Home /News /maharashtra /

'राजीनामा द्या, नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील', शिंदे गटात सामील झालेल्या खासदाराला धमकी

'राजीनामा द्या, नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील', शिंदे गटात सामील झालेल्या खासदाराला धमकी

शिवसेनेचे बरेच खासदारही एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे याच नाराजीतून शिवसेनेच्या एका जिल्हा प्रमुखाने खासदाराला राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

अहमदनगर, 27 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे बरेच खासदारही एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे याच नाराजीतून शिवसेनेच्या एका जिल्हा प्रमुखाने खासदाराला राजीनामा देण्याची मागणी केली आहे. तसेच राजीनामा दिली नाही तर वाईट परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा जिल्हा प्रमुखाने दिला आहे. संबंधित प्रकरण हे शिर्डीतलं आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ऐनवेळी शिवसेनेने खासदारकीची उमेदवारी दिलेल्या सदाशिव लोखंडे यांना शिर्डीतील मतदारांनी दोनदा खासदार बनवलं. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याची आवई उठवणारे सदाशिव लोखंडे आता मात्र शिंदे गटात सामील झाल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. 2014 साली शिवसेनेचे बबनराव घोलप शिर्डीचे खासदारकीचे उमेदवार होते. मात्र न्यायालयीन अडचणींमुळे त्यांना निवडणूक लढवता आली नाही. निवडणूक अगदी सतरा दिवसांवर आलेली असताना भाजपात असणाऱ्या सदाशिव लोखंडेंना शिवसेनेने उमेदवारी दिली आणि अवघ्या सतरा दिवसांच्या संपर्कात लोखंडेंना शिवसैनिकांनी खासदार केले. 2019 सालीही सदाशिव लोखंडेंनाच शिवसेनेने पुन्हा खासदार केलं. गेल्या महिन्यात शिंदे गटाविरोधात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीत मोर्चा काढण्यात आला होता. त्यांनी मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होत. आता मात्र सदाशिव लोखंडे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिर्डीतील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. (वीजदर कपात, मराठा, ओबीसी आंदोलनातील गुन्हे मागे; शिंदेंचे एकाच फटक्यात अनेक निर्णय) "आम्ही रक्ताचे पाणी करून तुम्हाला खासदार केलं आणि तुम्ही धनुष्यबाणाचा अपमान केलाय. त्यामुळे तुम्ही आपल्या खासदारकीचा राजीनामा द्या. नंतर निवडून येवून दाखवा. निवडून आलात तर मी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देईन", असं आव्हान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिलंय. तसेच राजीनामा न दिल्यास त्याचे वाईट परीणाम भोगावे लागतील, असाही इशारा त्यांनी दिला आहे. तुम्हाला किती दिवस तुम्हाला केंद्र आणि राज्य सुरक्षा देणार आहे? एक दिवस तरी उघड्यावर सापडतील ना? असा धमकीवजा इशाराच खासदारांना दिलाय. गेल्या 23 तारखेला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेची सांगता शिर्डीत झाली होती. यावेळी आदित्य ठाकरेंच्या भेटीला स्टेजवर आलेले शिवसेनेचे नेते बबनराव घोलप यांचे स्वागत शिवसैनिकांनी भावी खासदारच्या घोषणा देत केलं. यावेळी तीकिट द्यायचं माझ्या हातात नाही. मात्र शिवसैनिक तुम्हाला कुठं बघताहेत? असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. गेल्या 54 वर्षांपासून मी शिवसेनेशी एकनिष्ठ असून पक्ष जी जबाबदारी देईल ती घेईन, असं म्हणत सदाशिव लोखंडे यांनी माझी वाट मोकळी करून दिल्याचं बबनराव घोलप म्हणत आहेत. दरम्यान, शिवसेना आणि शिंदे गटाची कोर्टात सुरू असलेली लढाईचं काय होणार? यावर पुढच्या अनेक गोष्टी अवलंबून आहेत. मात्र आता सदाशिव लोखंडेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याने त्यांना शिवसेनेची पुन्हा उमेदवारी मिळणं तर जवळपास अशक्य आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत खासदार सदाशिव लोखंडे भाजपाचे उमेदवार असण्याची जास्त शक्यता आहे. कदाचित तोच शब्द त्यांना दिला गेला असल्याने त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Eknath Shinde, Shiv sena, Uddhav thackeray

पुढील बातम्या