कितीही रूपं बदलू दे; कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिएंट्ससाठी प्रभावी लस तयार

कितीही रूपं बदलू दे; कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिएंट्ससाठी प्रभावी लस तयार

या लशीच्या अँटीबॉडीजनी केवळ SARS-CoV-2 हा विषाणूच नव्हे, तर कोरोनाच्या यूके, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील स्ट्रेन्सनाही निष्प्रभ केलं.

  • Share this:

मुंबई, 12 मे : कोरोना आपलं रूप (Corona varient) सातत्याने बदलतो आहे. त्यामुळे कोरोनाविरोधात सध्या उपलब्ध असलेल्या या लशी (Corona vaccine) या नव्या व्हेरिएंट्सवर किती प्रभावी ठरतील असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. सध्या उपलब्ध असलेल्या काही लशी या नव्या व्हेरिएंटविरोधातही प्रभावी असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तरीसुद्धा अशी एखादी लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि अशी लस अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी तयारही केली आहे.

अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेली नवी लस कोरोना समूहातल्या अनेक विषाणूंविरोधात तसंच सध्या पसरलेल्या कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सवर आणि भविष्यात ज्यापासून नवी लाट येण्याची शक्यता आहे,अशा वटवाघळांमधल्या कोरोना विषाणूंवरही प्रभावी ठरू शकते, असे संकेत अभ्यासातून मिळाले आहेत. माकडं आणि उंदरांवर घेण्यात आलेली या लशीची चाचणी यशस्वी झाली असून 'नेचर'या जर्नलमध्ये त्याबाबतचा लेख प्रसिद्ध झाला आहे. हा अभ्यास मानवाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

अनेक प्रकारच्या कोरोना विषाणूंवर प्रभावी ठरत असल्याने या लशीला पॅन कोरोना व्हायरस व्हॅक्सिन (Pan Coronavirus Vaccine) असं संबोधण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या भागापासून बनवण्यात आलेल्या नॅनो पार्टिकलच्या (Nanoparticle) माध्यमातून ही लस अँटीबॉडीजच्या निर्मितीला चालना देते. कोरोना विषाणूचा भाग लशीला शरीरातल्या (Cell Receptors) सेल रिसेप्टर्सशी (पेशीतली संदेशग्रहण करणारी यंत्रणा) जोडण्यास मदत करतो. अॅडज्युवंट (Adjuvant) प्रकारच्या केमिकल बूस्टरच्या सहाय्याने त्याची निर्मिती करण्यात आली आहे.

हे वाचा - कोवॅक्सिन, कोविशिल्ड की स्पुतनिक V? तुम्हीच ठरवा कोणती कोरोना लस घ्यायची

अमेरिकेतल्या ड्युक युनिव्हर्सिटी ह्युमन व्हॅक्सिन इन्स्टिट्यूटमध्ये (Duke University of Human Vaccine Institute) कार्यरत असलेले आणि या संशोधनात सहभागी असलेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ बार्टन एफ. हेन्स यांनी याबद्दलची माहिती दिली. 'गेल्या वर्षी स्प्रिंग सीझनमध्ये आम्ही या संशोधनाला सुरुवात केली. सर्वप्रकारच्या विषाणूंमध्ये आपोआप जनुकीय सुधारणा अर्थात म्युटेशन्स होत असतात. तशीच ती कोविड-19 साठी कारणीभूत असलेल्या SARS-CoV-2 या विषाणूमध्येही होणार, हे गृहीत धरून आम्ही संशोधन सुरू केलं. या लशीच्या अँटीबॉडीजनी केवळ SARS-CoV-2 हा विषाणूच नव्हे, तर कोरोनाच्या यूके, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील स्ट्रेन्सनाही निष्प्रभ केलं. कोरोना समुदायातल्या अनेक प्रकारच्या विषाणूंविरोधात या अँटीबॉडीजनी काम केलं', असं त्यांनी सांगितलं.

हेन्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भातला प्राथमिक अभ्यास काही वर्षांपूर्वी पसरलेल्या 'सार्स' या श्वसनविषयक आजारापासून सुरू केला. तो आजार SARS-CoV-1 या विषाणूमुळे पसरला होता.

त्यांना SARS चा संसर्ग झालेली अशी एक व्यक्ती आढळली, जिच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजमध्ये (Antibodies) विविध प्रकारच्या कोरोना विषाणूंना (Coronavirus) निष्प्रभ करण्याची क्षमता आहे. त्यामुळे पॅन कोरोनाव्हायरस अर्थात कोरोना विषाणूच्या मोठ्या समूहाला निष्प्रभ करणारी लस विकसित करणं शक्य असल्याचे संकेत त्यातून मिळाले.

हे वाचा - कोरोना रुग्णांना Ivermectin देऊ नका; भारतात औषधाचा वापर, WHO ने केलं सावध

विषाणूचा भेद करण्यासाठी शास्त्रज्ञांना त्याची कमकुवत बाजू शोधायची होती. कोरोना विषाणूच्या रचनेत जे काटे म्हणजेच स्पाइक्स असतात, ते स्पाइक्स विषाणूला मानवी शरीरातल्या पेशींच्या रिसेप्टर्सशी जोडलं जाण्यास मदत करतात. एकदा ते विषाणू पेशीशी जोडले गेले, की तिथे वाढतात आणि संसर्ग शरीरात पसरतो. म्हणूनच पेशींशी जोडल्या जाणाऱ्या विषाणूच्या रचनेतल्या या जागेला अँटीबॉडीजनी लक्ष्य केलं, तर तो विषाणू निष्प्रभ होऊ शकतो, असा विचार शास्त्रज्ञांनी केला. त्यानंतर शास्त्रज्ञांनी SARS-CoV-2 या विषाणूमधील त्याच्या विविध व्हेरिएंट्समधील आणि वटवाघळांमधल्या सार्स-समूहातल्या विषाणूंमधील रिसेप्टर बाइंडिंग डोमेनसाइट अर्थात मानवी पेशीशी जोडली जाणारी जागा नेमकी शोधून काढली. हीच जागा अँटीबॉडीजना निष्प्रभ करण्यासाठीही काम करते.

या सगळ्याचा विचार करून शास्त्रज्ञांनी ही जागा दर्शवणारा एक नॅनोपार्टिकल विकसित केला. तुरटीसोबतच्या रासायनिक द्रव्याशी त्याचा संयोग करण्यात आला. त्याचा उपयोग शरीराच्या प्रतिकार यंत्रणेचा प्रतिसाद मिळण्यासाठी झाला, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

माकडांवर घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये नॅनोपार्टिकल व्हॅक्सिनने कोविड-19 (Covid19) संसर्ग 100 टक्के रोखला. तसंच सध्या माणसांमध्ये नैसर्गिकरित्या होणाऱ्या संसर्गातून तयार होणाऱ्या अँटीबॉडीज आणि सध्याच्या लशींमुळे तयार होणाऱ्या अँटीबॉडीज यांच्या तुलनेत प्राण्यांमधील संसर्ग रोखण्याची क्षमता या नव्या लशीमध्ये जास्त प्रमाणात आहे, असं निरीक्षणही शास्त्रज्ञांनी नोंदवलं.

हे वाचा - कोरोना नियंत्रण कसं करायचं मुंबई, पुण्याकडून शिका; मोदी सरकारने केलं कौतुक


हे संशोधन ज्यांच्या नेतृत्वाखाली झालं, ते केव्हिन साँडर्स यांनीही या संशोधनातलं तत्त्व सांगितलं. 'आम्ही कोरोना विषाणूच्या छोट्या भागाच्या अनेक प्रतिकृती वापरल्या जेणेकरून शरीराकडून प्रतिकार यंत्रणेचा उच्च पातळीचा प्रतिसाद मिळावा. आम्हाला असं आढळलं, की यामुळे विषाणूला संसर्ग करण्यापासून रोखण्याची शरीराची क्षमता तर वाढलीच, शिवाय स्पाइक प्रोटीनच्या संसर्गाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जागेला वारंवार लक्ष्य करण्यातही यश मिळालं,' असं ते म्हणाले.

म्हणूनच ही लस SARS-CoV-1,  SARS-CoV-2 या विषाणूंसह त्यांचे चार सर्वसाधारण व्हेरिएंट्स आणि प्राण्यांत आढळणारे आणखी काही प्रकारचे कोरोना विषाणू यांच्याविरोधात प्रभावी ठरली असल्याचं या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं.

First published: May 12, 2021, 7:37 AM IST

ताज्या बातम्या