मुंबई, 22 फेब्रुवारी : राजस्थानमध्ये लग्नासाठी मुली मिळत नाहीत, त्यामुळे तेथील मुलांची इतर राज्यातील मुलींशी लग्न लावली जात असल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत. लग्नासाठी तिथे मुलींची खरेदी-विक्रीही होत असल्याचा संशय आहे. मुंबईतील एका घटनेमुळे हा प्रकार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटमध्ये महाराष्ट्रीयन महिलांना पोलिसात नोकरी देण्याचं आमिष दाखवून राजस्थानमध्ये लग्नासाठी विकलं जात असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका 27 वर्षांच्या महिलेची सुटका केली असून, नवरदेवाला अटक केली आहे. ही महिला एका मुलाची आईदेखील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राजस्थानमध्ये अशाच प्रकारे आणखी एक महाराष्ट्रीयन महिला अडकलेली असल्याचा संशय आहे. मास्टरमाइंड पकडला गेल्यानंतर अशी आणखी प्रकरणं उघडकीस येण्याची शक्यता आहे.’ ‘मिड-डे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काय आहे प्रकरण? भारतातील सर्व राज्यांच्या तुलनेत राजस्थान हे सर्वांत कमी लिंग-गुणोत्तर असलेलं राज्य आहे. तिथे मुलींची संख्या लक्षणीयरित्या कमी आहे. परिणामी, लग्नासाठीदेखील लवकर मुली मिळत नाहीत. याच गोष्टीचा फायदा घेऊन व्यवसायानं ट्रक ड्रायव्हर असलेला आरोपी दिनेश पुरी महिला आणि मुलींच्या विक्रीचं रॅकेट चालवत होता. महिला आणि मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तो इन्स्टाग्रामचा वापर करत असे. या प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी राजस्थानमधील बारमेर येथील रहिवासी चेतन भारती (वय 32 वर्षे) या व्यक्तीला अटक केली आहे. चेतन भारतीनं दिनेश पुरीला दोन लाख रुपये देऊन लग्नासाठी एक 27 वर्षांची महिला खरेदी केली होती. प्रेम, लग्न, मग ब्लॅकमेल, निक्की यादव खून प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट अर्नाळा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी पुरी यानं नोव्हेंबरमध्ये संबंधित महिलेला आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. ती विरारमध्ये तिची मुलगी आणि पालकांसोबत राहात होती आणि मीरा रोड येथील रुग्णालयात काम करत होती. पुरीनं तिला ‘पोलीस प्रशिक्षणासाठी’ औरंगाबादला येण्यास सांगितलं आणि त्यानंतर तिला राजस्थानला पाठवलं. तपास अधिकारी आद्यनराव सलगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पोलिसात नोकरी मिळत असल्यामुळे या महिलेला आनंद झाला. 12 जानेवारी रोजी ती औरंगाबादला रवाना झाली. त्यानंतर पुरीनं तिला राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवून भीनमाळ स्टेशनवर उतरण्यास सांगितलं. तिथे चेतन भारती आणि इतर दोघांनी तिला स्टेशनवर उतरवून घेतलं. तिथून तिला बारमेरमधील बालोत्रा गावात नेलं.”
“भारतीनं या महिलेला राजस्थानी पोशाख घालण्यास सांगितलं तेव्हा तिला संशय आला. तोपर्यंत भारतीनं तिचा मोबाईल काढून घेतला होता, त्यामुळे तिच्याकडे बाहेर कोणाला संपर्क साधण्याचा पर्याय राहिला नाही. 16 जानेवारी रोजी तिला लग्नाच्या कागदपत्रांवर सह्या करायला लावल्या,” असं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. 5 दिवसांनी केला फोन पीडित महिलेच्या कोल्हापुरात राहणाऱ्या बहिणीनं मिड-डेला दिलेल्या माहितीनुसार, साधारण पाच दिवसांनंतर पीडितेला तिच्या बहिणीला फोन करण्यासाठी संधी मिळाली. 21 जानेवारी रोजी तिनं बहिणीच्या फोनवर फोन आला. आपण राजस्थानमध्ये अडकलो असल्याचं सांगून तिनं फोन कट केला. त्यानंतर पीडितेच्या बहिणीनं विरारमध्ये राहत असलेल्या आई-वडिलांना याबाबत माहिती दिली. पालकांनी या पूर्वीच अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. संबंधित महिला राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांच्या नेतृत्वाखाली एपीआय अर्जुन पवार, एएसआय जनार्दन मते, पोलीस हवालदार राहुल कदम यांचा समावेश असलेलं पथक राजस्थानला रवाना झालं. तोपर्यंत ही महिला भारती कुटुंबाच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाली होती. बाहेर पडल्यानंतर तिनं तिच्या बहिणीला फोन केला. त्यानंतर बहिणीनं पोलिसांशी संपर्क साधून पीडितेचं लोकेशन सांगितलं. धीरेंद्र शास्त्री यांचा भाऊ निघाला गुंड? पिस्तुल दाखवून दलित कुटुंबाला धमकावल्याचा आरोप दुर्दैवानं, पोलीस तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच भारती आणि त्याच्या मित्रांनी तिचा माग काढला. तिला पुन्हा घरी नेऊन कोंडून ठेवलं. 28 जानेवारी रोजी, अर्नाळा पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं भारतीच्या घरावर छापा टाकला आणि महिलेची सुटका केली. एका अधिकाऱ्यानं सांगितलं, “आम्ही चेतन भारतीला अटक केली आहे. त्याच्या साथीदारांना पकडणार होतो पण, गावकऱ्यांनी गोंधळ घातला आणि त्यांना पळून जाण्यास मदत केली.” चेतन भारतीनं ही महिला खरेदी करण्यासाठी मुख्य आरोपी पुरी याला एक लाख रुपये दिले होते. पुरीनं आणखी एका महाराष्ट्रीयन महिलेला बंदी ठेवलं आहे आणि तो तिच्यासाठी नवरदेवाचा शोध घेत आहे, अशी माहिती अधिक तपासात समोर आली आहे. “दिनेश पुरी, त्याचे वडील मसर आणि त्याचा नातेवाईक भावेश यांनी आपले मोबाईल बंद केले आहेत. ते राजस्थानमध्ये लपले असल्याचा आम्हाला संशय आहे. आम्ही त्यांना लवकरच अटक करू,” असं पोलीस अधिकारी म्हणाले.