Home /News /maharashtra /

उद्धव ठाकरेंकडे भूमिका मांडणार, मग शिंदे गटात सामील होणार? खासदार सदाशिव लोखंडेंचं सूचक विधान

उद्धव ठाकरेंकडे भूमिका मांडणार, मग शिंदे गटात सामील होणार? खासदार सदाशिव लोखंडेंचं सूचक विधान

शिवसेनेच्या आमदारांनंतर खासदारही वेगळी वाट धरत एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सुनिल दवंगे, प्रतिनिधी शिर्डी, 10 जुलै : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) पक्षाची गळती थांबताना दिसत नाहीय. आता आमदारांनंतर खासदारही वेगळी वाट धरत एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशातच शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी निवडणुकीत उमेदवार पक्षाचा असतो, मात्र निवडून आल्यानंतर तो जनतेचा होतो. आपली भूमिका सोमवारी मातोश्रीवर होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत मांडू, असं म्हटल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे दोन टर्मपासून शिवसेना पक्षाकडून शिर्डी लोकसभा क्षेत्रातून निवडून येत आहेत. जिल्ह्यात एकही शिवसेनेचा आमदार नसताना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लोखंडे दोन लाख मताधिक्य घेत निवडून आले आहेत. सदाशिव लोखंडे यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मी शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार म्हणून निवडून आलो आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही खासदारांनी त्यावेळी देखील शिवसेना-भाजप युतीचा आग्रह धरला होता. मात्र तेव्हा युती झाली नाही. आता काल दिल्लीत काही खासदार होते. मात्र मी शिर्डीत आहे. उद्या सोमवारी प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलवली आहे. त्यावेळी सर्व खासदार आपली भूमिका पक्षप्रमुखांसमोर स्पष्ट करतील. माध्यमांसमोर सांगण्यापेक्षा पक्षाच्या बैठकीत खासदार आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जे सांगायचे ते उद्या मातोश्रीवरील बैठकीत सांगणार असल्याचं खासदार लोखडे यांनी म्हणाले. ('औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आम्हाला कल्पनाही नाही', शरद पवारांनी झटकले हात) अहमदनगर जिल्ह्यात निवळवंडे पाटपाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. दरम्यान जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारचे तीन मंत्री होते. त्यांनी देखील याकडे लक्ष दिले नसल्याची टीका लोखंडे यांनी केली. आता पुन्हा एकदा निळवंडे पाटपाणी कृती समितीनं लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली आहे. मात्र आता या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना शिंदे सरकार दरबारी जुळवूण घ्यावं लागणार, असं देखील म्हटलं जात आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर बंडखोर आमदारांची संख्या आता 50 वर पोहोचली आहे. यानंतर आता शिवसेनेचे काही खासदारही शिंदे गटात सामील होऊ शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे 12 खासदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासदाराचे नाव जाहीर करुन शक्यतेला आधार दिला होता. मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठोपाठ आता पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी केली आहे. तसेच, शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी देखील एकनाथ शिंदेंवर कारवाई न करण्याची विनंती केली होती. त्यामुळे शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: BJP, Eknath Shinde, Shiv sena, Uddhav thackeray

पुढील बातम्या