मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

#कायद्याचंबोला : ...तर विधीवत लग्न करुनही महिलेला मिळणार नाही पत्नीचे अधिकार

#कायद्याचंबोला : ...तर विधीवत लग्न करुनही महिलेला मिळणार नाही पत्नीचे अधिकार

तर विधीवत लग्न करुनही महिलेला मिळणार नाही पत्नीचे अधिकार

तर विधीवत लग्न करुनही महिलेला मिळणार नाही पत्नीचे अधिकार

विवाह केल्यानंतर प्रत्येक महिलेला बायकोचे सर्व अधिकार मिळतात. मात्र, काही परिस्थितीत महिलांना कधीच हे अधिकार मिळत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

सध्या सोशल मीडिया न वापरणारे तरुण दुर्मिळच म्हणावे लागतील. आपली ओळख लपवण्यासाठी किंवा वेगळी ओळख दाखवण्यासाठी लोक सोशल मीडियावर वेगळं नाव लिहितात. पण, यातून किती मोठा घोळ होऊ शकतो याची कल्पनाही लोकांना नसेल. अतुल तसा इन्टाग्रामवर नवीन होता. नुकताच एका फार्मा कंपनीत कामाला लागला होता. एक तास बसने ट्रव्हल करुन तो कामाच्या ठिकाणी पोहचायचा. त्यामुळे बसमध्ये इन्टाग्राम चाळायची सवय त्याला लागली. त्याने आपल्या प्रोफाईलचं नाव एपी ठेवलं होतं. अशू नावाच्या एका मुलीचं प्रोफाईल त्याला फार आवडलं. त्याने तिला रिक्वेस्ट पाठवली. फिल्टर आणि एडीट केलेल्या फोटोंमुळे त्याने तिला ओळखलं नाही. तिने ह्याला पाहिलचं नसल्याने ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र, दोघांची चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर कधी प्रेमात झालं हे त्यांनाच कळलं नाही. दोघांचाही तासनतास फोनवर बोलण्यात जात होता. प्रत्यक्षात कधी भेटले नव्हते. पण, ज्यादिवशी ते भेटले त्यादिवशी दोघेही हादरले. कारण, ती अतुलची मावसबहीण होती. यांनी तर लग्न करण्याचं ठरवलं होतं? घरचे काय म्हणतील यापेक्षा कायद्याने याला मान्यता मिळेल का? हा खरा प्रश्न होता.

Kaydyach bola Legal

कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज #कायद्याचंबोला. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर Rahul.Punde@nw18.com या मेलवर आम्हाला सांगा.


हिंदू विवाह कायदा 1955 विधिवत विवाह केलेल्या प्रत्येक मुलीच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण करतो. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मुलींच्या हक्कांचेही रक्षणही कायद्यात आहे. मात्र, असे तीन प्रकारचे विवाह आहेत ज्यात मुलीला कायदेशीररित्या पत्नीचा दर्जा मिळू शकत नाही. ना ती उदरनिर्वाहासाठी दावा करू शकते किंवा ती हुंडा कायदा किंवा पत्नीने उपभोगलेले इतर कोणतेही कायदेशीर अधिकार वापरू शकत नाही.

हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 11 नुसार शून्य विवाहाचे कारण:-

द्विविवाह:- पहिली पत्नी किंवा पती जिवंत असताना दोघांपैकी कोणीही पुनर्विवाह केल्यास त्याचे दुसरे लग्न रद्द ठरते. दुसरा विवाह करण्यापूर्वी न्यायालयाकडून विवाह विसर्जित करण्याचा हुकूम घेणे बंधनकारक आहे. अशा परिस्थिती विवाहीत झालेल्या जोडप्याला लग्नानंतरचे कोणतेही कायदेशीर अधिकार मिळत नाही.

वाचा - घटस्फोट मिळाल्यानंतर पुन्हा बोहल्यावर चढायची घाई? नियम वाचा नाहीतर जाल तुरुंगात

सपिंडा नात्यात लग्न केल्यास

सपिंडा म्हणजेच गोत्र, कुळात विवाह करणे वैध मानले जाणार नाही. हिंदू विवाहांतर्गत, विवाहातील पक्षांमधील सपिंडा नातेसंबंधाची विशेष काळजी घेतली जाते. विवाहातील पक्षांचा सपिंडा म्हणजेच गोत्रात एकमेकांशी संबंध नसावा यासाठी प्रयत्न केले जातात. सध्याच्या कायद्यानुसार, सपिंडा नात्यात वडिलांच्या बाजूने पाच पिढ्या आणि आईच्या बाजूने तीन पिढ्या आहेत. या प्रकारचा विवाह शून्य मानला जातो. अशा नातेसंबंध ज्यामध्ये विवाह निषिद्ध आहे त्यांना सपिंडा नातेसंबंध म्हणतात. सपिंड म्हणजे मुलगा आणि मुलगी यांचे जवळचे रक्ताचे नाते आहे. यामध्ये भाऊ बहीण, काका भाची, मावशीची पुतणी अशी थेट नाती आहेत. याशिवाय इतरही अनेक जवळची नाती आहेत ज्यात लग्न होऊ शकत नाही. कोर्ट मॅरेजही शक्य नाही.

निषिद्ध नातेसंबंधांमध्ये केलेला विवाह रद्द ठरतो

निषिद्ध नातेसंबंध सोप्या भाषेत सांगायचे तर रक्ताच्या नात्यात विवाह निषिद्ध आहे, म्हणजेच दोन्ही पक्षांचे नाते भाऊ-बहीण, मामा-भाची, मामा-भाची, चुलत-पुतणे, मावशी-पुतणे इत्यादी नसावे. या प्रकारचा विवाह कायद्याने मान्य केला जात नाही.

वाचा - जोडीदार घटस्फोट देत नाहीये पण तुम्हाला हवाय; त्याच्या संमतीशिवाय अशी मिळवा सुटका

शून्य विवाहाचा काय परिणाम होतो?

दोघांपैकी कोणीही कधीही पुनर्विवाह करू शकते. पीडित पक्षाला कायदेशीर संरक्षण मिळत नाही. हुंडा कायद्यांतर्गत मुलगी गुन्हा दाखल करू शकत नाही. दोघांपैकी कोणीही घटस्फोटासाठी अर्ज करू शकत नाही. मुलगी पोटगीसाठी दावा करू शकत नाही. मुलगी पतीच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही. पत्नीचे अवैध संबंध असले तरी मुलगा एफआयआर नोंदवू शकत नाही. पत्नीने दुसरं लग्न केल्यास मुलगा कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही. पत्नी दुसऱ्यासोबत राहत असल्यास मुलगा न्यायालयात याचिका दाखल करू शकत नाही. एकंदरीत जेव्हा तुमचा विवाह शून्य ठरतो, त्यावेळी दोघांपैकी कोणालाही कायदेशीर अधिकार मिळत नाही.(कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)

First published:

Tags: Hindu, Legal, Marriage