अकोला, 11 जुलै: एकाच छताखाली मानसिक आधारासह अन्य सुविधा देत पीडित महिलांना ‘सखी’ वन स्टॉप सेंटर (one stop center) scheme आधार ठरत आहे. अत्याचारपीडित महिला आणि बालकांना वैद्यकीय उपचारापासून ते कायदेशीर मदतीपर्यंत सर्व सुविधा सखी केंद्रामध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. केंद्र शासनाच्या महिला व बाल कल्याण मंत्रालयाद्वारे अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील (District Women Hospital, Akola) वार्ड क्र. 7 मध्ये सखी वन स्टॉप क्राइसेस सेंटर चालविले जाते. आतापर्यंत याठिकाणी अनेक संकटात असलेल्या 277 महिलांना अत्यावश्यक मदत मिळाली असून येथील कामगिरी प्रशंसनीय ठरली आहे.
हुंडाबळी, ऑनर किलिंग, ॲसिड हल्ला, लैंगिक छळ, बाल लैंगिक छळ, लैंगिक अत्याचार, बाल विवाह, भ्रुणहत्या यासारखे गैरप्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. याप्रकारांना आळा घालण्यासाठी व अन्यायग्रस्त महिलांना दिलासा देण्यासाठी शासनाने ‘सखी वन स्टॉप सेंटर’ सुरु केले आहे. कौटुंबिक किंवा अन्य हिंसाचाराने पिडित असलेल्या महिला, संकटग्रस्त असलेल्या महिलांना या योजनेद्वारे मदत, सोय केंद्रात केली जाते. ‘सखी’ ही योजना केंद्र पुरस्कृत असून जिल्हा महिला व बाल विकास अंतर्गत राबविण्यात येत आहे. हिंसाचाराने पिडीत महिलांना वैद्यकीय मदत, पोलीस साहाय्य, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, तात्पुरता निवारा अशी पाच प्रकारची मदत याठिकाणी दिल्या जाते. संकटात सापडलेल्या महिलांना काळजी व संरक्षण देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. या योजने अंतर्गत घरगुती, घरच्या बाहेर, कामाच्या जागेवर इतर कोणत्याही ठिकाणी हिंसाचार होत असेल तर अशा पीडित महिलांना सर्व सोयी-सुविधा एका छताखाली मोफत 24 तास पुरविल्या जातात.
वाचा- Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO
सखी केंद्रात येवून तुम्ही आपली समस्या मनमोकळेपणाने मांडू शकता. तुमच्याशी बोलायला, कठीण परिस्थितीत वाट काढायला संवेदनशील तसेच अनुभवी जाणकार येथे असतील. तुम्हाला त्यांचा सल्ला मिळेल. याशिवाय, वकिल सल्ला, पोलिसांची मदत व या प्रसंगी तात्पुरता निवारा देण्यात येतो. यासह सरकारने नव्याने केलेल्या कायद्याची माहिती देखील इथे दिली जाते. सर्व जाती-धर्मातील महिलांना याठिकाणी कायद्याअंतर्गत मदत दिली जाते.
हिंसा होत असेल तर तुम्ही या कायद्याची मदत घेवू शकता
तुमच्यावर सासर माहेर किंवा इतर जवळचे नातेसबंध असणाऱ्यांकडून जर हिंसा होत असेल तर तुम्ही या कायद्याची मदत घेवू शकता. कधी कधी परिस्थिती इतकी बिकट असते की तुम्ही स्वतः दाद मागू शकत नाही तेव्हा इतर कोणीही तुमच्या बाजुने ह्या कायद्याद्वारे दाद मागू शकते. बऱ्याचदा स्त्रियांना मुख्य भीती असते की, आपल्यावर होणाऱ्या हिंसेविरूद्व बोलल्यास आपल्या डोक्यावरचे छतं हिरावून घेतले जाईल. परंतु, या कायद्याची मदत घेवून तुम्ही त्याच घरात राहुन तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला रोखू शकता, थांबवू शकता.
वाचा- Beed : लाखो लोकांना शुद्ध पाणी पुरवणारी ‘जलशुद्धीकरण’ प्रक्रिया पाहिलीये का?, पाहा VIDEO
'सखी वन स्टॉप सेंटर’ मध्ये आल्याने एकटेपणा कमी होवून तुमचा जगण्याचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी हा विभाग तत्पर असतो. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल ह्या सेंटरच्या नियंत्रण अधिकारी आहेत. महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे हे व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिव आहेत. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न सेंटरमधील केंद्र प्रशासक करतात.
हेल्पलाईन नंबरद्वारेही मिळेल प्रवेश
जिल्हा स्त्री रुग्णालयातील वार्ड क्र. 7 मध्ये सखी वन स्टॉप क्राइसेस सेंटर चालविले जाते. इथे हिंसाचाराने पिडित असलेल्या महिला स्वतःप्रवेश घेऊ शकतात किंवा हेल्पलाईन नंबरद्वारे (9028161369) , पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, नातेवाईक, मित्र, मैत्रीणी, स्वयंसेवक मार्फत, दवाखान्यामार्फत आपला प्रवेश घेवू मिळवता येतो.
गुगल मॅपवरुन साभार
“कुणीही अन्याय सहन करू नका”
सखी वन स्टॉप सेंटर जिल्हा स्त्री रुग्णालयात 10 फेब्रुवारी 2017 पासून चालू झालं आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक असे सेंटर असते. येथील सेंटरमध्ये आतापर्यंत 277 महिलांना मदत करण्यात आलेली आहे. कुणीही अन्याय सहन करू नका, कायद्याची मदत घ्या, सखी वन स्टॉप सेंटर सदैव आपल्या पाठीशी आहे, अशी माहिती केंद्र प्रशासक अॅड. मनिषा भोरे यांनी दिली.
सखी वन स्टॉप सेंटर आमची पुरेपूर काळजी घेते. आम्हाला समजावून सांगितल्या जाते. त्याचबरोबर राहण्याची आणि खाण्यापिण्याचीही सोय पुरवली जात असल्याची माहिती येथील एका पीडितेने माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Akola News, Women, Women security