साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहमदनगर, 15 फेब्रुवारी : राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार असले तरी स्थानिक पातळीवर भाजप-शिंदे गटात सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर शहरात शिंदे गटाच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डीले आणि शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते यांच्या एका लग्नात झालेल्या वादाचे रुपांतर थेट दगडफेकीत झाले आहे. काय आहे प्रकरण? भाजपचे नेते माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डीले आणि शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांचा मुलगा ओंकार सातपुते यांचा एका लग्नात वाद झाला होता. या वाद विकोपाला गेल्याने मंगळवारी रात्री भाजपच्या कार्यकर्त्यांनी सातपुते यांच्या केडगामधील हॉटेलची तोडफोड केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या दगडफेकीमुळे अहमदनगर-पुणे महामार्गावर बराच वेळ तणावाची परिस्थिती होती. कर्डीले समर्थकांनी सातपुते यांच्या रंगोली हॉटेलवर दगडफेक केल्यानंतर सातपुतेंच्या समर्थकांनी देखील त्यांना प्रत्युत्तर देत दगडफेक केली. त्यामुळे काही काळ नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्यात अक्षय कर्डीले यांच्यासह 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ओंकार सातपुते यांच्यासह इतरांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वाचा - Eknath Shinde vs Uddhav Thackeray : तारीख पे तारीख.. सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी, आज काय झालं? भाजप- शिंदे गटात धुसफूस? नुकतेच शिंदे गटाचे कृषी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगरपरिषदेच्या करवाढी विरोधात भाजपने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मागील आठवड्यात भाजपने डफडे वाजवा आंदोलन करत इशारा दिला होता. यानंतर सोमवारी (13 फेब्रुवारी) भाजपाने सिल्लोड नगरपरिषदेच्या करवाढी विरोधात कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले होते. या बंदला व्यापाऱ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे सिल्लोड शहरात भाजप विरुद्ध सत्तार हा संघर्ष आता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये ऑल इज नॉट वेल अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
सिल्लोड नगर परिषदेने प्रस्तावित केलेल्या करवाढी विरोधात भाजपतर्फे 26 जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. प्रस्तावित करवाढ ही चुकीच्या पद्धतीने लावलेली असून ती पूर्णपणे बेकायदेशीर असल्यामुळे हा कर रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात 6 फेब्रुवारी रोजी भाजपतर्फे ढोल बजाव आंदोलन देखील करण्यात आले होते. आंदोलनानंतर देखील नगर परिषद प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे आज भाजपतर्फे सिल्लोड बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला व्यापाऱ्यांचा देखील मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला आहे.