अंबरनाथ, 04 नोव्हेंबर : मोबाईलमधल्या (mobile app) एका अॅपवरील चर्चेला बळी पडून बदलापुरात (badlapur) राहणाऱ्या एका 13 वर्षीय मुलांने चक्क घरातून पलायन करून गोवा (goa) गाठल्याची घटना समोर आली आहे. काही तरी करून दाखवायचं या हेतूने तो घराबाहेर पडला होता, मात्र या सगळ्याला मोबाईलवरील अॅप कारणीभूत ठरला. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांच्या विशेष पथकाने ठाणे सायबर सेलची मदत घेत अखेर या मुलाला गोव्यातून परत आणत बदलापूर धील त्याच्या कुटुंबीयांच्या सुखरूपपणे स्वाधीन केले आहे.
तरुणांसाठी विशेषतः अल्पवयीन मुलांसाठी मोबाईल आणि मोबाईलवरील अॅप किती धोकादायक असू शकतात,याचा प्रत्यय बदलापूर मधील एका कुटूंबाला आला आहे. बदलापुरात राहणारा 13 वर्षाचा अल्पवयीन मुलगा "डिस्कॉर्ट"या अॅपवरील ग्रुप सदस्यांचा चर्चेला बळी पडून ३१ ऑक्टोबरला घर सोडून थेट गोव्याला गेला. 'वर्षभराने घरी परत येतो' असं सांगून हा मुलगा घराबाहेर पडला होता. तो मस्करी करत असावा, असं आधी घरच्यांना वाटलं. पण तो रात्री उशिरापर्यंत खरोखर घरी आला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त पालकांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली.
दरम्यान पोलीस तपास करत असताना त्यांना 'डिस्कॉर्ट' (discort app) या ऑनलाइन संकेतस्थळाची माहिती मिळाली. या संकेतस्थळावर 'रनअवे अँड गेट अ लाइफ' नावाचा ग्रुप आढळला. या ग्रुपमध्ये घरातून पळून जाण्याबाबत चर्चा केली जात होती. तसंच घरातून पळून जाण्यासाठी विविध प्लॅन देखील येथे आखले जात होते. याच चर्चेला बळी पडून संबंधित मुलगा गोव्याला पळून गेल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत मुलाचा शोध घेतला आहे.
BREAKING : अनिल देशमुखांच्या मुलाला ईडीने बजावला समन्स, उद्या चौकशीला बोलावले
हा मुलगा गोव्यातील कलंगुट येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गोव्याला जाऊन मुलाला ताब्यात घेतलं आहे. यामध्ये गोवा पोलीस, ठाणे सायबर सेलने बदलापूर पोलिसांना मदत केली. संबंधित मुलाचं अपहरण झालं असावं, अशी शक्यताही सुरुवातीला पोलिसांकडून वर्तवण्यात आली होती. १३ वर्षीय मुलगा थेट गोव्यात आढळल्यामुळे पोलीसही हादरले आहेत. बदलापूर पोलिसांनी सोमवारी संबंधित मुलाला गोव्यातून ताब्यात घेतलं आणि आज गुरुवारी त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले.
विशेष म्हणजे, हा मुलगा एकुलता एक आहे. घरात त्याला एकटेपणा जाणवल्याने त्याने हा निर्णय घेतला. त्यामुळे आई वडिलांच्या देखील मुलांना वेळ देत त्यांच्याशी संपर्क ठेरवण्याची गरज असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी सांगितले आहे.
कंपनीकडून तुम्हाला काय मिळालं दिवाळी गिफ्ट? गुजरातमधील या कर्मचाऱ्यांना तर...
या आधी देखील मोबाईलवरील धोकादायक अॅपमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. त्याची गंभीर दखल घेत केंद्रे सरकारने अशा अॅपवर बंदी घातली आहे. मात्र, अजूनही नवनवीन अॅप मुलांना भुरळ घालून त्यांच्याकडून काही तरी जीवघेणे करून घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, आशा अॅपवर पुन्हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश मोरे यांच्या पथकाने या अल्पावयीन मुलाला शोधून काढण्यात विशेष मेहनत घेतली.
दरम्यान, मोबाईलवरील अॅपला बळी पडून परराज्यात गेलेल्या या मुलाला आपली चूक लक्षात आली आहे. त्याने इतर मुलाला या मोबाईल वरील अॅपला बळी न पडता असे काही जाणवल्यास घरच्यांना आणि पोलिसांना संपर्क करावा असे आवाहन केले आहे.
आणखी एक मुलगा घर सोडून आला!
धक्कादायक म्हणजे, या मुलासोबत मोबाईल अॅपच्या ग्रुपमधील सदस्य असलेला परराज्यातील आणखी एक अल्पवयीन मुलगाही घर सोडून आला होता. या दोघांनी आधी तिथे पोहोचून ग्रुपमधील इतर सदस्यांना राहण्यासाठी काही अनाथाश्रम सुद्धा शोधले. विशेष म्हणजे, या मुलाच्या मोबाईल फोनमध्ये सिमकार्ड नव्हते, तो जिथे वायफाय मिळेल, तिथून घरच्यांना आपली माहिती देत होता. त्यामुळे या मुलाला शोधण्यात अडचणी येत होत्या. अखेर वापरत असलेल्या नेटच्या आयपी ऍड्रेस वरून या मुलाचा शोध घेऊन तो गोव्यात असल्याची माहिती मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.