नवी दिल्ली, 27 डिसेंबर : आपण एखाद्या बँकेमध्ये खातं उघडण्यासाठी गेलो की, आपल्याकडे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आणि पॅन कार्डची मागणी केली जाते. ही दोन कार्डं अनेक शासकीय कामांसाठी वापरता येतात. त्यावरून आपलं वय, पत्ता यासारखी माहिती समजण्यास मदत होते. काही दिवसांपूर्वी शासनानं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करण्याचे आदेश दिले होते. आयकर विभागानं याच आदेशाची पुनरावृत्ती केली आहे. आयकर विभागानं म्हटलं आहे की, 31 मार्च 2023 पर्यंत परमनंट अकाउंट नंबर (पॅन) आधार कार्ड क्रमांकाशी जोडणं बंधनकारक आहे. आयकर कायदा, 1961 अंतर्गत, सूट मिळणाऱ्यांच्या श्रेणीत न येणाऱ्या पॅन धारकांनी 31 मार्च 2023 पर्यंत आपलं आधार आणि पॅन क्रमांक एकमेकांशी लिंक करणं गरजेच आहे. आयटी विभागानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, जर तुम्ही तुमचा पॅन क्रमांक 31 मार्च 2023 पर्यंत आधारशी लिंक केला नाही तर 1 एप्रिल 2023 पासून तुमचं पॅन निष्क्रिय होईल. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं मे 2017 मध्ये अधिसूचना जारी केली होती. त्यात म्हटलं होतं की, सूट मिळालेल्या करदात्यांच्या श्रेणीमध्ये आसाम, जम्मू-काश्मीर आणि मेघालयमध्ये राहणारे नागरिक समाविष्ट आहेत. या शिवाय, ज्यांना आयकर कायदा, 1961 नुसार अनिवासी मानलं गेलं आहे, अशा व्यक्तीदेखील सवलतीस पात्र आहेत. ज्यांचं वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ते भारताचे नागरिक नाहीत, अशांना सवलत मिळू शकते. हेही वाचा - Nasal Vaccine Price: कोरोना उद्रेकात चांगली बातमी! नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची किंमत ठरली; किती येणार खर्च? आयकर विभागानं सांगितल्यानुसार, 31 मार्च 2023 पर्यंत पॅन-आधार लिंक करणं बंधनकारक आहे. त्या पूर्वी, नागरिकांनी लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी. 31 मार्च 2023 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास पॅन कार्ड अवैध मानलं जाईल. याचा अर्थ कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा इतर कामांत पॅन कार्डचा वापर करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर तुमचा आधार आणि पॅन क्रमांक एकमेकांशी लिंक आहे की नाही, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर ते जाणून घेण्याचा एक सोपा मार्ग आहे. घरबसल्या तुम्ही याबाबत माहिती मिळवू शकता. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. 1) सर्वांत अगोदर www.incometax.gov.in या आयकर ई-फायलिंग वेबसाइटवर जा. 2) त्यानंतर क्विक लिंकच्या खाली दिलेल्या ‘लिंक आधार स्टेटस’ या ऑप्शनवर जा. 3) तिथे आपला आधार आणि पॅन क्रमांक भरा व व्ह्यू लिंक आधार स्टेटस ऑप्शनवर क्लिक करा. 4) जर तुमचा पॅन क्रमांक आधारशी लिंक असेल, तर तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज दिसेल. ‘तुमचा पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडला गेला आहे,’ असा तो मेसेज असेल. जर तुमचा आधार आणि पॅन क्रमांक लिंक नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. शासनानं 1 जुलैपासून (2022) एक हजार रुपये दंड भरून पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची सुविधा सुरू केलेली आहे. मार्च 2023 पर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.