मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /#कायद्याचंबोला : जोडीदार घटस्फोट देत नाहीये पण तुम्हाला हवाय; त्याच्या संमतीशिवाय अशी मिळवा सुटका

#कायद्याचंबोला : जोडीदार घटस्फोट देत नाहीये पण तुम्हाला हवाय; त्याच्या संमतीशिवाय अशी मिळवा सुटका

जोडीदाराच्या संमतीशिवाय घटस्फोट मिळेल?

जोडीदाराच्या संमतीशिवाय घटस्फोट मिळेल?

अमोलला लग्नाच्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे. मात्र, पत्नीच्या संमतीशिवाय त्याला घटस्फोट मिळू शकतो का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आपले वाचक अमोल यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. पहिलं वर्ष कसं गेलं हे त्यांनाच समजलं नाही. मात्र, त्यानंतर त्यांच्यात खटके उडायला लागले. अमोलच्या पत्नीला पुढे शिकण्याची इच्छा होती. एक दिवस ती न सांगताच माहेरी निघून गेली. ती परतलीच नाही. अमोलने खूप समजावण्याचा प्रयत्न केला. अमोल एकदोन नाहीतर 9 वेळा प्रत्यक्ष तिला आणण्यासाठीही गेला. मात्र, त्याला रिकाम्या हातानेच परतावे लागले. मधल्या काळात तिने एका महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. याला आता दोन वर्षे उलटली आहे. अमोल अशा वागण्याला कंटाळला असून त्याला आता या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत बायकोच्या संमतीशिवाय घटस्फोट मिळेल का? असा त्याचा प्रश्न आहे.

Kaydyach bola Legal

कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.


प्राचीन हिंदू कायद्यानुसार विवाह एक संस्कार आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1955 मध्ये आधुनिक हिंदू कायदा तयार करण्यात आला. या कायद्यानुसार विवाहाला संस्कारासोबतच कराराचे स्वरूप देण्यात आले. आता कोणताही विवाह न्यायालयाच्या आदेशाने रद्दबातल ठरवला जाऊ शकतो.

हिंदू विवाह कायदा 1955

हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 13 नुसार काही कारणास्तव दोन हिंदूंमधील विवाह विसर्जित करण्याचा अधिकार प्राप्त होतो. कलम 13 नुसार, पती किंवा पत्नी या कायद्यांतर्गत कोणताही वैध विवाह रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज करू शकतात. यासाठी काही कारणे आवश्यक आहेत.

व्यभिचार

दोघांपैकी कोणत्याही व्यक्तीने स्वेच्छेने आपली पत्नी किंवा पती व्यतिरिक्त इतर व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवले. तर पीडित व्यक्ती घटस्फोटासाठी न्यायालयासमोर याचिका दाखल करू शकतो.

क्रूरता

जर याचिकाकर्त्याला क्रूर वागणूक दिली गेली असेल, तर याचिकाकर्ता या आधारावर न्यायालयासमोर अर्ज सादर करून विभक्त होण्याची याचिका करू शकतो. क्रूरतेमध्ये शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या क्रूरतेचा समावेश होतो. हिंदू विवाह कायद्यांतर्गत क्रूरता या शब्दाची व्याख्या करण्यात आलेली नाही. मात्र, वेळोवेळी न्यायालयीन निर्णयांद्वारे क्रूरतेचा अर्थ समृद्ध केला गेला आहे.

वाचा - कोर्ट मॅरेज कसं करतात? यात घटस्फोट, उत्तराधिकार, वारसाहक्काचं काय होतं?

सर्वसाधारणपणे, शारीरिक क्रूरता शारीरिक क्रूरतेशी संबंधित आहे, मारहाण करणे, जाळणे, आरोग्यास हानिकारक काहीतरी खाऊ घालणे, अन्न न देणे, बेकायदेशीर बंदिवास, या सर्व शारीरिक क्रूरता आहेत. मानसिक क्रूरतेच्या संदर्भात व्यभिचाराचे खोटे आरोप करणे, पतीवर आपल्या मेहुणीशी अवैध संबंध असल्याचा आरोप करणे, दुसरे लग्न करणे, नवीन पत्नीला सर्व स्नेह आणि प्रेम देणे, नेहमी शिवीगाळ करणे, नेहमी शारीरिक संबंधांना नकार देणे किंवा संभोग करू न शकणे, शरीराला दुर्गंधी येणार्‍या आजाराने ग्रासणे, ही सर्व मानसिक क्रूरता आहे. याच आधारावर याचिकाकर्ता घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकतो.

जोडीदाराला एकटं पाडणं

दोघांपैकी एकाने आपल्या जोडीदाराला विनाकारण एकटे सोडले तर त्या पक्षाचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होते. हिंदू कायद्याने हे स्पष्ट केले आहे की कोणताही पुरुष किंवा स्त्री असा त्याग करू शकत नाही. जोडीदार वर्षानुवर्षे परत आला नाही तर त्याला त्याच्याशिवाय आयुष्य काढावे लागेल. हे त्याच्यावर अन्यायकारक ठरेल, म्हणूनच कायद्यानुसार, विवाहाच्या पक्षकारांना त्यागाच्या आधारावर घटस्फोटासाठी याचिका सादर करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. जर एखाद्या पक्षाने याचिकाकर्त्याला 2 वर्षे सतत दूर ठेवले असल्यास या आधारावर घटस्फोटासाठी याचिका दाखल केली जाऊ शकते.

धर्मांतर

दोघांपैकी एकाने हिंदू धर्म सोडला आणि इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर केले, तर अशा परिस्थितीत दुसरा व्यक्ती घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकतो. विवाहानंतर पत्नीने हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लिम बनले आणि मुस्लिम धर्मानुसार धार्मिक कार्य करण्यास सुरुवात केली तर पती-पत्नी दोघांमध्ये विरोध होईल. केवळ हिंदू धर्मांतर्गत एका पंथाचा त्याग करून दुसरा संप्रदाय स्वीकारला, तर त्याला धर्मपरिवर्तन म्हणता येणार नाही.

वाचा - लग्नाशिवाय एकत्र राहिल्यानंतर मिळतात बायकोचे अधिकार, पण 'या' अटींवर

मानसिकदृष्ट्या अस्वस्थ

पती-पत्नीपैकी कोणताही पक्ष मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा विकृत मनाचा असेल. तर अशा परिस्थितीत पीडित घटस्फोटासाठी याचिका दाखल करू शकतो. वेडेपणा सिद्ध झाल्यावरच या आधारावर घटस्फोट दिला जातो. वेडेपणा म्हणजे माणूस इतका वेडा आहे की तो कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.

कुष्ठरोग आणि संक्रमित रोग

जर पती किंवा पत्नीला कुष्ठरोग किंवा एचआयव्ही सारखा संसर्गजन्य रोग झाला असेल, तर या आधारावरही न्यायालयाकडून घटस्फोटाचा हुकूम मंजूर केला जाऊ शकतो. कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग आहे. त्याचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतो. त्यामुळे दोन व्यक्तींना लग्नाच्या धाग्यात बांधून राहणे कठीण होते. पण, जर रोग बरा होणारा असेल तर हे कारण पावरता येणार नाही.

संन्यास घेणे

दोघांपैकी कोणत्याही व्यक्तीने संन्यास घेतला किंवा घरादाराच त्याग केला तर अशा परिस्थिती दुसऱ्या व्यक्तीला घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती संन्यास घेते, तेव्हा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो त्याच्या सर्व संपत्तीचा आणि संसाराचा त्याग करतो. जर एखाद्या जोडीदाराने आपले घर सोडले असेल आणि त्याला संन्यासी म्हटले जाते, तर दुसरा जोडीदार या आधारावर घटस्फोटाचा आदेश मिळवू शकतो.

मृत्यूची कल्पना

पती किंवा पत्नी सलग 7 वर्षे गायब असल्यास. ज्यांना त्यांच्याबद्दल माहिती असायला हवी त्यांनाही माहीत नसेल. अशा स्थितीत पीडित पक्षाला हा अधिकार उपलब्ध असतो की तो कोर्टाचा आश्रय घेऊन घटस्फोटाचा आदेश मिळवू शकतो. विवाहानंतर वैवाहिक सुख मिळण्याचा हक्क दोघांनाही आहे. मात्र, एक पक्ष गायब झाल्यामुळे दुसऱ्या पक्षाला वैवाहिक सुख मिळत नाही. म्हणून, हिंदू विवाह कायद्याचे कलम 13(1) (7) विवाहातील पक्षकारांना संभाव्य मृत्यूच्या आधारावर घटस्फोटाचे कारण देते.

वाचा - पती आणि सासरच्या मालमत्तेवर पत्नीचा अधिकार आहे का? काय सांगतो कायदा?

एक वर्षापेक्षा जास्त काळ दोघांमध्ये काहीच संबंध नसणे

जेव्हा या कायद्याच्या कलम 10 अंतर्गत न्यायालयीन विभक्ततेचा डिक्री कोर्टाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने पारित केला. असा हुकूम पारित केल्यानंतर एक वर्षांपर्यंत पती-पत्नीमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झाले नाही. वर्षभर दोघांमध्ये एकत्र येण्याचा कोणताही प्रयत्न झाला नसेल तर या आधारावर हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13(1)(अ)(1) अंतर्गत घटस्फोटासाठी याचिका दाखल केली जाऊ शकते.

आदेशाचे उल्लंघन

जेव्हा हिंदू विवाह कायद्याच्या कलम 9 अन्वये न्यायालयाकडून वैवाहिक हक्कांच्या पुनर्स्थापनेचा हुकूम निघतो. असा आदेश जर संबंधित पती किंवा पत्नीने पाळला नाही. अशा परिस्थितीत पीडित पक्षाला कलम 13 अन्वये न्यायालयासमोर घटस्फोटासाठी याचिका सादर करण्याचा अधिकार आहे.(कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

First published:
top videos

    Tags: Divorce, Illegal, Marriage