Home /News /lifestyle /

Explainer:लहान मुलांमधील लठ्ठपणा धोकादायक! जाणून घ्या काय आहे डॉक्टारांचं म्हणणं

Explainer:लहान मुलांमधील लठ्ठपणा धोकादायक! जाणून घ्या काय आहे डॉक्टारांचं म्हणणं

बदलत्या जीवनशैलीचे (Lifestyle) दुष्परिणाम मोठ्या व्यक्तींसह लहान मुलांवरही (Children) दिसून येत आहेत. लहानपणापासून लागलेल्या खाण्याच्या चुकीच्या सवयी मुलांच्या आरोग्यावर (Health) प्रतिकूल परिणाम करताना दिसत आहेत.

मुंबई,12ऑक्टोबर:   बदलत्या जीवनशैलीचे (Lifestyle) दुष्परिणाम मोठ्या व्यक्तींसह लहान मुलांवरही (Children) दिसून येत आहेत. लहानपणापासून लागलेल्या खाण्याच्या चुकीच्या सवयी मुलांच्या आरोग्यावर (Health) प्रतिकूल परिणाम करताना दिसत आहेत. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढताना दिसत आहे. सातत्यानं टीव्ही बघणं, कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलवर गेम खेळणं या कारणांमुळे शारीरिक हालचाल (Physical Activity) कमी होत असून, यामुळे मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक व्याधी (Disease) वाढताना दिसत आहेत. त्यामुळे लहान वयातच डायबेटिस, ब्लड प्रेशर सारख्या व्याधी मुलांना होत आहेत. या समस्येवर आतापर्यंत जगभरातील अनेक संशोधन संस्थांनी संशोधन केलं आहे. जी मुलं टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल पाहात जेवण करतात, त्या मुलांमध्ये काही कालावधीनंतर अन्नपदार्थबाबत आवडी-निवडी निर्माण होतात, तसेच ही मुलं छोट्याश्या गोष्टींवरुन चिडचिड करु लागतात, असं संशोधनातून दिसून आलं आहे. 10 वर्ष वयापर्यंतची जी मुलं टीव्ही पाहत जेवण करतात, त्यांच्यामध्ये लठ्ठपणा निर्माण होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते असंही संशोधन सांगतं. एकूणच या समस्येचा आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेणारी माहिती `दैनिक भास्कर`ने दिली आहे. `इनव्हायरमेंटल जर्नल ऑफ हेल्थ` नावाच्या प्रसिध्द नियतकालिकाने मुलांच्या खाण्याच्या सवयीवर (Habit) संशोधन केलं आहे. तसेच जगभरातील अनेक संशोधकांनी यावर प्रकाश टाकला आहे. जी मुलं आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत गप्पा मारत जेवण करतात, त्यांच्यात लठठपणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी असते.
लठ्ठपणा येण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यात अनुवंशिकता, जीवनशैली आणि बायोलॉजिकल कारणांचा समावेश असतो. जी मुलं शरीराच्या गरजेपेक्षा अधिक कॅलरी घेतात आणि पुरेसा व्यायाम (Exercise) करत नाहीत, त्यांना लठठपणाचा सामना करावा लागतो. सध्याच्या काळात बहुतांश मुलं बहुतांश वेळ टीव्ही पाहण्यात घालवतात. त्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यातच टीव्ही पाहताना ते जंक फूडचं (Junk Food) सेवन करतात, आणि त्यामुळे त्यांचं वजन वाढतं. (हे वाचा:आश्चर्य! 9 महिने नाही, फक्त 8 मिनिटांची प्रेग्नन्सी; काही क्षणात जन्माला आलं बाळ) आजकाल पोषक आहाराच्या तुलनेत जंकफूड खाण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वजनासोबत शारीरिक समस्याही वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे एन्डोक्राइन किंवा न्यूरॉलॉजिकल आजारांमुळेही तसेच काही औषधांच्या सेवनानं वजन वाढताना दिसते. त्याचप्रमाणे कौटुंबिक कलह, आई-वडिलांमधील वाद, तणाव याचा मुलांवर मानसिक परिणाम होऊन त्यांचे पर्यवसान लठ्ठपणात होताना दिसते. मात्र अधिक वजनामुळं अनेक गंभीर शारिरीक व्याधी निर्माण होतात आणि लहान वयातच मुलांना त्यांचा सामना करावा लागतो. बायोमेड सेंट्रल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका सर्व्हेनुसार, मागील काही वर्षांपासून लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढताना दिसत असून आता या समस्येनं गंभीर रुप धारण केलं आहे. भारतात 10 ते 12 टक्के मुलं लठठपणाचा सामना करत आहेत. 2030 पर्यंत एकूण लोकसंख्येच्या निम्मी मुलं हे वाढलेल्या वजनामुळं त्रस्त असतील. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार, मागील 50 वर्षात भारतीय मुलांमध्ये तेलकट पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण 20 टक्क्यांनी वाढले आहे. कॅंडी, चॉकलेट, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, मिठाई आदी पदार्थ खाणाऱ्या मुलांमध्ये 11 ते 20 वर्ष वयोगटातील मुलांची संख्या सुमारे 80 टक्क्यांवर पोहोचली आहे. याबाबत पारस हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ मनीष मनन यांनी सांगितले की ``5 वर्ष आतील वयोगटातील मुलांना चूक काय बरोबर काय यातील फरक समजत नाही. ही मुलं जे बघतात, त्याचे अनुकरण करतात. अनेकदा मुलं कार्टून प्रमाणे (Cartoon) बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांची बोलण्याची प्रक्रिया उशीरा सुरू होते. ही मुलं मोठी झाल्यावर त्यांना कम्युनिकेशन संबंधी अडचणींचा सामना करावा लागतो. ही मुलं जेव्हा मन लावून टिव्ही बघत असतात, तेव्हा ते काय करतात, काय खातात याचं भान त्यांना राहत नाही. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे पालकांनी मुलांची टिव्ही पाहण्याची वेळ मर्यादित ठेवली पाहिजे आणि यावेळेचं सक्त पालन केलं पाहिजे. मुलांसाठी नियम ठरवून त्याचे पालन मुलांसोबत पालकांनी केलं पाहिजे``. (हे वाचा:रडायला येत नसलं तरी डोळ्यातून सतत का येत पाणी?) आहारतज्ज्ञांच्या मते, पालकांनी मुलांच्या आहारात फळे आणि भाजीपाल्याचा पुरेसा समावेश केला पाहिजे. मुलांना विविध रंग आवडतात. त्यामुळे त्यांच्या आहारात रंगीबिरंगी भाज्यांचा समावेश करावा. लहान मुलांना जेवणामध्ये डाळी, हिरव्या पालेभाज्या द्याव्यात. चिप्स, वेफर्स, कुरकुरे, जंकफूड, चॉकलेट मुलांना देऊ नये कारण हे पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी अपायकारक असतात. लहान मुलांच्या मानसिक आरोग्याविषयी बोलताना मानसोपचार तज्ज्ञ बिंदा सिंग यांनी सांगितलं की ``लहान मुलं छोटया छोट्या गोष्टींवरून चिडचिड करत असल्याची समस्या अनेकदा पालक सांगतात. मात्र अनेकदा मुलांनी जेवण करावं यासाठी पालक त्यांना टिव्ही समोर किंवा हातात फोन देत जेवायला बसावतात. हे चुकीचं आहे. अशामुळं मुलांचं जेवणावरचं लक्ष विचलित होतं आणि ते गरजेपेक्षा जास्त खातात. लहान वयात मुलांची कल्पनाशक्ती तीव्र असते. त्यामुळे पुर्वी लहान मुलांना पालक गोष्टी सांगत. मात्र आता पालक मुलांच्या हातात फोन देतात. हे चुकीचं आहे. मुलांचं मानसिक आरोग्य चांगलं राहवं यासाठी पालकांनी मुलांना पुरेसा वेळ दिला पाहिजे. त्यांच्याशी सातत्यानं संवाद साधला पाहिजे. मुलांशी संवाद साधताना पालकांनी फोनचा वापर टाळला पाहिजे``. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओनं (WHO) नुकताच एक अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यात 5 वर्षाखालील मुलांसाठी त्यांनी स्क्रीन टाइम (Screen Time) निर्धारित केला आहे. 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचा प्रमाणापेक्षा अधिक वेळ स्क्रीनसमोर गेल्यास मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाईल फोन, टिव्ही स्क्रीन, लॅपटॉपपासून दूर ठेवावे, असा सल्लाही `डब्ल्यूएचओ`नं दिला आहे. (हे वाचा:वारंवार होणाऱ्या पाठदुखीकडे कधीही करू नका दुर्लक्ष, असू शकतो असाध्य रोग) `डब्ल्यूएचओ`नं 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी स्क्रीन टाइम झिरो असावा, असं सांगितलं आहे. 1 ते 2 वर्षाच्या मुलांसाठी दिवसभरातील स्क्रीन टाइम हा 1 तासांपेक्षा अधिक नसावा. 3 ते 4 वर्षादरम्यान वयोगटातील मुलांसाठी दिवसभरात स्क्रीन टाइम हा जास्तीत जास्त एक तास असं सांगण्यात आलं आहे. जेवण करतेवेळी टिव्ही पाहिल्यानं पचनशक्ती मंदावते आणि शरीरात फॅट (Fat) जमा होऊ लागतात. टिव्ही पाहत जेवण केल्यानं किती प्रमाणात खाल्लं आहे, याचं भान राहत नाही. बहुतांश मुलांना टिव्ही पाहताना जंकफूड खाणं आवडतं. टिव्ही पाहताना लंच किंवा डिनर केल्यानं मुलांमध्ये लठ्ठपणा वेगानं वाढतो. त्यामुळे मुलांची ही सवय मोडणं आवश्यक असल्याचं `डब्ल्यूएचओ`नं म्हटलं आहे. लठ्ठपणामुळे मुलांमध्ये डायबेटिस टाइप 1, हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. लठ्ठपणामुळं लवकर थकवा येणं, झोप कमी होणं, रक्तदाब, डायबेटिसची लक्षणं, श्वास घ्यायला त्रास होणं याशिवाय चिडचिडेपणा, कमीपणाची भावना, डिप्रेशन आदी विकार दिसून येतात. त्यामुळे मुलांचे वजन प्रमाणापेक्षा वाढू नये यासाठी वेट मॅनेजमेंट (Weight Management) सुरु करणं आवश्यक आहे. तसेच मुलांना स्किम्ड मिल्क दयावे, कारण यात फॅटचं प्रमाण कमी असतं. खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल करावा. जंकफूड, फास्टफूड पासून मुलांना दूर ठेवावं. टिव्ही, मोबाईल पाहण्याची सवय मोडावी. मैदानावरील खेळांना प्राधान्य द्यावे.या उपाययोजनांमुळे लहान मुलांमधील वाढत्या वजनाची समस्या निश्चितच कमी होण्यास मदत होईल आणि त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहिल.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या