मुंबई, 01 नोव्हेंबर : महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार करत भाजप आणि शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. दरम्यान शिवसेनेतील 40 आमदार फुटून गेल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट राजकीय वादातून नेहमी आमने सामने येत आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार काय करत आहेत असा सवाल सर्वच विरोधी नेते करत असल्याने सत्तार यांचा राजीनामा घ्या अशी मागणी केली जात आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. यामुळे शेतकरी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. यावरून विरोधकांकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
हे ही वाचा : पुन्हा तारीख! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला
यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या सर्व आरोपांसंदर्भात वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली तर मी बुधवारपर्यंत राजीनामा देऊ शकतो. मात्र मी राजीनामा दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील सिल्लोडमधून निवडणूक लढवून दाखवण्याची हिम्मत करावी असे अब्दुल सत्तार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी देताच मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. पण, चंद्रकांत खैरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून सिल्लोडमधून विजयी होऊन दाखवावे.
मागच्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांची जलील यांच्यामार्फत मीच विकेट घेतली होती. पण आता चंद्रकांत खैरे चांदीचा गदा घेऊन फिरत आहेत. मात्र त्यांच्या गदेचा सामना करण्यासाठी आमची ढाल तयार असल्याचंही कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणालेत.
हे ही वाचा : शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईचं काय? उज्ज्वल निकम महत्त्वाचं बोलले
तसेच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांची भेट घेऊन राज्यातील अतिवृष्टीबाबत सर्व माहिती देणार असून राज्यातील नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय पथकाने पाहणी करण्यासंदर्भात मागणी करणार असल्याचेही सत्तार म्हणाले.