कोरोना रुग्णांसाठी इतकं का महत्त्वाचं आहे Remdesivir औषध?

कोरोना रुग्णांसाठी इतकं का महत्त्वाचं आहे Remdesivir औषध?

Remdesivir चा तुटवडा, रेमडेसिवीरचा काळा बाजार, अशा बातम्या सतत कानावर येत आहेत. हे औषध इतकं का चर्चेत आहे?

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Coronavirus Second Wave) सध्या गंभीर रूप धारण केलं आहे. रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच चर्चा कानावर येतेय ती रेमडेसिवीर (Remdesivir) या इंजेक्शनची. अगदी नेत्यांपासून सामान्य व्यक्तींपर्यंत सर्वांच्याच तोंडी हे नाव ऐकू येतं आहे. या इंजेक्शनचा (Injection) काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठेत या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आणि त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. म्हणून केंद्र सरकारने या इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या इंजेक्शनचा कोरोनावरच्या (Corona) उपचारांमध्ये नेमका किती उपयोग होतो? जगात याचं उत्पादन केवळ भारतातच होतं का? असे प्रश्न तुमच्या मनात नक्की असतील.

रेमडेसिवीर या अँटिव्हायरल औषधाचा (Antiviral Drug) उपयोग पहिल्यांदा 'हिपॅटायटिस सी'वर उपचारांसाठी करण्यात आला होता. पण 2014 साली आफ्रिकी देशांमध्ये एबोला विषाणूने थैमान घातलं, तेव्हा उपचारांसाठी त्याचा प्रभावी उपयोग झाल्यावर हे औषध चर्चेत आलं.

कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा अनेक देशांमध्ये रेमडेसिवीरचा वापर करण्यात आला आणि त्याचा चांगला उपयोग होत असल्याचं लक्षात आलं. अद्याप जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनावरचं औषध म्हणून या औषधाला मान्यता दिलेली नाही. पण कोरोनाच्या रुग्णांवर या इंजेक्शनचा वापर केल्यानंतर त्याचे परिणाम चांगले होत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर या औषधाची मागणी वाढू लागली.

हे वाचा - भारतात दिली जाणार रशियन कोरोना लस; Sputnik V ला हिरवा कंदील

गिलिएड सायन्सेस या अमेरिकन कंपनीकडे याऔषधाचं पेटंट आहे. त्या कंपनीने सिप्ला (Cipla), हेटेरो लॅब्ज (Hetero Labs), जुबलिएंट लाइफ सायन्सेस (Jubiliant Lifesciences) आणि मिलान (Milan) या चार भारतीय कंपन्यांशी या औषधाच्या निर्मितीकरिता करार केला. या चारही कंपन्या मोठ्या प्रमाणावर या औषधाची निर्मिती करत असून जगातल्या 126 देशांना त्याची निर्यात केली जात आहे.

रेमडेसिवीर हे औषध महाग असून त्याची भारतीय बाजारातली किंमत 4800 रुपयांच्या आसपास आहे. या औषधाचा काळा बाजार होत असल्यामुळे ते खूप चढ्या दराने विकलं जात होतं. म्हणूनच केंद्र सरकारने या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली जेणेकरून पहिल्यांदा देशांतर्गत गरज पूर्ण होऊ शकेल. पाकिस्तानच्या एका कंपनीसह बांग्लादेशातल्या काही फार्मा कंपन्याही या औषधाची निर्मिती करत आहेत.

रेमडेसिवीर कशा पद्धतीने काम करतं?

एबोलावरच्या उपचारांत प्रभावी ठरल्यानंतर रेमडेसिवीरची चर्चा सुरू झाली असली. तरी मर्स, सार्स यांसारख्या एन्फ्लुएंझा संसर्गांमध्येही त्याचा चांगला उपयोग झाला. कोरोना विषाणूची शरीरात वाढ होण्याला रेमडेसिवीर पायबंद घालतं, असं तज्ज्ञ म्हणतात.

कोणताही विषाणू जेव्हा मानवी शरीरात प्रवेश करतो, तेव्हा तो स्वतःला कणखर बनवण्यासाठी आपल्या प्रती तयार करतो. ही सगळी क्रिया मानवी शरीराच्या पेशींमध्ये घडत असतं. या प्रक्रियेसाठी विषाणूला एका एंझाइमची (Enzyme) गरज असते. रेमडेसिवीर हे औषध या एंझाइमवर हल्ला करतं आणि विषाणूच्या मार्गात अडथळा निर्माण करतं.

हे वाचा - भाजपकडून राज्याला 50 हजार remdesivir injection देण्याची घोषणा

अमेरिकेत या औषधाची चाचणी अमेरिकेच्या राष्ट्रीय अॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्थेत घेण्यात आली होती. त्यात 1063 लोकांनी भाग घेतला होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ब्रिटनमधल्या केम्ब्रिज विद्यापीठाने (Cambridge University) कोरोना संसर्ग झालेल्या आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या एका रुग्णाला रेमडेसिवीर औषध दिलं होतं. त्यानंतर त्या रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारली. विषाणू शरीरातून नष्ट झाला. या प्रयोगाविषयी नेचर कम्युनिकेशन्स या जर्नलमध्ये लिहिण्यात आलं.

'दन्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये रेमडेसिवीर या औषधाच्याअभ्यासाबद्दलचा एक लेख प्रसिद्ध झाला. त्यातील माहितीनुसार, अमेरिका, कॅनडा, जपान आणि युरोपमध्ये या औषधाचा उपयोग करण्यात आला. गंभीर स्थिती असलेल्या 61 रुग्णांना हे औषध देण्यात आलं. त्याच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी कमी होती. त्यापैकी 53 रुग्णांच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला. प्रत्येक रुग्णाला या औषधाचा 10 दिवसांचा कोर्स देण्यात आला. पहिल्या दिवशी 200मिलिग्रॅम, तर नंतरचे नऊ दिवस रोज 100 मिलिग्रॅम औषध देण्यात आलं. हे औषध घेतलेल्या 53 पैकी 33 जणांची ऑक्सिजन पातळी सुधारली. 23जणांना उपचारांनंतर घरी पाठवण्यात आलं. 17 रुग्णांची तब्येत इतकी सुधारली, की त्यांना व्हेंटिलेटरचीही आवश्यकता उरली नाही. सात जणांचा मृत्यूही झाला.

कॅनडातल्या अल्बर्टा विद्यापीठानेही यावर संशोधन केलं होतं. त्या संशोधनाविषयीचा लेख जर्नल ऑफ बायोलॉजिकल केमिस्ट्रीमध्ये प्रसिद्ध झाला. रेमडेसिवीर औषध शरीरातली कोरोनाची वाढ होण्यास पायबंद घालू शकते,असं त्यात लिहिलं आहे.

त्यानंतर भारतासह अन्य देशांमध्येही रेमडेसिवीर औषधाचा उपयोग केला जाऊ लागला. चीनने मात्र रेमडेसिवीर औषधाच्या चाचण्या घेतल्यानंतर हे औषध कोरोनावर उपचारांसाठी वापरण्याकरिता परवानगी दिली नाही.

हे वाचा - तीन दिवसांपासून कोरोना रुग्ण उपचाराच्या प्रतीक्षेत; हतबल पत्नीला अश्रू अनावर

अद्याप आवश्यक तितक्या चाचण्या झालेल्या नसल्याने त्याबद्दलचा पुरेसा डेटा नाही, त्यामुळे ठोस निष्कर्ष काढता येत नाही. या कारणामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अद्याप या औषधाला मान्यता दिलेली नाही. मात्र भारतात ज्यांना हे औषध देण्यात आलं आहे,त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना बरं वाटलं आहे, हेही खरं आहे.

First published: April 13, 2021, 7:36 AM IST

ताज्या बातम्या