अहमदनगर, 17 सप्टेंबर : नेता कसा असावा? असा प्रश्न विचारला तर प्रत्येकजणाचं वेगवेगळं उत्तर असेल. पण या सगळ्या उत्तरांमध्ये एक मत सारखंच असेल की नेता सर्वसामान्यांमधला, त्यांच्या समस्या जाणून घेणारा, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होणारा, आपल्याला आपलं मानणारा असावा. महाराष्ट्राने देशाला अनेक दिग्गज नेते दिले. महाराष्ट्राला चांगली राजकीय संस्कृती राहिलेली आहे. नेतेमंडळी आणि जनता यांचं थेट नातं आहे. इथले नेते हायप्रोफाईल राहणं बाजूला सारतात आणि जनतेत जावून त्यांच्यासारखं जीवन जगणं पसंत करतात. जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी नेतेमंडळी राज्यभरात दौरे करतात. त्यामुळे असे नेते लोकांच्या मनात चांगलं स्थान निर्माण करतात. अहमदनगरमध्ये आज अशाच एका मोठ्या नेत्याने अनेकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ते नेते म्हणजे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील!
राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगरमधील मोठं नाव आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. विखे पाटील सध्या राज्याचे महसूल मंत्री आहेत. पण मंत्रीपदाचा कोणताही बडेजाव न करता जनतेसाठी तत्पर असण्याच्या त्यांच्या संवेदनशील स्वभावाचं आज अनेकांना दर्शन झालं. ते रस्त्याने जात असताना अचानक वाहतूक कोंडी झाली. त्यांनी सुरक्षा रक्षकांकडे चौकशी केली असता रस्त्यावर अपघात झाल्याचं त्यांना समजलं. अपघाताची माहिती मिळताच राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला ताफा बाजूला केला. ते ताफा सोडून रस्त्यावर आले आणि त्यांनी अपघातग्रस्तांची विचारपूस केलं. त्यांना सुखरुप रुग्णालयात पाठवलं आणि वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. जोपर्यंत वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत होत नाही तोपर्यंत ते रस्त्यावर थांबले होते. त्यामुळे त्यांच्या संवेदनशील स्वाभावाबद्दल अहमदनगरमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.
महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज अहमदनगरमधील पांढरी पुलावरुन प्रवास करत असताना अपघात, विखे पाटलांनी स्वत:चा ताफा सोडून केली अपघातग्रस्तांना मदत, वाहतूक सुरळीत करण्यासही केली मदत #radhakrishnavikhepatil #Maharashtra pic.twitter.com/mBpsmp89FZ
— News18Lokmat (@News18lokmat) September 17, 2022
(विदर्भ दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंना भेटला आवडता पाहुणा, पाहा Video)
राधाकृष्ण विखे पाटील आज अहमदनगरमधील एक कार्यक्रम आटोपून लोणीकडे जात होते. या दरम्यान पांढरी पुलाजवळ अपघात घडला. एका कार आणि कंटेनरमध्ये अपघात घडला. या अपघातात दोन जण जखमी झाले. अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती. अपघाताची माहिती मिळताच राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेळेचा विलंब न करता अपघातग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आणि वाहतूक सुरळीत केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.