बाजारात किंवा दुकानदाराने 10 रुपयांचं नाण स्वीकारण्यास नकार दिल्याचा प्रसंग तुमच्यासोबतही घडला असू शकतो. कारण, अशा अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. बऱ्याचदा आपण याकडे दुर्लक्ष करुन नाणे खिशात ठेऊन 10 ची नोट काढतो. असा प्रसंग परभणी येथील विवेक मुंदडा यांच्यासोबत घडला. युनियन बँकेच्या परभणी शाखेने त्यांच्याकडून 10 रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार दिला. यावर त्यांनी वरीष्ठांकडे तक्रार केली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर त्यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली. ग्राहक मंचाने बँकेला 1500 रुपयांचा दंड ठोठावला. आणि हे पैसे मुंदडा यांना देण्याचे आदेश दिले. उद्या तुमच्यासोबत अशी घटना घडली तर काय करायचं? विवेक यांचा लढा तुमच्या कामी येईल.
कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.
विवेक विजयकुमार मुंदडा, यांनी याबद्दल सांगितले, की युनियन बँक ऑफ इंडियाच्या परभणी शाखेत माझे जवळपास आठनऊ वर्षांपासून बचत खाते आहे. मी माझ्या खात्यात 10 रुपयांची नाणी भरण्यास गेलो असता पहिल्यांदा बँक कर्मचाऱ्यांनी नाणे स्वीकारण्यास नकार दिला. मी त्यांना प्रश्न विचारल्यावर केवळ हजार रुपयांची नाणी स्वीकारली जातील असं सागून केवळ हजार रुपयांची नाणी घेतली. मात्र, उर्वरित नाणी स्वीकारण्यास नकार दिला. यावेळी मी शाखा अधिकाऱ्यांस विचारले असता 10 रुपयांचे नाणे स्वीकारू नये असा वरिष्ठांचा आदेश असल्याचं त्यांनी तोंडी सांगितले. यानंतर काही दिवसांनी मी पुन्हा 10 रुपयांची नाणी घेऊन बँकेत भरण्यास गेलो असता त्यांनी नाणी स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर मी जिल्हा अग्रणी बँकेकडे लेखी तक्रार केली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर मी कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला. अॅड. दत्ताराव झुटे यांच्यामार्फत मी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे रितसर तक्रार केली. यावेळी तक्रार अर्जाला उत्तर देताना युनियन बँकेने आपल्या वकिलामार्फत 10 रुपयांची नाणी कधीच बंद झालेली नाही. तक्रारदार मुंदडा हे नेहमी दहा रुपयांच्या नाण्यांचा व्यवहार बँकेत करत आले आहेत. ते बँकेचे अनेक वर्षांचे ग्राहक असून कर्ज मिळवण्यासाठी बँकेवर सतत दबाव आणत होते, असे खोटे आरोप केले. मात्र, जिल्हा ग्राहक न्यायमंचाच्या अध्यक्षा सातपुते आणि सदस्य किरण मंडोत यांनी सर्व सत्यता पडताळून माझी तक्रार अशंतः मंजूर केली. माझ्याकडून 10 रुपयांची नाणी स्वीकारुन माझ्या बचत खात्यात जमा करण्यात आदेश बँकेला दिले. शिवाय मला मानसिक त्रास म्हणून 1 हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 500 रुपये देण्याचा आदेश दिला आहे. 10 रुपयांची सर्व नाणी वैध 8 फेब्रुवारी 2022 रोजी, राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, 10 रुपयांची सर्व प्रकारची नाणी कायदेशीर निविदांमध्ये आहेत. त्यांचे म्हणणे आहे की भारत सरकारच्या अखत्यारीत विविध आकार, थीम आणि डिझाइनमध्ये असलेली आणि आरबीआयने जारी केलेली नाणी कायदेशीर निविदा आहेत. ही नाणी सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये कायदेशीर निविदा म्हणून वापरली जाऊ शकतात. ए विजयकुमार यांच्या प्रश्नाला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत हे उत्तर दिलं होतं. वाचा - खात्यातून 300 रुपये झाले वजा! तरुणाने RBI नियमांच्या मदतीने कसे मिळवले 9600? 10 रुपयांची नाणी स्वीकारल्या जात असल्याच्या तक्रारी अनेकदा येत असल्याचे ते सांगतात. ते म्हणतात की लोकांच्या मनात पसरलेले गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी प्रेस रिलीझ जारी केले जातात. याबाबत आरबीआय देशभरात जनजागृती मोहीम राबवते. RBI ने आधीच स्पष्ट केले आहे की 10 रुपयांची सर्व 14 डिझाइनची नाणी वैध आणि लीगल टेंडरमध्ये आहेत. त्यामुळे लोकांनी कोणताही गैरसमज न ठेवता सर्व नाणी स्वीकारावीत. काय कारवाई होईल? जर एखाद्या व्यक्तीने कोणतेही नाणे घेण्यास नकार दिला (जर नाणे चलनात असेल), तर त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला जाऊ शकतो. त्याच्यावर भारतीय चलन कायदा आणि आयपीसीच्या कलमांखाली कारवाई केली जाईल. या प्रकरणाची रिझर्व्ह बँकेकडेही ( https://rbi.org.in/Scripts/Complaints.aspx ) तक्रार करता येईल. त्यानंतर दुकानदार किंवा नाणी घेण्यास नकार देणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. वाचा - पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडणे महागात! ग्राहकाला 30 हजार रुपये नुकसान भरपाई भारतीय दंड संहितेच्या कलम 489A ते 489E अंतर्गत, नोट किंवा नाण्याची बनावट छपाई करणे, बनावट नोट किंवा नाणे चालवणे आणि अस्सल नाणी स्वीकारण्यास नकार देणे हा गुन्हा आहे. या कलमांतर्गत कोणत्याही न्यायालयाकडून दंड, कारावास किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. अशा परिस्थितीत जर कोणी तुमच्याकडून नाणे घेण्यास नकार देत असेल तर आवश्यक पुराव्यासह कारवाई करू शकता. (कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

)







