श्रीकांत येरूळे, हा विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत होता. एकदा त्याने एटीएम मशीनमधून 300 रूपये काढण्याचा प्रयत्न केला. पण, पैसे मशीनमधून बाहेर आले नाही. मात्र, त्याचवेळी त्याच्या मोबाईलवर खात्यातून पैसे वजा झाल्याचा मॅसेज आला. त्याने दोन दिवस वाट पाहिली. पण, पैसे परत आले नाही. शेवटी त्याने बँक गाठून तक्रार केली. यावर बँकेने केवळ चौकशी चालू सुरू असल्याचे सांगत टाळाटाळ केली. यावर श्रीकांतने हार न मानता लेखी तक्रार व त्याचा पाठपुरावा करुन त्याने नुकसानीची तब्बल 9600 रूपये भरपाई मिळवली.
तुम्ही देखील एटीएमचा वापर करत असाल तर तुमच्यासोबतही असा प्रसंग घडण्याची शक्यता आहे. किंवा घडला असेल तर काय करायचं? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्याला श्रीकांतचा लढा मदत करेल.
श्रीकांत येरूळे, या विद्यार्थ्याने नियमांच्या आधारे बँक ऑफ महाराष्ट्राकडून ही नुकसान भरपाई मिळवली आहे. याबद्दल श्रीकांतने सांगितलं, की 29 जुलै रोजी एका अन्य बँकेच्या एटीएममधून मी बँक ऑफ महाराष्ट्राच्या डेबीट कार्डद्वारे 300 रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे न येताच खात्यातून रक्कम वजा झाली. दोन दिवस वाट पाहून मी 31 जुलै रोजी बँकेकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर वारंवार चौकशी केल्यानंतरही 'चौकशी सुरू आहे' या पलीकडे काहीच उत्तर मिळत नव्हतं. जवळपास तीन महिन्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी बँकेने माझ्या खात्यात 300 रुपये जमा केले.
मी 5 नोव्हेंबरला बँकेत जाऊन रिझर्व्ह बँकेचा एटीएम नुकसानभरपाईबाबतचा अध्यादेशही अधिकाऱ्यांना दाखवला. या नियमानुसार असे पैसे वजा झाल्यास बँकेला सात दिवसात जमा करणे कायद्याने बंधनकारक आहे. नियम न पाळल्यास पुढे प्रतिदिन 100 रूपये दंड लावण्याची तरतूद आहे. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी हा नियम बदलला असल्याचे सांगितले. मी आरबीआयची वेबसाईट पाहा असा आग्रह धरल्यानंतर त्यांनी 'आठ दिवसात चौकशी करुन सांगतो' असं उत्तर दिलं. त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी पुन्हा बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. आरबीआयच्या नियमांनुसार नुकसानभरपाई मिळण्यासाठी लेखी तक्रारही दिली. त्यानंतर बँकेने 3 डिसेंबर रोजी 9600 रुपयांची नुकसानभरपाई माझ्या खात्यावर जमा केली.
'अनेक बँका अजूनही नियम पाळत नाही'
एटीएममधून रक्कम न मिळाल्यास आणि खात्यातून वजा झाल्यास बँकेकडून पाच दिवसांत (पूर्वी हा नियम सात दिवसांच्या आत होता) नुकसानभरपाई न मिळाल्यास बँकांना दंडाची तरतूद आहे. हा अध्यादेश प्रत्येक एटीएममध्ये लावणे बंधनकारक असतानाही अनेक बँका हा नियम पाळताना दिसत नाहीत. 'आरबीआय'चे अधिकृत संकेतस्थळ https://www.rbi.org.in/scripts/NotificationUser.aspx यावरही माहिती मिळेल.
(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank services, Law, Legal, Rbi