मुंबई, 14 डिसेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी आरोपीने फोन करून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. अखेर या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नारायण कुमार सोनी असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असून, त्याला बिहारमधून ताब्यात घेतण्यात आलं आहे. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या 'सिल्व्हर ओकवर' आरोपी गेल्या चार-पाच महिन्यांपासून सतत फोन करत होता. या प्रकरणात आता नारायण कुमार सोनी याच्याविरोधात पोलिसांनी कलम 294, 506 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीचा अजब दावा
पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता चौकशीतून धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आरोपी हा दहा वर्ष पुण्यात वास्तव्याला होता. या काळात त्याच्या पत्नीने त्याला सोडलं व दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न केलं. मात्र शरद पवार यांनी या प्रकरणात कोणतीही कारवाई न केल्यानं आपन त्यांना फोन करत होतो, असा दावा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या व्यक्तीकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा : सुषमा अंधारेंविरोधात वारकरी संघटना आक्रमक; काल शपथ तर आज तक्रार दाखल
यापूर्वीही दिली होती धमकी
दरम्यान नारायण कुमार सोनी याने यापूर्वी देखील एकदा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हा त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा त्याने शरद पवार यांच्या निवासस्थानी फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानं त्याला बिहारमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. हा व्यक्ती वेडसर असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा : अमित शाह महाराष्ट्राचे जावई, सीमावादाचे सर्वाधिक चटके त्यांच्या सासरवाडीला; संजय राऊतांचा टोला
प्रसाद लाड यांना धमकी
दरम्यान दुसरीकडे मंगळवारी प्रसाद लाड यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या पुतण्याच्या मोबाईलवर फोन करून प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sharad Pawar