प्रियांका बोबडे, प्रतिनिधी
अहमदनगर, 21 मार्च: कोरोना काळात शाळा ऑनलाईन झाल्या होत्या. विद्यार्थी जास्त प्रमाणात मोबाईल वापरू लागले. त्यांचा स्क्रिनिंग टाईम वाढला. बऱ्याचदा मोबाईल हातात आला की मुलं अभ्यासाऐवजी सोशल मीडियाच्या आहारी जातात. त्यांचं पुस्तक वाचन फार कमी होतं. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून अहमदनगरमधील जिल्हा परिषद शाळेने अनोखा उपक्रम राबविला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमातून मुलं केवळ पुस्तकंच वाचत नाहीत तर ती साहित्य समीक्षा करत आहेत.
झापवाडीची आदर्श जिल्हा परिषद शाळा
नेवासे तालुक्यातील झापवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. इयत्ता चौथी ते सातवीदरम्यान शिकणाऱ्या मुला- मुलींना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी अनोखा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी कथा व कादंबरीचे वाचन केले. त्यानंतर त्याची समीक्षा लिहिली. शाळेने या समीक्षांचे हस्तलिखित तयार केले आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळेत केलेला हा तसा पहिलाच प्रयोग असून चिमुकल्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
समीक्षा करणे हा प्रत्येकाचा स्थायीभाव
समीक्षा करणे हा प्रत्येक मनुष्याचा स्थायीभाव आहे. एखाद्या गोष्टीकडे पाहताना त्यातील गुणदोष ओळखण्याची व मूल्यमापन करण्याची वृत्ती मुलांमध्ये निर्माण व्हावी, या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला . यामुळे मुलांमध्ये चिकित्सक दृष्टी निर्माण झाली. साहित्याची आवड निर्माण होऊन त्यांची भाषा समृद्ध व्हायला या उपक्रमाचा फायदा होणार आहे. असे उपक्रम सर्व शाळा मध्ये राबवले तर मुलांच्या ज्ञानात भर पडणार आहे.
सहावीतील शास्त्रज्ञ! मियावाकी पद्धतीनं करतोय झाडं लावण्यावर संशोधन, पाहा Video
साहित्यिक डॉ संजय कळमकर यांची संकल्पना
साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या संकलपनेतून हा उपक्रम राबण्यात आला. यात सर्व विद्यार्थी तर सहभागी झालेच पण शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचं विदर्थ्याना मार्गदर्शन मिळालं . लवकरच या हस्तलिखित साहित्य समिक्षाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा उपक्रम सर्वांसमोर आणला जाणार आहे. त्यामुळे आता लहान वयातच चांगले समीक्षक तयार होतील, असे डॉ. कळमकर म्हणतात.
विद्यार्थ्यांनी वाचली ही पुस्तके
समीक्षा म्हणजे काय, हे सांगून शिक्षकांनी या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचायला 'प्रकाशवाटा' द मा मिरासदार यांचे 'माझ्या बापाची पेंड' त्यात प्रकाश आमटे यांचे ' प्रकाश वाटा' पुस्तक तसेच जन्म हे विनोदी कथासंग्रह, राजीव तांबे यांचे 'गंमत शाळा', साने गुरुजी यांचे 'श्यामची आई', गो. नी. दांडेकर यांचे 'पडघवली', रणजित देसाई यांचे 'पावनखिंड' कुसुमाग्रज यांचे 'समिधा', स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे 'काळे पाणी', सुधा मूर्ती यांचे 'माणसांच्या गोष्टी', रघुवीरसिंह राजपूत यांचे 'झाशीची राणी लक्ष्मीबाई, मारुती चितमपल्ली यांचे 'रातवा' आदी साहित्यकृतींचा समावेश होता. विशेष म्हणजे या साहित्यकृतीत मुलांनी त्यांना न समजलेले शब्द व वाक्यांचा स्वतंत्र विचार केला, त्याचे अर्थ जाणून घेतले.
Ahmednagar News: छोट्या शेतकऱ्यांची कमाल, खडकाळ माळावर फुलवली शेती, पाहा Photos
या विद्यार्थ्यांनी केले समीक्षण
साहित्य समीक्षा या हस्तलिखितात मध्ये समृद्धी काळे, ज्ञानेश्वरी जरे, प्रमोद आवारे, वैभव झरेकर, अश्विनी वाघ, सानिका काळे, अनुजा जरे, आदित्य ससे, सार्थक जरे, साक्षी जरे, श्रुती ठोंबरे, रेणुका आवारे, ओंकार वाघ, वेदांत काळे, सायली वाघ, प्रेरणा शिंदे, दीप्ती काळे, मयूरी वामन, कार्तिकी झरेकर, भक्ती जरे, उत्कर्षा जरे, देवयानी मोरे, तनुजा जरे, गौरी वाघ, सुनील कुलकर्णी आदी मुलामुलींनी विविध साहित्यकृतींचे समीक्षण केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Ahmednagar News, Education, Local18, School