सातारा, 31 डिसेंबर: सातारा (Satara) जिल्ह्याच्या पाटण (Paatan) तालुक्यातील ढेबावाडी माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका नराधमाने 7 वर्षाच्या चिमुकलीसोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. नराधम आरोपीनं पीडित मुलीच्या शरीराचे लचके तोडून तिची निर्घृण हत्या (Minor girl rape and murder) केली आहे. बुधवारी रात्री गावाशेजारील डोंगरातील दरीत चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक (Accused arrested) केली आहे. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता, त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संतोष चंद्रू थोरात असं अटक केलेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. तो पाटण तालुक्यातील ढेबावाडी या गावातीलच रहिवासी आहे. पीडित मुलगी देखील याच गावातील रहिवासी असून ती इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पीडित मुलगी खेळायला बाहेर गेली होती. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नसल्याचं आजीच्या लक्षात आलं. त्यामुळे पीडित मुलीच्या आजीने आणि तिच्या घरच्यांनी तिची सर्वत्र शोधाशोध केली. पण तिचा काहीही थांगपत्ता लागला नाही. हेही वाचा- चिमुरडीवर अत्याचाराने कोर्टही संतापलं; 68 वर्षीय म्हाताऱ्याला दिली भयंकर शिक्षा शेवटी कुटुंबीयांनी पाटण पोलीस ठाण्यात जाऊन अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. संबंधित घटना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील असल्यानं, पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत कसून तपास केला. यावेळी गावातील एकावर संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याचा कसून तपास केला असता, आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. हेही वाचा- बापानेच केला अल्पवयीन लेकीवर अत्याचार, गरोदर राहिल्यावर लावले लग्न 7 वर्षीय पीडित मुलगी खेळायला गेली असता, आरोपीनं पीडित मुलीचं अपहरण करून तिच्यावर अमानुषपणे बलात्कार केला आहे. यानंतर आरोपीनं आपलं काळं कृत्य उघडकीस येऊ नये, म्हणून चिमुकलीची गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, ढेबेवाडी गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे गावात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या घटनेचा पुढील तपास पाटण पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







