नवी दिल्ली, 14 जून: कोरोनाच्या काळात (Coronavirus pandemic) सगळ्या जगातल्या आणि जगातल्या सगळ्या सामाजिक स्तरांतल्या, विविध वयोगटातल्या व्यक्तींच्या जीवनावर परिणाम झाला. सर्वांत जास्त परिणाम अनुभवावा लागला तो लहान मुलांना (Effect of corona on children). कारण ज्या वयात मित्र-मैत्रिणींबरोबर खेळायचं, दंगा-मस्ती करायची, अभ्यास करायचा, त्या वयात मुलांना घरात अडकून पडावं लागलं. मोठी माणसं काही कारणाने तरी घराबाहेर पडत होती; मात्र लहान मुलांना जणू कोंडूनच पडावं लागलं. त्यामुळे त्यांच्यातली ऊर्जा योग्य पद्धतीने बाहेर न पडल्याने ती मुलं घरात मस्ती करू लागली. त्यामुळे मोठ्या माणसांचा ओरडाही त्यांना सारखा खावा लागला. काही मुलं केवळ टीव्ही (TV), इंटरनेट (Internet), मोबाइल (Mobile) यांच्यातच गुंतून पडली. मुलांना सतत कशात गुंतवून ठेवणार असा प्रश्न सर्वच पालकांच्या समोर होता. त्यामुळे अनेक पालकांनी मुलांना त्यात रमू दिलं; मात्र त्यामुळे मुलं डिजिटल (Digital) दुनियेतच वावरू लागली. त्या आभासी दुनियेतल्या गोष्टी त्यांना खऱ्या वाटू लागल्या. त्यामुळे त्यांची वर्तणूक आणि भाषा यांवरही परिणाम होऊ लागल्याचं आढळून येऊ लागलं. इंटरनेटवर सर्च करताना असा कंटेंट मुलांच्या नजरेस पडतो, की जो त्यांच्या वयाच्या मानाने समजण्यास खूप कठीण असतो. त्यातली भाषा योग्य नसते. सातत्याने ती भाषा कानावर पडल्याने मुलांकडून ती भाषा आत्मसात केली जाते. त्या भाषेचा वापरही त्यांच्याकडून केला जातो. त्यामुळे मुलांना त्या दुनियेत रमू देताना मुलं त्या दुनियेतल्या नको त्या गोष्टी घेत नाहीयेत ना, याकडे बारकाईने लक्ष ठेवणं ही पालकांची जबाबदारी आहे. तुमच्या मुलांच्या (Children) बाबतीतही असं झालं असेल, तर काय करता येईल, ते पाहू या. हे ही वाचा: लहान मुलांसाठी आता खास Corona vaccine तयार; सप्टेंबरमध्येच होणार लाँच 1. योग्य वेळी दखल घेणं : पालकांनी (Parents) वेळीच दखल घेतली नाही, तर मुलांच्या वाईट सवयी सुधारणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे मुलं आपणहून चांगलं शिकतील, असा विचार तुम्ही करत असाल, तर चूक आहे. त्यामुळे काही चुकीचे शब्द त्यांच्या शब्दसंग्रहात कायमचे समाविष्ट होऊ शकतात. त्यामुळे मुलांच्या काही विचित्र सवयी लक्षात आल्या, तर पालकांनी तातडीने दखल घेऊन त्यांना योग्य गोष्टींचे धडे द्यायला हवेत. 2. प्रेमाने शिकवावं : मुलांना जे काही शिकवायचं असेल ते प्रेमाने शिकवावं. त्यामुळे मुलं तुमच्याकडे आदर्श म्हणून पाहतील आणि दुसऱ्यांचा आदर करायलाही शिकतील. मोठ्या माणसांना इगो असतो, तसाच तो लहान मुलांनाही असतो. त्यामुळे मारझोड करून एखादी गोष्ट शिकवली जात असेल, तर ती गोष्ट न शिकण्याकडे त्यांचा कल तयार होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही प्रेमळ भाषेत त्यांच्याशी बोललात, तर त्यांना चांगल्या भाषेचं महत्त्व समजेल. 3. पालक बना, दोस्त नाही : पालकांनी मुलांचे मित्र असायला हवं ही गोष्ट खरी; मात्र ती सदासर्वकाळ खरी नसते. मुलांच्या वाईट सवयी सोडवायच्या असतील, तर अशा वेळी तुम्ही पालक म्हणूनच त्यांच्याशी वागणं श्रेयस्कर असतं. तुमच्यासमोर ते वाईट भाषा वापरत असतील, तर त्यांना तातडीने रोखा. मोठ्यांचा आद करणं, त्यांच्याशी योग्य पद्धतीने बोलणं आदी बाबी त्यांना शिकवा. तुम्ही त्यांच्याशी नीट बोलत नसाल, तर तीही तसं बोलणं शिकू शकतात. 4. पॉझिटिव्ह कम्युनिकेशन (Positive Communication) : आपले आई-वडील हे मुलांसाठी पहिलं रोल मॉडेल असतात. त्यामुळे तुम्ही स्वतःला सुधारा, वागण्यात सकारात्मकता ठेवा. लोकांशी आदराने वागणं, प्रेमाने बोलणं वगैरे गोष्टी मुलं तुमच्याकडूनच शिकतील. हे ही वाचा: WhatsApp सेफ्टी फीचर्सच्या मदतीने तुमचं Accountअसं ठेवा सुरक्षित,पाहा सोप्या Tips 5. प्रत्येक गोष्टीत दोष नको : तुमचं मूल चुकीची भाषा शिकलं असेल, तर प्रत्येक गोष्टीत त्याला दोष देऊ नका. या भाषेच्या वापरामुळे तुम्ही किती दुःखी आहात, हे त्यांना दर्शवा. त्यामुळे मुलं भावनिकदृष्ट्या बदलतील आणि योग्य दिशा निवडतील. 6. थेट मुद्द्याचं बोला : एखादी गोष्ट मुलांना सांगायची/समजवायची असेल, तर थेट मुद्द्याचं सांगा. घुमवून/फिरवून सांगू नका. सोप्या शब्दांचा वापर करा. मुलांचा स्क्रीन टाइम कमी ठेवा आणि मुलं काय पाहताहेत यावर लक्ष असू द्या. 7. विश्वास (Trust) : आई-वडिलांचा आपल्यावर विश्वास आहे, याची खात्री मुलाला वाटली पाहिजे. तसंच, आपण काही चुकीचं केलं, तरीही आई-वडिलांना ते कळणारच आहे, याचीही कल्पना त्यांना असणं गरजेचं आहे. म्हणजे मिलं वाईट पाऊल उचलण्यास धजावणार नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







