचारी शिष्टमंडळ -अनिल परबांची बैठक संपली, थोड्याच वेळात होणार मोठी घोषणा
विशेष म्हणजे एक महिन्यापूर्वीच 21 ऑक्टोबरला शिरुर तालुक्यातल्या पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रवर दरोड्याची घटना घडली होती. दरोडेखोरांनी कोट्यवधींचं सोनं आणि रोख रक्कम पळवली होती. घटनेला महिना होत नाही तोच जुन्नरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पतसंस्था, बँकाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.