आपले वाचक सुरेखा (नाव बदललेलं) यांचा प्रेमविवाह आहे. त्यांचे पती आणि त्यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. दोन वर्षाच्या रिलेशनशीपनंतर त्यांनी घरच्यांच्या सहमतीने 2015 साली विवाह केला. त्यानंतर 4 वर्षे सुखात गेली. यादरम्यान त्यांना दोन अपत्यही झाली. मात्र, त्यानंतर नवरा त्यांच्यावर संशय घेऊ लागला. यामुळे त्यांच्यात सतत वाद होऊ लागले. सुरेखा यांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. 2020 साली त्यांनी आपल्या दोन मुलांसह पतीचे घर सोडले आणि माहेरी येऊन राहू लागल्या. पतीने मागच्या दीड वर्षात कधीही परत बोलवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. यांचीही पुन्हा परत जाण्याची इच्छा नाही. माहेरी आल्यानंतर त्या नोकरी करू लागल्या आहेत. मात्र, भविष्यात पुन्हा काही वाद उद्भवू नये याची त्यांना भीती वाटते. यासाठी काही कायदेशीर उपाय आहे का? असा त्यांचा प्रश्न आहे.
कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.
सुरेखा यांच्यासारखी अनेक प्रकरणे आहेत ज्यात महिलांवर अन्याय होतो. मात्र, कायद्याच्या अज्ञानामुळे ते मुकाटपणे सहन करतात. आजच्या लेखातून असे कायद्यांची माहिती घेऊ ज्या अशा परिस्थितीत महिलांचे संरक्षण करतात.
नवऱ्याच्या घरी राहण्याचा हक्क
विवाहित स्त्रिला तिच्या सासरच्या घरी राहण्याचा पूर्ण हक्क आहे. परिस्थिती कशीही असली आणि तिचा नवरा मरण पावला असला तरी पत्नी आपल्या सासरच्या घरी राहू शकते. जर विषय घटस्फोटाचा असेल तर पत्नी तोपर्यंत नवऱ्याच्या घरी राहू शकते जोपर्यंत तिची दुसरीकडे राहण्याची काही सोय होत नाही. जर स्त्रीला त्याच घरात रहायचे असेल तर ते देखील तिच्या कायदेशीर अधिकारात आहे.
घटस्फोटाचा अधिकार
हिंदू विवाह अधिनियम कलम 13 1995 अन्वये पतीने व्यभिचार, क्रूरता, शारीरिक किंवा मानसिक छळ केला असल्यास पत्नी नवऱ्याच्या सहमतीविनाही घटस्फोट घेऊ शकते. यासह महिला आपल्या पतीकडून पोटगीची मागणी करू शकते. भारतीय दंड संहिता कलम 125 अन्वये, एक पत्नी आपल्यासाठी आणि आपल्या मुलासाठी नवऱ्याकडून पैशांची मागणी करू शकते.
वाचा - #कायद्याचंबोला : ...तर विधीवत लग्न करुनही महिलेला मिळणार नाही पत्नीचे अधिकार
स्त्रीधनावर हक्क
हिंदू विवाह कायदा 1956 च्या कलम 14 आणि हिंदू विवाह कायदा 1995 च्या कलम 27 अंतर्गत विवाहित महिलेचा तिच्या स्त्रीधनावर कायदेशीर हक्क असतो. या अधिकाराचे उल्लंघन झाल्यास ती कौटुंबिक हिंसाचार विरुद्ध महिलांचे संरक्षण कायद्याच्या कलम 19 A अंतर्गत तक्रार दाखल करू शकते.
मुलांची कस्टडीचा अधिकार
एका महिलेला आपल्या मुलाचा ताबा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. विशेषतः जर मुल 5 वर्षांपेक्षा लहान असेल. तसेच जर ती सासरचे घर सोडून जात असेल तर कोणत्याही कायदेशीर आदेशाशिवाय ती आपल्या मुलांना आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकते. यासोबतच समान कस्टडीचा हक्क मिळाला असला तरी घरात वाद उद्भवल्यास स्त्री आपल्या मुलाची कस्टडी कायमची आपल्याकडे ठेवू शकते.
घरगुती अत्याचाराविरोधात लढण्याचा अधिकार
घरगुती हिंसाचार कायदा 2005, अंतर्गत एखाद्या महिलेवर तिच्या पती किंवा सासरच्यांनी शारीरिक, मानसिक, लैंगिक, भावनिक अत्याचार केल्यास त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा तिला अधिकार आहे. त्यामुळेच कोणत्याही प्रकारचा मानसिक वा शारीरिक छळ महिलांना करू नये.
वाचा - घटस्फोट मिळाल्यानंतर पुन्हा बोहल्यावर चढायची घाई? नियम वाचा नाहीतर जाल तुरुंगात
हुंड्याच्या मागणीविरोधात रिपोर्ट करण्याचा अधिकार
हुंडा बंदी कायदा 1961 अंतर्गत, महिलेच्या माहेरच्यांकडे सासरच्या लोकांनी हुंडा मागितल्यास तिला तक्रार करण्याचा अधिकार आहे. आयपीसी कलमn 304B आणि 498A नुसार, हुंड्याची देवाणघेवाण आणि त्याच्याशी निगडीत अत्याचाला बेकायदेशीर म्हटले आहे.
गर्भपात करण्याचा अधिकार
महिलेला तिच्या गर्भात असलेल्या बाळाचा गर्भपात करण्याचा अधिकार आहे. यासाठी तिला नवरा किंवा सासरच्या संमतीची आवश्यकता नाही. पण यासाठी गर्भधारणेचा कालावधी 24 आठवड्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. काही विशेष प्रकरणांमध्ये स्त्री 24 आठवड्यांनंतरही गर्भपात करू शकते. यासाठी भारतीय न्यायालयाने तिला विशेष अधिकार दिला आहे.
वाचा - जोडीदार घटस्फोट देत नाहीये पण तुम्हाला हवाय; त्याच्या संमतीशिवाय अशी मिळवा सुटका
वडील आणि नवऱ्याच्या संपत्तीत अधिकार
प्रत्येक स्त्रीला तिच्या वडिलांच्या मालमत्तेत समान हक्क आहे. यासोबतच महिला तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या मालमत्तेवरही आपला हक्क सांगू शकते. जर पतीने तिला आपल्या मालमत्तेतून बाद करण्याची वसीयत बनवली नसेल तरच हे शक्य आहे. एखाद्या पुरुषाने पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न केल्यास अशा परिस्थितीत पतीच्या संपूर्ण मालमत्तेवर पहिल्या पत्नीचा हक्क असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.