किशोर गोमाशे, प्रतिनिधी
वाशिम, 14 जानेवारी : वाळूचे टिप्पर आणि शेतीवर 90 लाखांचे कर्ज (loan) झाले होते. त्यामुळे ते फेडण्यासाठी एकाने आपल्या साथीदारांसह वाशिम (washim) येथील अडत व्यापाऱ्याच्या घरी दरोडा (robbery) टाकला होता. पण वाशिमच्या (washim police) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात वेगवान तपास करत मुख्य आरोपीसह इतर दरोडेखोरांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम शहरातील लाखाळा परिसरात असलेल्या माधव नगर येथील व्यापारी किशन देवानी यांच्या घरी 12 जानेवारीच्या रात्री 5 ते 6 अज्ञात दरोडेखोरांनी दरोड्याच्या प्रयत्न केला होता मात्र दूधवाला आणि शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला असून सर्व दरोडेखोर कारमधून पसार होण्यात यशस्वी झाले होते. या दरोड्याच्या गुन्ह्याची वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासात उकल करुन आरोपी गजाआड केले आहेत.
(संक्रातीदिवशीच नव्हे संपूर्ण हिवाळ्यात खा तिळगुळाच्या वड्या; तब्येत राहील ठणठणीत)
वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील माधवनगरमध्ये किशन शशिकांत देवानी यांचं कुटुंब राहते. ते व त्यांचे वडील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आडतचा व्यापार करतात. ते दोघेही दुकानावर असताना 12 जानेवारी 22 रोजी 7.00 वाजता दरम्यान 30 ते 40 वयोगटातील 5 ते 6 अनोळखी व्यक्ती दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जबरीने घरात घुसले आणि घरात उपस्थित असलेल्या महिलांना धारधार शस्त्राचा धाक दाखवून घरात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी दूधवाला दूध देण्यासाठी आला असता घरातील महिलांच्या ओरडण्याच्या आवाजाने दुधवाल्यांने शेजाऱ्यांना आवाज दिला त्यामुळे सर्व दरोडेखोर मोबाईल घेऊन पळून गेले.
या प्रकरणी फिर्याद वाशिम शहर पोलिसांत दिल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे,पोलीस स्टेशनचे अधिकारी,अंमलदार यांची पथकं तयार केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, अंमलदार यांची वेगवेगळी पथकं तयार करुन अंजनखेडा येथील लखन उर्फ इश्वर रामभाऊ पायघन, दोडकी येथील पुंजाजी किसन इढोळे व अंजनखेडा येथील विठठल काशीराम पायघन यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविला असता त्यांनी त्यांचे साथिदारासह गुन्हा केल्याचे कबुल केले.
(सहा जागा, 700 विद्यार्थी परीक्षेला, महाराष्ट्राचे 60 ते 70 मुलं आसाममध्ये अडकले)
आरोपी पुंजाजी इढोळे यांच्याकडे रेती व वाळुचे दोन टिप्पर आहेत. त्याने घेतलेले दोन टिप्पर व शेतीवर अंदाजे 90 लाख रुपयांचे कर्ज होते. हे काढलेले कर्ज फेडण्याकरीता तसेच शेतीवर असलेले कर्ज फेडण्याकरीता पुंजाजी इढोळे याने त्याचे साथीदारांसह एका धाब्यावर कट रचला. त्यानंतर लाखाळा येथील किशन देवानी यांचे घरात आपल्याला अंदाजे 1 ते 2 कोटी रुपये मिळतील याकरीता पुंजाजी इढोळे याने किशन देवानी यांच्या घरावर पाळत ठेवून प्लॅनिंग करत दरोडा टाकला होता.
या गुन्हयामध्ये तीन आरोपीना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेण्याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. यातील आरोपीवर जबरी चोरी, सोयाबीन चोरी, घरफोडी असे वाशिम आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यात वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल आहेत. सदर कारवाईत पोलीस अधिक्षक बच्चन सिंह,अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहाय्यक पोलीस निरक्षक अतुल मोहनकर, प्रमोद इंगळे, विजय जाधव पोलीस उपनिरक्षक पठाण, पोलिस हवालदार बाळु कंकाळ, सुनिल पवार, गजानन अवगळे, दिपक सोनावणे, किशोर चिंचोळकर, पोलीस नाइक राजेश गिरी,अमोल इंगोले, राजेश राठोड,प्रविण राऊत ,गजानन गोटे , राम नागूलकर , पोलिस शिपाई डिगांबर मोरे , शुभम चौधरी , संतोष शेणकुडे , निलेश इंगळे, चालक संदीप डाखोरे, गजानन जाधव सायबर सेल चे गोपाल चौधरी व प्रशांत चौधरी व वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने सहभाग नोंदविला. या गुन्ह्याचा पुढील तपास वाशीम शहर पोलीस करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.