आपले वाचक रमेश पाटील यांनी ई-मेलद्वारे पत्र लिहून एक प्रश्न विचारला आहे. त्यांच्या मुलीच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी अपघाती निधन झालं आहे. त्यानंतर सासरच्या मंडळीने मुलीला घरातून बेदखल केलं. पतीच्या मालमत्तेत कोणताही अधिकार द्यायला सासरची मंडळी तयार नाहीत. अशा परिस्थितीत पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेवर कोणाचा अधिकार असतो? या संदर्भात कायदा काय सांगतो? माझ्या मुलीला न्याय मिळेल का? असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.
मालमत्तेशी संबंधित कायद्यांबाबत लोकांमध्ये ज्ञानाचा अभाव दिसून येतो. अनेकदा त्यासंबंधीचा गोंधळ आणि माहितीच्या अभावामुळे मालमत्तेवरुन वादही होतात. लोकांना त्यांचे हक्क आणि त्यांच्याशी संबंधित नियमांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. पतीच्या मालमत्तेमध्ये पत्नीच्या अधिकारांशी संबंधित मुद्दा हा देखील मालमत्तेच्या विभाजनाशी संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या लेखात आम्ही तुम्हाला पती आणि सासरच्या मालमत्तेत पत्नीचा काही अधिकार आहे का आणि त्यासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी काय आहेत ते सांगणार आहोत.
काय आहे कायदेशीर तरतूद?
ज्या व्यक्तीशी त्या महिलेचे लग्न झाले आहे, त्याच्याकडे स्वत:ची कोणतीही मालमत्ता असल्यास, त्याबाबतचे नियम व कायदे स्पष्ट आहेत. व्यक्तीची स्व-अधिग्रहित (स्वतः कमावलेली) मालमत्ता, मग ती जमीन, घर, पैसा, दागदागिने किंवा इतर कोणतीही असो, त्यावर केवळ त्या व्यक्तीचा अधिकार आहे, ज्याने ती मालमत्ता घेतली आहे.
तो आपली मालमत्ता विकू शकतो, गहाण ठेवू शकतो, मृत्युपत्र लिहू शकतो, कोणालाही दान करू शकतो. यासंबंधीचे सर्व अधिकार त्याच्याकडे राखीव असतात.
पती हयात असताना मालमत्तेवर दावा करू शकत नाही
पती जिवंत असताना त्याने मिळवलेल्या मालमत्तेवर पत्नीला दावा करता येत नाही. पत्नीला सह-मालक म्हणून त्याच्या मालमत्तेत जोडणे पतीवर अवलंबून आहे. जर पती मरण पावला आणि त्याने मृत्युपत्रात पत्नीचे नाव जोडले नसेल आणि मालमत्ता दुसऱ्याला हस्तांतरित केली असेल, तर अशा परिस्थितीतही पत्नीचा मालमत्तेवर कोणताही अधिकार राहत नाही. एकूणच, पतीला त्याच्या अधिग्रहित मालमत्तेच्या मालकीशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
वाचा - लग्नाशिवाय कपलने लॉजवर राहणं गुन्हा नाही; फक्त हे अधिकार माहिती हवेत
सासू-सासऱ्याच्या मालमत्तेत किती हक्क
सामान्य परिस्थितीत, महिलेचा तिच्या सासरच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नसतो किंवा ते जिवंत असताना आणि त्यांच्या मृत्यूनंतर महिलेला त्यांच्या मालमत्तेवर कोणताही हक्क सांगता येत नाही. सासूच्या मृत्यूनंतर, त्यांच्या मालमत्तेतील अधिकार पतीकडे जातो, पत्नीकडे नाही. मात्र, पहिल्यांदा पतीचा आणि नंतर सासूचा मृत्यू झाल्यास, महिलेला मालमत्तेवर हक्क प्राप्त होतो. यासाठी सासूने मालमत्तेशी संबंधित मृत्यूपत्र करून दुसऱ्याला दिलेले नसणे आवश्यक आहे.
पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेवर पत्नीचा हक्क
जेव्हा एखादी व्यक्ती स्व-अधिग्रहित मालमत्तेचे इच्छापत्र न लिहिता मरण पावते, तेव्हा सामान्य कायदा त्याच्या मालमत्तेवरील अधिकाराबद्दल स्पष्ट आहे. या स्थितीत व्यक्तीची अधिग्रहित मालमत्ता त्याची आई आणि विधवा पत्नीकडे जाते. येथे हे देखील आवश्यक आहे की व्यक्तीने मृत्युपत्र लिहून मालमत्तेवर अधिकार इतर कोणाला दिलेला नसावा.(कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.