Love Story : रवींद्रनाथ टागोरांच्या पहिल्या प्रेमाची अधुरी कहाणी...

Love Story : रवींद्रनाथ टागोरांच्या पहिल्या प्रेमाची अधुरी कहाणी...

Valentine Day 2021: रवींद्रनाथ टागोरांचं बरंच साहित्य प्रेम या संकल्पनेवर आधारित आहे. त्यांची प्रेमाबाबतची संकल्पना अनोखी होती. ते म्हणायचे, प्रेम हे रहस्य आहे. 14 फेब्रुवारीच्या प्रेमदिनानिमित्त रवींद्रनाथांच्या प्रेमाची गोष्ट.

  • Share this:

मुंबई, 11 फेब्रुवारी : साहित्य, कविता, संगीत, नाट्य या क्षेत्रांमध्ये रवींद्रनाथ टागोर यांचं मोठं योगदान. भारतातच नव्हे तर जगभरात त्यांना गुरुदेव म्हणायचे. रवींद्रनाथ टागोरांच्या सुधारक विचारांचं प्रतिबिंब अनेकदा त्यांच्या आजूबाजूच्या समाजात उमटायचं. त्यातूनच शांतिनिकेतनची स्थापना झाली.

सुसंस्कृत, श्रीमंत कुटुंबात टागोरांचा जन्म

1861मध्ये पिराली ब्राह्मण कुटुंबात टागोरांचा जन्म झाला. लहानपणी घरीच त्यांचं शालेय शिक्षण झालं. 17व्या वर्षी पुढील शिक्षणासाठी त्यांना इंग्लंडला पाठवलं होतं. तिथे ते शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. पण 1940मध्ये त्याच टागोरांना आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं डाॅक्टरेट दिली.

कादंबरीदेवींशी अनोखे बंध

टागोरांची सून म्हणून कादंबरीदेवी घरी आल्या तेव्हा त्या होत्या अवघ्या 9 वर्षांच्या. रवींद्रनाथांचे मोठे भाऊ ज्योतिंद्रनाथ यांच्याशी लग्न करून कादंबरीदेवी घरी आल्या. तेव्हा टागोर 7 वर्षांचे होते. कादंबरीदेवी रवींद्रनाथांच्या चांगल्या मैत्रीण झाल्या. दोघं एकत्र खेळायचे. दोघांमध्ये एक प्रकारचे बंध तयार झाले. रवींद्रनाथांची कादंबरीदेवी बालपणीची राजकुमारी होती.

आईप्रमाणे कादंबरीदेवींनी घेतली काळजी

टागोरांच्या आईच्या मृत्यूनंतर कादंबरीदेवींवर घराची जबाबदारी आली. त्या रवींद्रनाथांची काळजी घ्यायच्या. त्यांना काय हवं नको ते पाहायच्या. त्यावेळी टागोरांच्या आयुष्यातली आईची कमतरता कादंबरीदेवींनी पूर्ण केली.

कवितेवरचं प्रेम रोमँटिक झालं

कादंबरीदेवींनाही साहित्याची आवड होती. दोघंही एकत्र कविता वाचायचे. असं म्हणतात, टागोरांच्या यशात कादंबरीदेवींचा मोठा वाटा होता. टागोरांनी ग्रीक देवतेवरून त्यांचं नाव ठेवलं होतं.

रवींद्रनाथांचे भाऊ ज्योतिंद्रनाथही विद्वान

कादंबरीदेवींचे पती ज्योतिंद्रनाथ हुशार होते. चित्रकला, एडिटिंग, संगीत यात त्यांचा हात कुणीच धरू शकणार नव्हता. ते कुटुंबाचा व्यवसाय पाहायचे. त्यात त्यांना भरपूर नुकसानही सहन करावं लागलं होतं. कादंबरीदेवींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी ज्योतिंद्रनाथांनी प्रोत्साहन दिलं. कादंबरीदेवींना त्यांनी घोडेस्वारीही शिकवली. पण ते स्वत: कामात इतके व्यस्त असायचे की आपल्या पत्नीला फार वेळ देऊ शकायचे नाहीत. त्यामुळे कादंबरीदेवींना खूप एकटं वाटायचं. त्यातूनच त्यांचे रवींद्रनाथांसोबतचे बंध पक्के झाले होते.

टागोरांच्या लग्नाला कादंबरीदेवींचा विरोध

वयाच्या 22व्या वर्षी रवींद्रनाथांचं लग्न भाबातारिणीदेवींशी झालं. तेव्हा त्या 11 वर्षांच्या होत्या. टागोरांनी त्यांचं नाव ठेवलं मृणालिनी. या लग्नाला कादंबरीदेवींचा विरोध होता. लग्नानंतर रवींद्रनाथांवरचा आपला हक्क जाईल ही भीती त्यांच्या मनात होती.

कादंबरीदेवींनी केली आत्महत्या

19 एप्रिल 1884मध्ये कादंबरीदेवींनी विष घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी टागोरांच्या लग्नाला झाले होते 4 महिने 10 दिवस. या आत्महत्येनंतर टागोर मनातून एकदम हलून केले. अख्ख्या टागोर कुटुंबासाठी ही सर्वात मोठी दु:खी घटना. रवींद्रनाथांच्या बऱ्याच कविता कादंबरीदेवींवर होत्या. रवींद्रनाथांनी नंदलाल बोस यांच्याकडे हे कबूल केलं होतं की त्यांच्या चित्रांमधला स्त्रियांचा चेहरा रेखाटताना त्यांच्या मनात कादंबरीदेवी होत्या. अर्थात, टागोरांनी ही कबुली वयाच्या 70व्या वर्षी दिली होती.

रवींद्रनाथ आणि मृणालिनी यांचं वैवाहिक आयुष्य 19 वर्षांचं

मृणालिनीदेवींच्या मृत्यूनंतर टागोरांनी दुसरं लग्न केलं नाही. पण वैवाहिक जीवनातही रवींद्रनाथ खूप सुखी होते, असं दिसत नाही. कारण त्यांनी आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, आपण दोघंही विचारानं काॅम्रेड असतो, तर आयुष्यात एकत्रितपणे ती उंची गाठू शकलो असतो. मग खूप सुंदर घडलं असतं. पण तसं काहीही झालं नाही.

 हे देखील वाचा -  Love Story: ज्या मुलीच्या घराण्याशी होतं वैर तिच्याशीच केलं लग्न, 'दादा'ची अनोखी प्रेमकहाणी

व्हिक्टोरिया ओकॅम्पोसोबत बौद्धिक नातं

व्हिक्टोरिया ओकॅम्पोसोबत त्यांचं वेगळं बौद्धिक नातं होतं. 1924-25मध्ये अर्जेंटिना टुरमध्ये टागोरांचं सूर हे मासिका व्हिक्टोरिया यांनी प्रसिद्ध केलं होतं.

1913मध्ये टागोरांचा साहित्यातलं नोबेल प्राइझ देऊन सन्मान केला गेला. टागोरांचं बरंच साहित्य प्रेम संकल्पनेवर आहे. प्रेमाबद्दलची त्यांची कल्पना अनोखी होती. ते म्हणायचे, प्रेम हे रहस्य आहे कारण त्याच्या मागे काहीच तर्क नसतो. प्रेमावर स्वामित्वाची भावना नसावी, प्रेमाला मोकळं सोडावं.

टागोर आणि गांधीजी यांची मतं वेगळी होती. तरी टागोरांनी गांधीजींवर कधीच टीका केली नाही.

कवी मनाचे, मृदू स्वभावाचे रवींद्रनाथ टागोर यांचं साहित्य आणि आयुष्य यात खूप साधर्म्य राहिलं, नेहमीच.

Published by: Aditya Thube
First published: February 13, 2021, 8:13 PM IST

ताज्या बातम्या