अहमदनगर, 5 जुलै: दुसरे पेशवे बाजीराव यांच्या कालखंडातील एक शूर, धाडसी, हजरजबाबी, कल्पक व कर्ता सरदार म्हणून त्रिंबकजी डेंगळे यांची ख्याती होती. इंग्रजांचा कावा ओळखून त्रिंबकजिंनी अठरा वर्षे इंग्रजांविरध्द बंड पुकारून मराठेशाही वाचविण्यासाठी प्रयत्न केला. अहमदनगर जिल्ह्यातील निमगाव जाळी गावातील सामान्य कुटुंबात जन्मलेल्या त्रिंबकजी डेंगळे यांनी केलेल्या संघर्षाविषयी व त्यांच्या ऐतिहासिक वाड्याविषयी आपण संशोधक सुमित डेंगळे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. निष्ठावंत सरदार त्रिंबकजी डेंगळे त्रिंबकजी डेंगळे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील निमगाव जाळी या गावचे होते. शेतकऱ्याचा मुलगा ते पेशव्यांचा कारभारी असा टप्पा त्रिंबकजींनी गाठला होता. त्रिंबकजी सुरुवातीला दुसऱ्या बाजीरावाच्या पदरी हेर अथवा जासूद होते. 1802 साली यशवंतराव होळकरांनी पुण्यावर स्वारी केल्यावर पेशवे महाडला पळून गेले. तेव्हा त्रिंबकजी त्यांच्यासोबत होते. कर्तव्यनिष्ठेमुळे व स्वामीनिष्ठेमुळे कालांतराने त्रिंबकजी बाजीरावांचे विश्वासू सरदार बनले.
मराठेशाहीतील ब्रिटिश हस्तक्षेपास विरोध पेशव्यांच्या कारभारावर 1802 च्या वसई तहामुळे इंग्रजांचा प्रभाव वाढू लागला. मराठी राज्यात झालेला इंग्रजांचा हस्तक्षेप त्रिंबकजींना पहावत नसे. त्यांनी सर्व मराठी सरदारांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शिंदे, होळकर, भोसले, पेंढारी यांच्याकडे त्यांनी आपले वकील पाठवले आणि फौजेची जमवाजमव सुरू केली. 1814 ला त्रिंबकजी अहमदाबादचे सुभेदार झाले व पुढे त्रिंबकजी पेशव्यांचे कारभारी झाले, असे सुमित यांनी सांगितले. गंगाधरशास्त्री खून प्रकरण 1814 साली बडोद्याहून गायकवाडांचे दिवान गंगाधरशास्त्री पटवर्धन पुण्यात आले. गायकवाडांची पेशवे सरकारकडे पुष्कळ थकबाकी होती. तसेच गुजरातेतील काही सुब्यांचा प्रश्न होता. वर्षभरापासून त्या वाटाघाटी चाललेल्या होत्या. गंगाधरशास्त्री यांच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांनी घेतलेली होती. 1815 च्या जुलै महिन्यात पंढरपुरात गंगाधरशास्त्र्यांचा खून होतो. त्याचे आरोप इंग्रज त्रिंबकजींवर करतात. वास्तविक त्रिंबकजींना गंगाधरशास्त्र्यांचा खून करून काहीही फायदा होणार नव्हता. सुरुवातीपासूनच इंग्रजांविरुद्ध गायकवाडांना आपल्या बाजूने आणण्याचा ते प्रयत्न करत होते, असे सुमित डेंगळे सांगतात. एका टांगेत ओलांडता येते नदी, पाहा काय आहे ‘अस्वल उडी’ प्रकार? ब्रिटिशांविरुद्ध युद्ध 1817 च्या उत्तरार्धात दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. खडकीच्या लढाईनंतर पेशवे ब्राह्मणवाड्यास असताना त्रिंबकजी उघडउघड पेशव्यांना फौजेनिशी मिळाले. कोरेगाव भीमाच्या युद्धात त्रिंबकजी प्रत्यक्ष सहभागी झाले होते. यानंतर दबावापोटी व भीतीपोटी पेशव्यांबरोबरच्या अनेक सरदारांनी पेशव्यांची साथ सोडून दिली. मात्र त्रिंबकजी पेशवेशाहीच्या शेवटपर्यंत पेशव्यांबरोबर होते. अखेर 3 जून 1818 ला अशीरगडाजवळील ‘धुळकोट’ येथे श्रीमंत दुसरे बाजीराव जनरल माल्कमच्या स्वाधीन झाले व मराठेशाहीचा अस्त झाला. त्यानंतर त्रिंबकजी पसार झाले. इंग्रज सरकारने त्यांना शोधण्यासाठी त्यांच्यावर इनाम लावले. त्रिंबकजी ब्रिटिश कैदेत त्रिंबकजी हे नाशिक जिल्ह्यातील सासुरवाडी अहिरगाव (ता. निफाड) येथे राहत होते. याबाबत जयाजी पाटील याने 28 जून 1818 ला इंग्रजांना माहिती दिली. कॅप्टन स्वान्स्टनच्या नेतृत्वाखालील इंग्रज फौजेने अहिरगाव येथून त्रिंबकजींना कैद केले. कैदेत असताना त्रिंबकजींची रवानगी वाराणसी जवळच्या चुनारच्या किल्ल्यात करण्यात आली. 1818 ते 1829 अशी दहा-अकरा वर्षे चुनारला कैदेत असणाऱ्या त्रिंबकजींचा अखेर 16 ऑक्टोबर 1829 ला चुनारला दुर्दैवी मृत्यू झाला. नगरचा ‘मिलेट मॅन’, घरी सुरू केली ‘भरड धान्याची बँक’! सेनापती त्रिंबकजींचे कर्तृत्व सर्वसामान्य इतिहास वाचकांना त्रिंबकजी 1815 सालच्या गंगाधरशास्त्री खून प्रकरणामुळे ज्ञात आहेत. फारतर पेशवाईच्या उत्तरार्धातील दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा एक नवखा पण विश्वासू सरदार म्हणूनही ते परिचित असतील. पण त्यांची ओळख एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम मराठी मुलखात त्यांनी उठाव घडवून आणला. स्वतःच्या राजकीय आयुष्याची पर्वा न करता पेशवाई वाचवण्यासाठी प्रयत्न केले, असे सुमित सांगतात. शिंदे-होळकर-भोसले-गायकवाड या मराठेशाहीच्या स्तंभांना एकत्रित आणण्यासाठी त्रिंबकजी धडपडले. इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन ठाण्याच्या तुरुंगातून अत्यंत चपळाईने ते निसटले. ब्रिटिशांविरुद्ध गुप्तपणे पेशव्यांसाठी फौजेची जमवाजमव केली. कोरेगावच्या लढाईत पराक्रम गाजविला आणि धुळकोटला अखेरपर्यंत पेशव्यांची साथ सोडली नाही. त्रिंबकजींचं हे कर्तृत्व महाराष्ट्राला फारसे ज्ञात नाही. त्यामुळे मराठा वीर त्रिंबकजी डेंगळे यांचा इतिहास जाणून घेण्याची गरज आहे, असे सुमित डेंगळे म्हणतात.