नवी दिल्ली, 14 एप्रिल : कोरोना व्हायरच्या दुसऱ्या लाटेचा भारतात कहर सुरू आहे. गेल्या दहा दिवसांपासून दररोज 1 लाखहून अधिक नवे कोरोनाग्रस्त आढळत आहेत. संशोधकांनुसार, असे काही संकेत आहेत, ज्याआधारे असं म्हटलं जाऊ शकतं की, व्यक्तीला कोरोना होऊन गेला परंतु त्याला समजलंच नाही. डॉक्टरांनी याबाबत बोलताना सांगितलं की, यापैकी काही लक्षणं लाँग कोविडच्या रुपात काही महिन्यांपर्यंत टिकून राहू शकतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, डॉक्टर आणि संशोधकांचं असं म्हणणं आहे की, एक मोठी संख्या अशा काही लोकांचीही आहे, ज्यांना कशातरी कारणाने कोरोना झाला, परंतु त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली नाही किंवा काही लोकांनी कोरोनाची लक्षणं न दिसल्याने टेस्टच केली नाही. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत अधिकतर लोक अशाही लक्षणांचे आहेत, ज्यांना सर्दी-खोकला आणि तापाव्यतिरिक्त, पोटदुखी, डोकेदुखी, लाल डोळे अशी लक्षणं दिसली. मागील वर्षात लक्षण नसणाऱ्या लोकांची संख्या अधिक होती.
(वाचा - सरकारी रुग्णालयातून कोरोना प्रतिबंधक लसीची चोरी, लस चोरीची देशातील पहिलीच घटना )
अनेकदा व्हायरल इन्फेक्शनमुळे डोळे लाल होतात. परंतु कोरोना इन्फेक्शन झाल्यास, डोळे लाल होण्यासह, डोकेदुखी आणि ताप ही लक्षणंही दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणं यापूर्वी कधी दिसली असतील, तर ते कोरोनाचे संकेत असू शकतात. अतिशय थकवा येणं हेदेखील कोरोनाचं लक्षण असू शकतं. त्यामुळे कधी तीन ते चार दिवसांपर्यंत अतिशय थकवा जाणवला असेल, दररोजची कामं करणंही कठिण वाटत असेल किंवा संपूर्ण शरीर दुखत असेल तर हादेखील कोरोनाचा संकेत ठरू शकतो, की तुम्हाला कोरोना झाला पण तो समजलाच नाही.
(वाचा - WhatsApp वरूनसुद्धा कोरोना लशीसाठी नोंदणी करता येते का? )
कोरोना संक्रमणामुळे लोकांच्या स्मृतीवरही परिणाम होत आहे. त्याशिवाय काही लोकांना कन्फूजन, असंतुलन आणि एकाग्र होण्यासाठीही समस्या येत आहेत. या स्थितीला मेडिकल टर्ममध्ये ब्रेन फॉग असं म्हणतात. गेल्या काही दिवसांत फोकस राहण्यासाठी समस्या आल्या असतील, गोष्टी आठवत नसतील तर अशी काही लक्षणं कोरोनाच्या संक्रमणामुळेही असू शकतात. कोरोना संक्रमण केवळ श्वसनतंत्रालाच नाही, चर पचनसंस्थेवरही परिणाम करत आहे. रिसर्चनुसार, असे काही लोक आहेत, ज्यांना सर्दी-ताप-खोकला यापैकी काहीच झालं नाही. परंतु त्यांना डायरिया, मळमळ, पोटात गोळा आल्यासारखं होणं, भूक न लागणं अशी लक्षणं दिसली, परंतु ते निदान करू शकले नाहीत. श्वास घेण्यास त्रास होणं, ही देखील कोरोना व्हायरससंबंधी गंभीर समस्या आहे. श्वास घेण्यास त्रास होण्यासह, छातीत जडपणा किंवा अडकल्यासारखं झालं असेल, तर हेदेखील कोरोना इन्फेक्शनचे संकेत ठरू शकतात.