अकोला 02 सप्टेंबर : अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात नुकतंच शिंदे गटात सहभागी झालेल्या अकोला उपशहर प्रमुख भागवत देशमुखची हत्या करण्यात आली आहे. 28 वर्षीय भागवत देशमुखची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर मृतदेह कापसी तलावात फेकून देण्यात आला होता. या हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.
धक्कादायक! पाकिस्तानात 8 वर्षीय हिंदू मुलीवर सामूहिक बलात्कार; पीडितेचे दोन्ही डोळे काढले बाहेर
27 ऑगस्टला पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कापसी तलावात एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मात्र, हा मृतदेह दोन दिवसांपासून पाण्यात असल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. हा मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय तपासणीच्या अहवालात या युवकाची हत्या झाल्याचं समोर आलं. अखेर ओळख न पटल्याने पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
29 ऑगस्ट रोजी मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर 30 ऑगस्ट रोजी पुन्हा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तलावाच्या परिसरात पाहणी केली. यावेळी अर्धा किलोमीटर अंतरावर एका रुमालमध्ये आधार कार्ड आणि इतर काही वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संबंधित युवक बेपत्ता असल्याची तक्रार अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे भागवत अजाबराव देशमुख अशी या युवकाची ओळख पटली. आता पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत देशमुख गेल्या २५ ऑगस्ट पासून बेपत्ता होता. त्याचा अनेक ठिकाणी शोध घेण्यात आला, मात्र कुठलाही सुगावा हाती लागला नव्हता. अखेर नातेवाईकांनी भागवत बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दाखल केली. दरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी नातेवाईकांना या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली की भागवतची हत्या झाली असून तेव्हा कुठलीही ओळख न पटल्याने पोलिसांकडून त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder