अमरावती, 13 सप्टेंबर: मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून भाजप आणि शिवसेनेत वाद पेटला आहे. या वादात आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उडी घेतली आहे.
एका वृद्ध माजी सैनिकावर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. सैनिकाला बेदम मारहाण केली. असे हल्ले होत असतील तर महाराष्ट्र सुरक्षित आहे का? असा थेट सवाल करत खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा...माँ जिजाऊ, सावूमाई, रमाई, भिमाई फक्त भाषणांपुरतचं का? महिला भाजप नेत्याचा सवाल
लोकसभेच्या आगामी अधिवेशनात आपण हा मुद्दा उपस्थित केल्याशिवाय राहाणार नाही, असं देखील नवनीत राणा यांनी सांगितलं आहे.
देशातील कुठल्याही माजी सैनिकांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. गुंडप्रवृत्तीच्या हल्लेखोर शिवसैनिकांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
दरम्यान, एक कार्टून फॉरवर्ड केल्यामुळे शिवसैनिकांनी माजी सैनिक मदन शर्मांवर हल्ला केला होता. यावरून खासदार नवनीत राणा चांगल्याच संतापल्या आहेत. खासदार राणा म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित केलं. माजी सैनिक मदन शर्मा यांचेवर काही गुंड प्रवृत्तीच्या शिवसैनिकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी हल्ला केला होता. मात्र, याबाबत मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. उलट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर या हल्ल्याचं समर्थन केलं. हा केवळ एका माजी सैनिकवरील हल्ला नव्हता तर देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या देशाच्या सेवकावर हल्ला होता. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा अपमान केला आहे. शिवसेनेच्या या कृत्यामुळे माजी सैनिकांचं मनोबल खचलं आहे, असं देखील खासदार नवनीत राणा यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा...भारतीय जवानांना मिळणार ‘भाभा कवच’, शत्रूंच्या गोळ्यांचाही होणार नाही परिणाम
खासदार संजय राऊत यांनी जसं या हल्ल्याचं समर्थन केलं तसं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या हल्ल्याचे समर्थक होते, हे स्पष्ट आहे, असं सांगत खासदार नवनीत रवी राणा यांनी शिवसेनेच्या या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे तर त्यांना अवघ्या 2 तासांत जामीन कसा मिळाला? असा सवाल देखील खासदार राणा यांनी उपस्थित केला आहे. देशातील सैनिकांना न्याय मिळावा, यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे. तसेच हे प्रकरण देखील त्यांच्या कानावर घालणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी यावेळी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Udhav thackeray