ब्रिटन, 27 जानेवारी : आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. अनेक देशांमध्ये कोव्हिड (Covid 19) हा आजार खरा नसल्याची खात्री पटवून देण्यासाठी अनेक धक्कादायक मार्ग काही लोक वापरत असल्याचं आढळत आहे. अशाच एका व्यक्तीचा शोध पोलीस घेत असून या माणसानं चक्क एटीएम कॅश मशीन्स (ATM Cash Machines) चाटली असून, त्याचा लाइव्ह व्हिडिओही केला आहे. इंग्लंडमधील दक्षिण यॉर्कशायरमधील ही धक्कादायक घटना आहे. कोरोना विषाणू (Corona Virus) अस्तित्वात नाही. हे सिद्ध करण्यासाठी या व्यक्तीनं एटीएम मशीनचं कीपॅड चाटलं आहे. या विकृत व्यक्तीनं शेफील्डमधील एका एटीएम कॅश मशीन केंद्रात जाऊन त्या मशीनचं प्रत्येक बटण जिभेनं चाटलं. त्याचं हे कृत्य एटीमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं. ‘कोरोना माय….’, असं म्हणत ही व्यक्ती एटीएम कॅश मशीन जिभेनं चाटताना दिसत आहे. पुढे तो म्हणतो की, ‘यावर कोणी विश्वास ठेवत नसेल तर ते सर्व जण सरकारला सामील होऊन खोटं बोलत आहेत. हे तो सिद्ध करेल’ त्या व्यक्तीने फेसबुकवरही हा व्हिडिओ पोस्ट केला होता. पण नंतर तो हटवला. दक्षिण यॉर्कशायर पोलिसांनी (South Yorkshire Police) या घटनेला दुजोरा दिला आहे. या व्यक्तीची ओळख पटलेली नाही आहे. पण आपण त्या व्यक्तीचा कसून शोध घेत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. दक्षिण यॉर्कशायर पोलिसांना या घटनेची माहिती देणाऱ्या एका दर्शकांनं, त्या व्यक्तीनं चाटलेली ही पहिलीच मशीन नाही असा दावा केला आहे. डार्नालमध्येही त्या विकृत व्यक्तीनं एक एटीएम कॅश मशीन चाटली आहे. त्यामुळं या व्यक्तीनं आतापर्यंत दोन एटीएम मशीन चाटल्या असल्याचा दावा एका महिलेनं केला आहे. त्या व्यक्तीनं या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून फेसबुकवर पोस्ट केला होता पण नंतर तो हटवला असा दावाही या महिलेनं केला आहे. दक्षिण यॉर्कशायर पोलिसांच्या प्रवक्त्यानं या महिलेच्या वक्तव्याची पुष्टी केली असून, या व्हिडिओबाबतची सर्व माहिती पोलिसांना देण्यात आली असल्याचं आणि तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. हे वाचा - बायकोला सोबत न घेता प्रसिद्ध डॉक्टरांनी घेतली कोरोना लस; मग काय घडलं पाहा LIVE VIDEO अशीच घटना गेल्या आठवड्यात घडल्याचंही वृत्त आहे. ग्लॉस्टरशायरमधील एका महिलेनं रुग्णालयातील लोकांना कोरोना विषाणू खोटा आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. यासाठी 46 वर्षीय डेबी हिक्स हिच्यावर 21 ऑगस्ट रोजी अपमानास्पद, धमकीवजा भाषेचा वापर करून त्रास देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घडलेल्या आणखी एका घटनेत, एका महिलेनं टॉयलेटच्या सीट चाटत असल्याचा व्हिडिओ टिकटॉकवर टाकत कोरोना व्हायरस चॅलेंज सुरू केलं होतं. विमानातील टॉयलेटमध्ये तिनं हा व्हिडिओ केल्याचं दिसतं. या व्हिडिओनंतर ती महिला आजारी पडल्याचं वृत्त आहे. त्याच काळात दोन पुरुष आपले हात चाटून तेच हात सेन्सबरीमधील ताज्या उत्पादनांना तसंच तिथल्या फ्रिजच्या हँडलला पुसताना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) पकडले गेले. या घटनेनंतर दोघांनाही अटक करण्यात आली. कोडी फिशर या 26 वर्षीय तरुणानं वॉलमार्टमध्ये वस्तू चाटण्याचा व्हिडिओ करत धमक्या दिल्या. कॅमेर्याकडे पाहात तो, कोरोना विषाणूला कोण घाबरतो? असं म्हणताना दिसत आहे. हे वाचा - फेब्रुवारीपासून बिनधास्त प्रवास करा; मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा कोरोना विषाणूचा संसर्ग हा सर्दी आणि फ्लूसारखाच पसरतो. हा अत्यंत वेगानं संक्रमित होणारा विषाणू असून, याची लागण झालेल्या व्यक्तीच्या श्वासातून, खोकला, शिंक आणि लाळ याद्वारे तो सहजपणे पसरतो. असं असताना लोक इतरांच्या जीवाशी खेळ करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.