मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

#कायद्याचंबोला : लग्नाशिवाय एकत्र राहिल्यानंतर मिळतात बायकोचे अधिकार, पण 'या' अटींवर

#कायद्याचंबोला : लग्नाशिवाय एकत्र राहिल्यानंतर मिळतात बायकोचे अधिकार, पण 'या' अटींवर

कोणतेही दोन लोक लिव्ह-इनमध्ये राहू शकतात. कायद्याने अशा नात्याला मान्यता आहे.

कोणतेही दोन लोक लिव्ह-इनमध्ये राहू शकतात. कायद्याने अशा नात्याला मान्यता आहे.

कोणतेही दोन लोक लिव्ह-इनमध्ये राहू शकतात. कायद्याने अशा नात्याला मान्यता आहे. मात्र, याला काही नियम आहेत. त्याचे उल्लंघन होत असेल तर तुम्हाला कायद्याचं संरक्षण मिळत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

स्नेहल आणि रोहितने 2020 ला कोरोना काळात प्रेमविवाह केला. पहिलं वर्ष कसं निघून गेलं त्यांनाही कळलं नाही. मात्र, वर्षानंतर कुरबुरी सुरू झाल्या. दिवसेंदिवस त्यांच्यात वाद वाढत होता. एक दिवस हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांनाही वेगळं होण्याचा निर्णयच घेऊन टाकला. दोघांच्याही कुटुंबाने खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही उपयोग झाला नाही. अखेर दोघांच्या सहमतीने विवाह रद्द करण्याचं ठरलं. स्नेहल ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत होती. त्यामुळे तिने माहेरी न जाता शहरातच वेगळी खोली घेऊन आपला व्यवसाय सुरू ठेवला. रोहितही आपल्या कामात गुंतला. दोघांच्या प्रकरणाला अजून सहा महिने अवधी होता. दरम्यान, स्नेहलच्या संपर्कात तिचा जुना मित्र आला. गेल्या काही महिन्यांपासून आलेल्या एकटेपणामुळे ती लवकर त्याच्या जवळ गेली. महिन्याच्या आतच त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही सोबत राहू लागले. एकाच शहरात राहत असल्याने ही गोष्टी रोहितपर्यंत पोहचण्यास वेळ लागला नाही. रोहितला याचा मोठा मानसिक धक्का बसला. अद्याप घटस्फोटही झाला नाही आणि हिने लगेच दुसरा संसार मांडला. मात्र, अशावेळी काय करायला हवं याची रोहितला काहीच माहिती नव्हती.

Kaydyach bola Legal

कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.


आधुनिक काळात लिव्ह इन रिलेशनशिपचा ट्रेंड वाढत आहे. नोकरी करणारे तरुणही लग्नाऐवजी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाण्याला महत्त्व देत आहेत. विवाहाशिवाय स्त्री आणि पुरुष एकत्र राहण्याच्या व्यवस्थेला लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणतात. लिव्ह-इनला सामाजिक स्तरावर मान्यता मिळू शकत नाही. मात्र, भारतीय कायदा लिव्ह-इन रिलेशनशिपला गुन्हा मानत नाही. कोणतेही दोन लोक लिव्ह-इनमध्ये राहू शकतात, कायद्याने हे पूर्णपणे वैध आहे. मात्र, याला काही नियम आहेत. त्याचे उल्लंघन होत असेल तर तुम्हाला कायद्याचं संरक्षण मिळत नाही.

काय सांगतो कायदा?

आत्तापर्यंत देशाच्या संसदेने किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाने लिव्ह इनवर कोणताही वेगळा कायदा केलेला नाही. मात्र, घरगुती हिंसाचार कायदा 2005 च्या कलम 2(एफ) अंतर्गत, लिव्ह इनची व्याख्या आढळते. कारण घरगुती हिंसाचार कायद्यानुसार, लिव्ह इनमध्ये एकत्र राहणाऱ्या लोकांनाही संरक्षण मिळू शकते. कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या या कलमावरून असे दिसते की लिव्ह-इनसारख्या संबंधांना भारतीय कायद्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. या कलमाव्यतिरिक्त, लिव्ह-इनशी संबंधित प्रकरणे वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयात येत आहेत, ज्यावर लिव्ह-इनसारख्या व्यवस्थेवर कायदेही करण्यात आले आहेत.

वाचा - पती आणि सासरच्या मालमत्तेवर पत्नीचा अधिकार आहे का? काय सांगतो कायदा?

तर तुमचं नातं कायद्याने वैध असेल

लिव्ह-इनचे दोन्ही पक्ष ठराविक कालावधीसाठी एकत्र असले पाहिजेत. कोणत्याही पार्टनरने कधीही एकत्र राहणे, कधी नाही, असं चालत नाही. एकत्र राहण्यासाठी ठराविक कालावधी आवश्यक आहे. योग्य कालावधी पूर्ण झाल्यास तो लिव्ह-इन मानला जाईल. वाजवी कालावधी म्हणजे लिव्ह-इनमधील पार्टनर्स एका विशिष्ट कालावधीसाठी एकत्र राहिले आहेत असे गृहीत धरता येईल. दोघेही काही दिवस एकत्र राहातात आणि निघून जातात. पुन्हा काही महिने किंवा वर्षांनी एकत्र राहू लागतात आणि नंतर निघून जातात. लिव्ह-इनसाठी सातत्यपूर्ण वाजवी कालावधी आवश्यक आहे. असा कालावधी 1 महिना किंवा 2 महिने देखील असू शकतो. परंतु, यासाठी कोणतीही निश्चित वेळ मर्यादा नाही.

पती-पत्नीप्रमाणे एकत्र घरात राहणे

लिव्ह-इनमधील जोडीदारांनी पती-पत्नीप्रमाणे एकाच घरात एकत्र राहणे आवश्यक आहे. लिव्ह-इनसाठी दोघेही एकाच घरात राहणे आवश्यक आहे. नाहीतर रोज एकत्र येतात आणि पुन्हा आपापाल्या वेगळी ठिकाणी राहतात असं नातं मान्य केलं जात नाही. लिव्ह-इनमधील दोघांकडून एकाच घरात एकत्र राहताना जसं पती-पत्नी वस्तू वापरतात, त्याचप्रमाणे एकाच घरातील वस्तू वापरतात. घरात एकत्र राहून दोन्ही पक्ष एकमेकांना घरातील कामात मदत करतात. किंवा घरातील कामे विभागून घेतली आहेत. लिव्ह-इनमधील पार्टनर्स आपल्या मुलांना आपुलकीने आपल्यासोबत ठेवत असतील. पालकांना त्यांच्या मुलांबद्दल जसं प्रेम आणि जिव्हाळा असतो, तसाच तो ऐकमेकांच्या मुलांबद्दल असणे आवश्यक आहे.

दोघेही एकत्र राहतात याची कल्पना इतरांना असावी

जेव्हा तुम्ही लिव्ह-इनमध्ये राहता तेव्हा तुमच्या आसपासच्या लोकांना याची माहिती असायला हवी. दोघेही पती-पत्नीसारखे घर शेअर करून एकत्र राहतात आणि दोघांचाही एकत्र राहण्याचा समान हेतू आहे. दोघेही एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवू शकतात. कारण, दोघेही जर पती-पत्नीसारखे एकत्र राहत असतील तर त्यांच्यात शारीरिक संबंधही निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ व्यभिचारासारखे कोणतेही गुप्त संबंध नसावेत. लिव्ह-इनमध्ये राहणारे दोघेही कायद्याने सज्ञान असावेत म्हणजे त्यांचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे. एक महत्त्वाची अट म्हणजे लिव्ह-इनमध्ये राहत असताना, दोघांपैकी कोणालाही आधीचा पती किंवा पत्नी जोडीदार नसावा. जर तसं असेल तर हे नातं अवैध मानलं जाईल.

वाचा - प्रेम असो की लिव्ह-इन रिलेशनशिप; अनमॅरिड कपल्सना हे नियम माहितीच हवे, अन्यथा..

लिव्ह-इनमधील महिलेला देखभालीचा अधिकार

सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की लिव्ह-इनमधील महिलेला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 अन्वये लिव्ह-इनमधील पुरुषाकडून देखभाल घेण्याचा अधिकार आहे. आमचा विवाह झाला नव्हात हे कारण देऊन पुरुषाला पालनपोषणाचा अधिकार नाकारता येत नाही. जर दोन्ही पक्ष लिव्ह-इन व्यवस्थेत पती-पत्नीसारखे एकत्र राहत असतील, तर महिला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 अंतर्गत पुरुषाकडून भरणपोषणाची मागणी करू शकते.

लिव्ह-इनमधून जन्मलेल्या मुलांना मालमत्तेचे उत्तराधिकार

लिव्ह-इनच्या कालावधीत एकत्र राहत असताना कोणतेही मूल जन्माला आले असेल, तर अशा प्रकारे जन्मलेल्या मुलाला वडिलांची मालमत्ता, आईची मालमत्ता आणि त्या दोघांना मिळालेल्या मालमत्तेचा वारसा देखील मिळतो. वैध विवाहातून जन्मलेल्या मुलांसारखेच हक्क अशा नात्यातून जन्मलेल्या मुलाला असतील. विवाह अस्तित्वात असतानाही एखादा पुरुष किंवा महिला लिव्ह-इनमध्ये राहत असेल तर अशा नात्याला कायद्याचे संरक्षण मिळत नाही. विवाहाचे पावित्र्य जपले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. जर एखाद्या पक्षाला यातून बाहेर पडायचे असेल तर तो कायदेशीर पद्धतीने घटस्फोट घेऊ शकतो. मात्र, ज्यांना कायद्याचे पालन करायचे नाही त्यांना न्यायालय मदत देऊ शकत नाही.(कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

First published:

Tags: Law, Legal, Relationship