मुंबई, 17 मार्च : गेल्या एक ते दोन वर्षांत अनेक तरुणांचा हार्ट अॅटॅकनं मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये नियमितपणे जिमला जाणाऱ्या सेलिब्रिटिंचाही समावेश आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात जिममध्ये व्यायाम करण्याबद्दल शंका निर्माण झाली आहे. जिमला जाऊनही काही फायदा होत नसल्याचा विचार अनेकांच्या मनात डोकावू लागला आहे. अभिनेत्री सुष्मिता सेननं या शंकेचं निरसन केलं आहे. 47 वर्षांची सुष्मिता नुकतीच हार्ट अॅटॅकमधून वाचली आहे. तिच्या हृदयाच्या मुख्य धमनीत 95 टक्के ब्लॉकेज असल्याचं निदान झालं आहे. त्यानंतर तिनं आपल्या चाहत्यांसाठी एक सकारात्मक संदेश देत व्यायाम न सोडण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि न्यूट्रिशनिस्ट मोहिता मॅस्करएन्हास यांनीदेखील सुष्मिताच्या म्हणण्याला पाठिंबा दिला आहे. “नियमित व्यायाम केल्यामुळे आणि सक्रिय जीवनशैली ठेवल्यामुळेच मी हार्ट अॅटॅकमधून वाचू शकले. त्यामुळे तुम्ही जिममध्ये जाणं सोडू नका,” असा मेसेज सुष्मितानं आपल्या चाहत्यांना दिला आहे. एका व्हिडिओमध्ये न्यूट्रीशनिस्ट मोहिता यांनी सुष्मिताच्या मतावर भाष्य करताना म्हटलं आहे की, सुष्मिताला हार्ट अॅटॅक आला आहे, ही बाब तुमचं वर्कआउट टाळण्याचं कारण बनवू नका. उलट नियमित व्यायामामुळे तुमचं हृदय आणखी मजबूत होईल. हेही वाचा - नागपूर - आईच्या पोटातच अडकलं बाळ; शरीराबाहेर येईपर्यंत गेली 15 वर्षे, झाली अशी अवस्था मोहिता म्हणाल्या, “मी सहमत आहे की आनुवंशिकता आणि जीवनशैली व्यक्तीच्या आरोग्यात भूमिका बजावतात. त्यामुळे प्रत्येकानं नियमित प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे.” अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या (एएचए) नोंदीनुसार, केवळ पाच प्रौढ आणि किशोरवयीन मुलांपैकी एकजण चांगलं आरोग्य राखण्यासाठी पुरेसा व्यायाम करतो. एएचएनं दावा केला आहे की, निष्क्रिय राहणं आणि जास्त काळ बसून राहणं या बाबींमुळे हृदयविकार, टाइप 2 डायबिटिस, कोलन व फुफ्फुसाचा कॅन्सर आणि लवकर मृत्यूचा जास्त धोका जाणवतो. शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय राहिल्यास प्रत्येकाला फायदा होतो आणि दीर्घ, निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते.
इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमशी बोलताना, हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्समधील इंटरव्हेंशनल कार्डिऑलॉजिस्ट आणि प्रॉक्टर फॉर कॉम्प्लेक्स कोरोनरी इंटरव्हेन्शन्सचे सीनिअर कन्सल्टंट डॉ. जी. रमेश यांनी सांगितलं की, चालणं, जॉगिंग करणं, दोरीवरच्या उड्या मारणं, पोहणं यासारखे एरोबिक व्यायाम हृदयासाठी चांगले असतात. हे व्यायाम केल्यानं हृदयासह सर्व अवयवांना होणारा रक्तपुरवठा सुधारतो. डॉ. रमेश म्हणतात, “हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आठवड्यातील किमान सहा दिवस दिवसातून एकदा 45 मिनिटं वेगात चालण्यासारखा मध्यम तीव्रतेचा व्यायाम केला पाहिजे.” हेही वाचा - पोलिसाच्या घरातील लग्नाचा गाजर हलवा, रसगुल्ला पडला भारी; पोलिसात पोहोचलं प्रकरण, नेमकं काय घडलं? नियमित शारीरिक व्यायामुळे तुमचं ब्लड प्रेशर कमी होतं आणि तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळीदेखील सुधारते. या दोन्ही बाबी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. डॉ. रमेश सुचवतात की, कोणतीही औपचारिक व्यायाम पद्धत सुरू करण्यापूर्वी ईसीजी इको आणि टीएमटीचा समावेश असलेली आरोग्य तपासणी केली पाहिजे. त्यानंतर डॉक्टरांचा सल्लादेखील घेतला पाहिजे. ते म्हणाले, “व्यायाम करताना जर तुम्हाला श्वासोच्छवासाचा त्रास होत असेल, छातीत दुखत असेल किंवा जास्त धडधड होत असेल तर, व्यायाम ताबडतोब थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच, जड वजन उचलण्यासारखे जास्त कठोर व्यायाम प्रकार टाळले पाहिजेत.”
ते पुढे असंही म्हणाले की, हृदयविकारांचा कौटुंबिक इतिहास असल्यास नियमितपणे हृदयाची तपासणी केली पाहिजे. ज्यामध्ये टीएमटीचा समावेश असला पाहिजे. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीनं नियमित आरोग्य तपासण्या केल्या पाहिजेत. तुमच्या आरोग्याबाबत काही जोखमीचे घटक किंवा आजारांचा कौटुंबिक इतिहास असल्यास, कमी वयापासूनच आरोग्य तपासण्या केल्या पाहिजेत. न्यूट्रिशनिस्ट मोहिता मॅस्करएन्हास यांनी हृदयाच्या आरोग्यासाठी, ब्लड प्रेशर, इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी), स्ट्रेस टेस्ट, लिपिड प्रोफाइल, सी-रिअॅक्टिव्ह प्रोटिन (सीआरपी) चाचणी, एपीओबी चाचणी करण्याची शिफारस केली आहे. हिरव्या पालेभाज्या, फुलकोबी, ब्रोकोली आणि कोबीसारख्या क्रूसीफेरस भाज्या खाण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. या शिवाय, आवळा, बेरी, लिंबूवर्गीय फळं, बीट, डाळिंब, धान्यं आणि बीन्स, फॅटी फिश, अॅव्होकॅडो, फ्लेक्ससीड्स आणि ओमेगा-3 सप्लिमेंट्सचा आहारात समावेश केला पाहिजे.