Home /News /pune /

सैन्य भरतीसाठी गेलेले महाराष्ट्राचे 60 ते 70 विद्यार्थी आसाममध्ये अडकले

सैन्य भरतीसाठी गेलेले महाराष्ट्राचे 60 ते 70 विद्यार्थी आसाममध्ये अडकले

भारतीय सैन्यात नोकरी मिळावी यासाठी मिलेट्री भरतीसाठी गेलेले महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थी हे आसाममध्ये अडकले आहेत.

पुणे, 14 जानेवारी : भारतीय सैन्यात (Indian Army) नोकरी मिळावी यासाठी मिलेट्री भरतीसाठी (Military Bharti) गेलेले महाराष्ट्रातील (Maharashtra) 60 ते 70 विद्यार्थी (students) हे आसाममध्ये (Assam) अडकले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना आसाममध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या मुलांच्या जेवणाची देखील सोय आसामच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली नाही. आसाममध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकारकडे साकडं घातलं आहे. आम्हाला आसाममधून तातडीने बाहेर काढा आणि आपल्या राज्यात घेऊन चला, अशी विनंती विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सरकारला केली आहे. लष्कर भरतीसाठी गेलेल्या या विद्यार्थ्यांना आता मदतीचा हात हवा आहे. आसाममध्ये अडकलेल्या राज्यातील 60 ते 70 विद्यार्थ्यांनी मदतीसाठी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना कॉल केलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला लवकरात लवकर मदत करावी अशी विनंती विद्यार्थ्यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडे केली. त्यानंतर रुपाली पाटील यांनी आपण लगेच अजित पवार यांच्याशी संपर्क साधत माहिती दिल्याचं सांगितलं आहे. आसाममध्ये अडकलेल्या या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर राज्यात आणलं जाईल, असं आश्वासन रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिलं आहे. आसाममध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आसाममध्ये अडकलेले विद्यार्थी योगेश मोसमकर यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली. "आम्ही 3 जानेवारीला घरातून बाहेर पडलो होतो. त्यानंतर 7 जानेवारीला आसाममध्ये पोहोचलो. भारतीय लष्कराच्या आसाम रायफल्समध्ये भरतीसाठी आलो होतो. या भरतीत महाराष्ट्रासाठी 6 जागा होत्या. या सहा जागांसाठी कमीत कमी 600 ते 700 विद्यार्थी परीक्षा द्यायला आले होते. मी मुळचा रत्नागिरीचा आहे. माझ्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रभरातील विद्यार्थी आहेत. आम्ही इथे 12 जानेवारीला आलो. भरती सकाळी आठ वाजता सुरु झाली. त्यांनी आमचे स्वॅब टेस्ट घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आमच्यातील 70-80 मुलांना बाहेर काढलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला सरकारी रुग्णालयात आणून ठेवलं", असं योगेश मोसमकर या विद्यार्थ्याने सांगितलं. हेही वाचा : केंद्र सरकारचं 14 महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांना मकरसंक्रांतीच्या दिवशी गिफ्ट "आमची इथे जेवणाची देखील सोय नाही. घरात पाणी नसतं. दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजता जेवण येतं. आम्हाला जेवणही व्यवस्थित मिळत नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगा की आम्हाला आसाममधून 16 जानेवारीला शेवटची ट्रेन आहे. आम्हाला गुवाहाटीला जायला एक दिवस लागेल. ती ट्रेन जर चुकली तर आम्हाला थेट 22 जानेवारीला ट्रेन आहे. आमचे आतापर्यंत 8 ते 9 हजार रुपये खर्च झाले आहेत. आम्हाला आसाम सरकारकडून काही मदत झालेली नाही. डॉक्टर आले तर येतात. कुणालाही ताप, खोकला कोणतेही लक्षणे दिसत नाहीय. आम्ही रुपाली ठोंबरे पाटील यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांना अजित पवार यांच्यापर्यंत मदतीची विनंती करण्यास सांगितली आहे. पण अद्याप कोणतीही मदत मिळाली नाहीय. प्रचंड थंडी सुरु आहे. अनेक तरुण जमिनीवर झोपत आहेत", अशी प्रतिक्रिया योगेश मोसमकर यांनी दिली. रुपाली ठोंबर पाटील यांची प्रतिक्रिया दरम्यान, रुपाली ठोंबर पाटील यांनी देखील 'न्यूज 18 लोकमत'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना परत राज्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली. "योगेश मोसमकर या विद्यार्थ्याच्या भावाने माझ्याशी संपर्क केला. त्याने आम्ही खूप अडचणीत आहोत, असं सांगितलं. त्याने सर्व परिस्थितीची माहिती दिली. विद्यार्थ्यांचे निरोप आणि व्हिडीओ अजित पवार यांच्याकडे पोहोचवलेले आहेत. राज्य सरकारने त्यांना परत राज्यात आणण्यासाठी हालचाली सुरु केलेल्या आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील संपर्क केलेला आहे. सर्व विद्यार्थी लवकरच सुखरुप आपल्या महाराष्ट्रात येतील", अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबर पाटील यांनी दिली. हेही वाचा : 'एकदा चंद्रकांतदादांशी बोलावं लागेल', जयंत पाटलांनी उडवली खिल्ली "विद्यार्थ्यांसाठी 16 जानेवारीची रेल्वे आहे. जर ते 16 तारखेला येऊ शकले नाहीत तर महाराष्ट्र सरकारच्या त्यांना येण्यासाठी खास सुविधा करणार आहे. त्यांनी अजिबात घाबरायचं कारण नाहीय. त्यांना जेवणाचा त्रास होतोय. प्रचंड त्रासात ती मुलं आहेत. त्यांनी सोशल मीडियावरुन नंबर काढून आपल्या त्रासाबद्दल अजित पवारांना सांगण्याची विनंती केली होती. ती माहिती अजित पवारांपर्यंत पोहोचलेली आहे. अजित पवारांनी त्यासाठी आदेश दिलेले आहेत", अशी माहिती रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिली.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या