ही आहेत DEPRESSION ची प्रमुख 2 लक्षणं; ती दिसली तर व्यक्तीशी कसं बोलायचं, काय करायचं?

ही आहेत DEPRESSION ची प्रमुख 2 लक्षणं; ती दिसली तर व्यक्तीशी कसं बोलायचं, काय करायचं?

नैराश्य हा आजार तितकाच 'खरा' आहे. आपल्या जवळची, आसपासची व्यक्ती डिप्रेशनमध्ये असेल तर नुसतं Reachout असं फेसबुकवर लिहून भागत नाही. नेमकं कसं ओळखायचं नैराश्य आणि नंतर करायचं काय?

  • Share this:

सुशांत सिंह राजपूतच्या धक्कादायक आत्महत्येनंतर सोशल मीडियावर आणि सगळीकडेच नैराश्य, डिप्रेशन याविषयी चर्चा सुरू आहे. पण नैराश्यग्रस्त व्यक्तींना सल्ले नको असतात आणि आपण नेमकं तेच करतो. कसं ओळखायचं डिप्रेशन आणि आपल्या आसपासच्या व्यक्तींना त्यातून बाहेर काढण्यासाठी काय करायचं? या क्षेत्रातल्या तज्ज्ञ कौन्सेलर आणि क्लिनिकल सायकॉजिस्टनी मांडलेली वस्तुस्थिती

---------------

प्रज्ञा माने - चौलकर

"सीनेमें जलन आँखोमे तुफानसा क्यों है... इस शहरमें हर शक्स परेशान क्यो है .... " सुरेश वाडकरांनी गायलेली गझल . या ओळी मला नेहमी आजूबाजूच्या  परिस्थितीची जाणीव करून देतात. परवा सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची बातमी वाचली आणि काळजात चर् झालं. पण जास्त त्रास त्यावरच्या लोकांच्या कमेंट्स वाचून झाला. वाईट वाटणं- हळहळ वाटणं यासोबत अनेक हार्श- टोकाची मतं दिसली. 'आत्महत्या हे भित्रेपणाचं लक्षण आहे' , ' त्या व्यक्तीने वडीलधाऱ्या माणसांचं ऐकून सगळं करायला पाहिजे होतं', 'आई वडिलांसाठी जगायचं', 'डिप्रेशन वगैरे सगळं खोटं आहे ', त्याने अमुक तमुक करायला पाहिजे होतं' असे अशा अनेक तर्कशून्य कमेंट्स आणि उपदेश पाहायला मिळाले. त्यामुळे एकंदरीतच डिप्रेशन याबद्दल बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे.

डिप्रेशन अर्थात नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. सतत दुःखी - विषण्ण वाटणं, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टीत मन न रमणं ही दोन नैराश्याची प्रमुख आणि लक्षात येणारी लक्षणं. काही घडलं आणि आपल्याला २-४ दिवस असं वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण ही लक्षणे जर दोन आठवड्यांवर तशीच असतील तर आपलं नैराश्य ओळखण्याची ही पहिली पायरी. त्याच प्रमाणे शरीरात ताकद नसल्यासारखी वाटणं, खूप भूक लागणं- अजिबात भूक न लागणं, सारखं झोपावसं वाटणं - अजिबात झोप न येणं, भिती वाटणं, अपराधी वाटणं, लक्ष न लागणं, निराश- हताश वाटणं ही नैराश्याची इतर लक्षणं आहेत.

नैराश्य हे आयुष्यात आलेल्या अनुभवांमुळे आणि मनावर कळत नकळत झालेल्या आघातांमुळे येऊ शकतं. बहुतेकदा ते उघड्या डोळ्यांना दिसत ही नाही. आपल्या समोर येणारी व्यक्ती कुठल्या मानसिक कलहातून जात आसेल याचा आपण विचारही करू शकत नाही. पण, एखाद्या व्यक्तीच्या आपण जवळून संपर्कात असू तर आपल्याला त्यामधील लहान लहान बदल सहज जाणवू शकतात. नैराश्यात मेंदूत रासायनिक बदल घडतात. त्यामुळे तो तितकाच 'खरा' आजार आहे. त्यावर गोळ्या (psychiatric medication) आणि समुपदेशन ( psychotherapy) हा उपाय आहे.

सुशांतच्या निधनानंतर अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, 'माझ्याही मनात आत्महत्या...'

गोळ्या तुमची लक्षणं कमी करायला मदत करतात. तर समुपदेशक ती लक्षणं निर्माण कशी झाली आणि त्याकरिता आता काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करतात. गोळ्यांच्या साईडइफेक्ट बद्दल बोलायचं झालं तर त्याने झोप येते. कारण, आपला मेंदू सदासर्वदा काम करत असतो. आपण झोपल्यावर तो  शांत होतो. आणि गोळ्यांना chemical imbalance ठीक करण्यासाठी तो वेळ आवश्यक असतो. त्यामुळे कोणीही मानसोपचार तज्ञ झोपेच्या गोळ्या नैराश्यासाठी देत नाही. याच्या मदतीने हजारो पेशंटस आज नैराश्याच्या गर्तेतून बाहेर येऊन अगदी सामान्य जीवन जगत असतात.

उपदेश देणं थांबवा

तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तणावाखाली असेल तर पहिल्यांदा कोणताही उपदेश देणं बंद करा. आपल्या आजूबाजूला उपदेश देणारी शेकडो तोंडं असतात पण आपल्या मनातलं ऐकून घेणारे कान नसतात. ते कान व्हायचा प्रयत्न करा. त्याव्यतिरिक्त non judgemental राहायचा प्रयत्न करा. समोरची व्यक्ती तुम्हाला विश्वासाने काहीतरी सांगत असेल तर त्या भावनेचा आदर करा. त्यावर आपली मतं लादू नका! आणि वर संगितलेली लक्षणं दोन आठवड्यांच्या वर असतील तर तातडीने योग्य ती मदत घ्यायला त्यांना प्रोत्साहन द्या.

काय कराल?

तुम्हांला स्वतःला कधी दुःखी वाटत असेल किंवा स्वतःसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करायची असल्यास खालील गोष्टी कराव्यात.

१. Acceptance : आलेली परिस्थिती  मान्य करण्याची आपण तयारी ठेवली की वाटा दिसत जातात. आपण जर परिस्थिती अमान्य करत राहिलो तर लढणं शक्य होत नाही.

२. Expressive Writing : मनमोकळं लिहिणं हे ताण कमी करण्याचं एक खूप उत्तम साधन आहे. मोबाईल किंवा लॕपटॉप पेक्षा कागद- पेन उचलून लिहिल्यास आपण अधिक शांतपणे लिहितो. जे मनात येतंय ते लिहिणं महत्त्वाचं.

३. Express : मोकळा संवाद साधता येईल आशी व्यक्ती आयुष्यात असणं हे खूप मोलाचं आहे. त्याचप्रमाणे 'रडणं' ही एक प्रभावी थेरेपी आहे. आपल्याकडे रडणं हे कमकुवतपणाचं लक्षणा मानलं जातं. पण ज्याला मोकळेपणाने रडता येतं तो मनाने अधिक खंबीर असतो.

४. Routine : स्वतःला थोडी शिस्त लावणं महत्त्वाचं. रोजच्या दिवसात थोडा वेळ शारीरिक व्यायाम आणि काहीतरी creative कामाला द्यावा.

५. Mindfulness : काल काय झालं आहे आणि उद्या काय होईल याबद्दलचा अतिविचार हे कुठल्याही मानसिक त्रासाचं कारण आहे. त्यामुळे भूत आणि भविष्यात अडकण्यापेक्षा 'आज- आत्ता' वर लक्ष देणे महत्त्वाचे.

६. Self Compassion : स्वतःवर प्रेम करता येणं हे खूप महत्वाचं आहे. स्वतः ला समजून घ्या. प्रोत्साहन द्या.

धन्यवाद आणि संवाद

जातीयवाद, राष्ट्रवाद, दहशतवादाच्या या काळात मला दोन वाद खूप आवडतात. एक म्हणजे धन्यवाद आणि दुसरा म्हणजे संवाद. आपल्याकडे जे काही आहे, जे न मागता मिळालं आहे, त्यासाठी धन्यवाद म्हणायला लागलो की आपण किती नशिबवान आहोत याची आपल्याला नव्याने जाणीव होत राहाते. आणि तुमच्या आजूबाजूचे, कुटुंबीय, मित्र मैत्रिणी यांच्याशी संवाद साधत राहा. नुसतं Reachout असं फेसबुकवर लिहून भागत नसतं त्यासाठी एकमेकांच्या संपर्कात राहाणं महत्वाचं.

मानसिक आरोग्य हे हसण्यासाठी नाही हे लक्षात घ्या. कुणालाही कधीही याचा त्रास होऊ शकतो. पण, त्यावर मात करणं हे निश्चितच आपल्या हाताता आहे. त्यामुळे हसा, मनमोकळं बोला, गरज असेल तेव्हा रडा आणि आनंदाने जगा.

(लेखिका क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.)

हेही वाचा - सिनेमात ज्या मुलाला मरणातून वाचवलं, त्यानेच सुशांतसाठी लिहिली इमोशनल पोस्ट

First published: June 17, 2020, 3:52 PM IST

ताज्या बातम्या