सुरत, 22 जून : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा पहिला फोटो आता समोर आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासोबत 30 पेक्षा जास्त आमदार असल्याची बातमी समोर येत होती. विशेष म्हणजे शिंदे यांच्यासोबत नेमके कोणकोणते आमदार आहेत याची थेट माहिती देणारा फोटोच आता समोर आला आहे. हा फोटो 'न्यूज 18 लोकमत'च्या हाती लागला आहे. विशेष म्हणजे प्रहार संघटनेचे आमदार स्वत: बच्चू कडू हे देखील या आमदारांसोबत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
समोर आलेल्या फोटोनुसार, एकनाथ शिंदे यांना जवळपास 33 आमदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांचादेखील समावेश आहे. त्यापाठोपाठ आमदार महेंद्र थोरवे, भारत गोगावले, महेंद्र दळवी, अनिल बाबर, महेश शिंदे, शहाजी पाटील, शंभुराज देसाई, बालाजी कल्याणकर, ज्ञानराज चौगुले, रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदीपमान भुमरे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख, प्रकाश सुर्वे, किशोर पाटील, सुहार कांदे, संजय शिरसाठ, प्रदीप जयस्वाल, संजयकुमार रायमुलकर, संजय गायकवाड, एकनाथ शिंदे, विश्ननाथ भोईर, शांताराम मोरे, श्रीनिवास वणगा, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, चिमणराव पाटील, नरेंद्र बोंडेकर, लता सोनवणे, यामिनी जाधव आणि बालाजी किणीकर यांचा शिंदेंना पाठिंबा आहे. या आमदारांच्या साथीने शिंदे भाजपसोबत हातमिळवणी करु शकतात किंवा स्वतंत्र पक्षाची देखील स्थापना करु शकतात.
विशेष म्हणजे एक आणखी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतच्या हॉटेलमध्ये 37 आमदार आहेत. शिंदेंची त्यांच्यासोबत बैठक सुरु आहे. एकनाथ शिंदे यांना कायदेशीर सल्ला देणारी तज्ज्ञ कमिटीदेखील तिथे पोहोचली आहे. यामध्ये तीन तज्ज्ञ वकील आहेत. या बैठकीत पुढची रणनीती ठरणार आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देणार की स्वतंत्र पक्ष काढणार याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सुरतच्या हॉटेलमध्ये चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपची पडद्यामागची भूमिका राहिलेली आहे. भाजपच्या एकही नेत्याचं याबाबत वक्तव्य आलेलं नाही. भाजपची सध्याची भूमिका वेट अॅण्ड वॉचची आहे.
(शिवसेनेच्या आमदारांना फिरण्याच्या बहाण्याने गुजरातला नेलं, आणि.... आमदाराने सांगितला रात्रीचा थरार)
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गुजरात भाजपने या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या सर्व प्रकरणासोबत आपला काहीच संबंध नसल्याचं म्हणत त्यांनी जबाबादारी झटकली आहे. जे काही केलं आहे ते सगळं शिदें यांच्याच गटातील नेत्यांनी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. पण गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील आणि गृहमंत्री हर्ष संघवी हे काल सुरतच्या त्याच पंचतारांकीत हॉटेलमध्ये होते जिथे शिवसेनेचे बंडखोर आमदार आले होते. गुजरातच्या गृहमंत्री आणि आर सी. पाटील यांनी शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांचं स्वागत केलं होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांनीच हॉटेलची सर्व अरेंजमेंट केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजप या आमदारांना पड्यामागून पाठिंबा देत असल्याचं उघड झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.