शिर्डी, 26 ऑक्टोबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या दिपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. या निमित्ताने राज्यातील तीन प्रमुख तीन नेते पहिल्यांदाच एका मंचावर उपस्थित होते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मनसेसोबत शिंदे गटाची जवळीक वाढत चालली आहे, असे दिसत आहे. दरम्यान, यानंतर आता आणखी शिंदे गटातील मंत्र्यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.
शिंदे-फडणवीस सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असल्याने या सरकारचा जनाधार वाढत आहे. या युतीत मनसे येत असेल तर दिलसे स्वागत करायला आम्ही तयार असल्याचे सूचक वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे लोकांसाठी काम करून निर्णय घेत आहे.
महायूतीत कोणाला घ्यायचे याचा सर्वस्वी अधिकार पक्षश्रेष्ठींचा असून राजसाहेब ठाकरे यांच्या विकासाच्या भूमिकेचे आम्ही स्वागतच केले आहे. जनाधार लाभलेल्या या युतीत जर मनसे सहभागी होत असेल तर त्यांचे दिलसे स्वागतच करू, असे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
ई-पीक पाहणीची अट तात्पुरती रद्द -
राज्यातील अतिवृष्टीत बाधीत झालेल्या शेतीच्या पंचनाम्यासाठी असलेली ई-पीक पाहणीची अट महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रद्द केली आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन दिवस अतिवृष्टीत नूकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहाणीची अट रद्द करावी, अशी मागणी केली होती.
हेही वाचा - आमची सर्वांची मनं जुळलेली, फक्त वरुन तारा जुळल्या..." महायुतीवर मनसे आमदाराचं मोठं वक्तव्य
तांत्रिक अडचणीमुळे लाखो शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले होते, यामुळे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर्षी ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर तलाठी कृषी सहायक यांना प्रत्यक्ष जावून पंचनामे करावे लागतील. मात्र, कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही, हीच सरकारची भूमिका असल्याचे मंत्री विखे पाटील, यांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने पीक विमा कंपनी सुरू करून योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी केली होती. याचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र, नंतर यामध्ये खासगी कंपन्याचा शिरकाव कसा झाला, याची चौकशी आपण करणार असून शेतकऱ्यांची आणी सरकारची होणारी लूट आणि फसवणूक थांबविण्यासाठी कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेवून पीक विमा योजनेत अमूलाग्र बदल करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Cm eknath shinde, Devendra Fadnavis, Radha krishna vikhe patil, Raj Thackeray