मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सावधान! 'गुगल डॉक्टर' तुम्हाला पाडतोय आजारी

सावधान! 'गुगल डॉक्टर' तुम्हाला पाडतोय आजारी

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

सातत्याने आजारांविषयीची माहिती इंटरनेटवर सर्च केल्याने तुम्ही कदाचित आणखी आजारी पडू शकता.

    मुंबई, 13 ऑगस्ट : आज इंटरनेट (Internet) ही आपली मूलभूत गरज बनली आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती घेण्यासाठी, संदर्भ शोधण्यासाठी, ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने केला जातो. त्यामुळे इंटरनेट हे आपल्या हातातलं आयुध बनलं आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही; पण इंटरनेट सर्चिंगमुळे (Searching) एखादा आजार (Disease) जडू शकतो, असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? अनेक जण एखाद्या आजाराची लक्षणं जाणून घेण्यासाठी, आजाराची माहिती मिळवण्यासाठी, तसेच उपचारांबाबत सातत्याने इंटरनेटवर सर्चिंग (Google doctor) करत असतात. सध्याच्या कोरोना काळात हे प्रमाण अधिक वाढलं आहे. परंतु, सातत्याने आजारांविषयीची माहिती इंटरनेटवर सर्च केल्याने तुम्ही कदाचित आणखी आजारी पडू शकता.

    इंटरनेटवर विविध आजारांविषयी सातत्यानं सर्चिंग करणं हे आजारपणाला निमंत्रण ठरू शकतं. इंटरनेटवरची माहिती जाणून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या स्वाथ्याची विनाकारण चिंता सतावू लागते. यालाच वैद्यकशास्त्रात सायबरकाँड्रिया (CyberChondria) असं म्हणतात.

    हे वाचा - Hair Dye करताना एक छोटीशी चूक पडली महागात; सलूननंतर थेट गाठावं लागलं हॉस्पिटल

    'झी न्यूज'च्या रिपोर्टनुसार आरोग्य विशेषज्ञ डॉ. अब्रार मुल्तानी (Dr. Abrar Multani) यांनी सांगितलं, उदाहरण द्यायचं झालं, तर समजा, तुम्ही डोकेदुखी (Headache) याविषयी इंटरनेटवर सर्च करत आहात. अशा वेळी इंटरनेटवर तुम्हाला सामान्य डोकेदुखीपासून ते ब्रेन ट्यूमरपर्यंतची सर्व माहिती उपलब्ध होते. अशा वेळी सर्वप्रथम ब्रेनट्यूमरची (Brain Tumor) लक्षणं आणि त्या आजाराविषयीची माहिती आपण प्राधान्याने घेऊ लागतो. कारण गंभीर बाबी प्रथम समजून घेणं हा मानवी स्वभाव आहे. ही माहिती वाचत असताना आपण अधिकच घाबरून जातो, आपली झोप उडते आणि त्यामुळे आपल्या शरीरातली पित्ताची समस्या बळावते.

    हे वाचा - व्यायाम करणाऱ्यांनो करू नका ही चूक! 2 एनर्जी बुस्टर एकत्र घेतल्याने होतं नुकसान

    सायबरकॉन्ड्रिया या विकारात रुग्ण साध्या सर्दी-खोकल्यालाही गंभीर आजार समजू लागतो. हा रुग्ण डॉक्टरांकडे जाऊन विनाकारण आणि जबरदस्तीने अनावश्यक टेस्ट करण्याचा आग्रह धरतो, असं डॉ. मुल्तानी यांनी सांगितलं. ते म्हणाले, की गॅसेसमुळे छातीत जळजळ होत असल्याची समस्या घेऊन आमच्याकडे अनेक रुग्ण येतात. परंतु, आपल्याला हार्ट अॅटॅक आला आहे, असं समजून ते विनाकारण ईसीजी, टूडी-इकोसारख्या टेस्ट करण्याचा आग्रह धरतात.

    असा करा सायबरकॉन्ड्रियापासून बचाव

    - डॉ. अब्रार मुल्तानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेटवरची सर्वच माहिती खरी असते, असं मानू नये.

    - जी वेबसाइट तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीचे संदर्भ दर्शवते आणि जी नियमित अपडेट असते, अशाच वेबसाइटवरील माहिती ग्राह्य समजावी.

    - कोणताही आजार किंवा लक्षणं जाणवल्यास तातडीने डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून सल्ला घ्यावा.

    - डॉक्टरांनी दिलेला सल्ला ग्राह्य मानावा, त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोष्टींचा विचार करू नये.

    - डॉक्टर्सना प्रत्येक लक्षणाचे अनेक पैलू माहिती असतात. शिवाय व्यक्तीनुसार लक्षणांमध्ये बदलही असू शकतो. याचा सारासार विचार वैद्यकीय ज्ञान नसलेली सर्वसामान्य व्यक्ती करू शकत नाही.

    First published:

    Tags: Google, Health, Internet, Lifestyle