ठाणे, 23 फेब्रुवारी : नुकतीच शिवजयंती मोठ्या थाटा माटात राज्यभर साजरी केली गेली. अनेक ठिकाणी बाईक रॅली आणि कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. आणि संपूर्ण राज्य “छत्रपती शिवाजी महाराज की जय” घोषणांनी दुमदुमली मात्र ही घोषणा देणे ठाण्यातील कळव्यात काही तरुणांना महागात पडले आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्या म्हणून चक्क कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राजकीय सभा असो की कोणताही कार्यक्रम असो छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्याच जातात. त्यात शिवजयंती उत्सव म्हणजे राज्यभर छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून निघतो. ज्योत रॅली काढली जाते, बाईक रॅली काढली जाते अनेक मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळेस तर थेट आग्राच्या लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करुन महाराजांना एक आगळी वेगळी मानवंदना दिली गेली पण यांच वेळेस ठाण्यातील कळवा शहरात मात्र “ छत्रपती शिवाजी महाराज की जय” घोषणा दिल्या म्हणून थेट गुन्हा दाखल करण्याचा प्रताप ठाणे पोलिसांच्या कळवा पोलिसांनी केला आहे. (धक्कादायक! नोकरीसाठी जाळ्यात ओढळं आणि लग्नासाठी केली मुंबईच्या महिलेची विक्री) कळव्यातील जयभीम नगर ते कळवा नाकापर्यंत तुळशीराम साळवे, भिमा साळवे या तरुणांनी काही तरुणांसह बाईक रॅली काढली होती. या रॅली दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देखील दिल्या. पण यांच घोषणा आणि बाईक रॅली काढणे त्यांना महागात पडले कारण कळवा पोलिसांनी तुळशीराम साळवे, भिमा साळवे आणि इतरांवर गुन्हा दाखल केला. कळवा पोलिसांनी जो प्रताप केलाय त्यावर संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपतींच्या राज्यात महाराजांच्या घोषणा द्यायच्या नाही तर मग तालिबान दहशतवादी जिंदाबादच्या घोषणा द्यायच्या का? असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला. (रात्री 12 ते 1 दरम्यान टारगेट सेट करायचा आणि रात्री….; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 35 हून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपीला अटक) कळवा पोलिसांच्या या प्रतापामुळे पोलिसांवर आता सारवासारव करण्याची नामुष्की आली आहे. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले गेले आणि दरम्यान घोषणा दिल्या. गेल्या अशा स्वरुपाचा हा गुन्हा दाखल केला गेला. गुन्हा हा फक्त घोषणा दिल्या म्हणून नाही तर विना परवाना बाईक रॅली काढून सार्वजनिक ठिकाणी घोषणा दिल्या म्हणून गुन्हा दाखल केला गेला आहे, अशी सारवासारव पोलिसांनी केली. या विषयावर कोणीही पोलीस अधिकारी बोलायला तयार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.