मुंबई, 16 ऑगस्ट : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अशी ख्याती असलेला बडा अभिनेता आमिर खान सध्या अडचणीतून जातोय. त्याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून पडला आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीपासूनच सोशल मीडियावर या चित्रपटावर बंदीची मागणी केली जात होती. त्यावर आमिर खानने वेळोवेळी प्रेक्षकांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला. पण अखेर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. चित्रपट फ्लॉप झाल्याने आमिर खान खूप दु:खी झाला आहे. या कठीण काळात आमिर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. आमिर खान आज संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाला. यावेळी त्याने राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जवळपास एक तास आमिर शिवतीर्थावर होता, अशी माहिती समोर आली आहे. राज ठाकरे नव्या वास्तूत राहायला गेल्यापासून वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या नव्या घरी जावून भेट घेतल्याचं समोर आलं आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर देखील त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अनेक दिग्गज मंडळींनी शिवतीर्थावर जावून राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्याच कारणासाठी आमिरने राज ठाकरेंची भेट घेतल्याची शक्यता असू शकते. पण आमिर सध्या त्याचा चित्रपट फ्लॉप झाल्याने अडचणीतून जात आहे. त्यामुळे या भेटीविषयी विविध चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, आमिर खान यांच्या शिवर्तीथावरील भेटीबाबत मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवर फोटो टाकला आहे.
दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सिनेसृष्टीतील वेगवेगळे कलाकार यांचं एक वेगळं नातं आहे. सिनेकलाकारांना कधीही काही अडचणी असल्या की ते राज ठाकरे यांच्याजवळ आपल्या समस्या मांडतात. विशेष म्हणजे मनसे पूर्ण ताकदनीशी त्या समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरते. मनसे सिनेकलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंत यशस्वीच ठरली आहे. त्यामध्ये मराठी चित्रपटांनी स्क्रिनिंग मिळवण्यासाठी केलेला संघर्ष असेल किंवा पाकिस्तानी कलाकारांऐवजी भारतीय कलाकारांनी संधी देण्यासाठी मांडलेली भूमिका असेल. ( Amir Khan: लाल सिंह चड्ढाच्या अपयाची जबाबादारी कोणाची? आमिरनं दिलं स्पष्टीकरण, घेतला मोठा निर्णय ) आपल्याला न्याय मिळवण्याचे सर्व दरवाजे बंद झाले की राज ठाकरे हे शेवटचे पर्याय आहेत, असं मत अनेक बड्या सिनेकलाकारांचं आहे. विशेष म्हणजे मराठीतले बडे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काही वर्षांपूर्वी प्रसारमाध्यमांसमोर राज ठाकरेच आमचा राजा, असं विधान केलं होतं. राज ठाकरे हे कलाकारांचं आणि कलागुणांचं महत्त्व जाणतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनच त्यांना हे गुण संपादीत केल्याचं कलाकार आणि सर्वसामान्य मानतात. त्यामुळेच त्यांचं चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांसोबत चांगलं नातं आहे.